मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : आजपासून तलाठी भरती परीक्षा सुरू होत आहे. तिसऱ्या सत्रातील ही तलाठी भरती परीक्षा 14 सप्टेंबरपर्यंत सुरू राहणार आहे. जालन्यात मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांचं उपोषण सुरूच आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यात येऊन जरांगे पाटील यांची भेट घेणार आहेत. तर भाजप नेत्या पंकजा मुंडे यांचा आजपासून शिवशक्ती दौरा सुरू होत आहे. या दौऱ्याच्या माध्यमातून त्या राज्यातील जनतेशी संवाद साधणार आहेत. जालना लाठीमाराच्या घटनेच्या निषेधार्थ पुण्यात आज महाविकास आघाडीकडून आंदोलन करण्यात येणार आहे. जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज मराठा मोर्चाने कल्याण बंदची हाक दिली आहे. यासह राज्य आणि देशातील घडामोडी जाणून घ्या.
कोल्हापूर शहरातील प्राथमिक शाळांना उद्या सुट्टी जाहिर करण्यात आलीये. मराठा आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर महानगरपालिका क्षेत्रातील शाळा उद्या बंद राहणार आहेत. महानगरपालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला आहे. तर जिल्ह्यातील एसटी वाहतूक देखील उद्या राहणार बंद
प्रसिद्ध नृत्यांगना गौतमी पाटीलच्या वडिलांचे निधन झाले आहे. गौतमीच्या वडिलांचे ना रवींद्र पाटील असे होते. पुण्यातील खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर उपचार सुरू होते. दोन दिवसांपूर्वी उपचारासाठी धुळ्याहून त्यांना पुण्यात हलवण्यात आले. पुण्यातील खाजगी रुग्णालयात आयसीयूमध्ये उपचार सुरू असतानाच त्यांचे निधन झाले.
पुण्यात विनापरवाना सभा घेणे भोवले आहे. पुण्यात संभाजी भिडे यांच्यासह 150 जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आलाय. परवानगी नाकारल्यानंतरही सभा घेण्यात आली. पुण्यातील लोणीकंद पोलीस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आलाय. नगर रस्त्यावरील मांजरी कोलवडी गावात माऊली लॉन्स येथे शनिवारी संभाजी भिडे यांची सभा आयोजित करण्यात आली होती.
भाजपच्या राष्ट्रीय सचिव पंकजा मुंडे यांचा शिवशक्ती परिक्रमा दौरा सुरू झाले. पंकजा मुंडे यांचे नाशिकमधील वणी येथील सप्तशृंगी माता देवी मंदिरात आगमन झाले आहे. पंकजा मुंडे आता सप्तशृंगी मातेचे दर्शन घेणार आहेत.
जालना मराठा आंदोलन प्रकरणी जालना जिल्ह्यात आत्तापर्यंत 17 गुन्हे दाखल करण्यात आली आहेत. जाळपोळ आणि दगडफेक प्रकरणी आतापर्यंत 42 आंदोलकांना पोलीसांकडून अटक करण्यात आली. जिल्हयातील एकुण 7 पोलीस स्टेशनमध्ये 17 गुन्हे दाखल केली आहेत.
राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची उद्या जळगावात चौथी भव्य सभा होणार आहे. ५० हजार लोक या सभेला हजेरी लावण्याची शक्यता आहे. या सभेच्या निमित्ताने मंत्री अनिल पाटील, शरद पवारांच्या केंद्रस्थानी असण्याची शक्यता आहे. या सभेच्या निमित्ताने चौथा ओबीसी नेत्याला शरद पवार लक्ष करण्याची शक्यता आहे.
जालन्यातील कथित लाठीचार्ज प्रकरणानंतर नवे पोलीस अधीक्षक शैलेश बलकवडे यांनी समन्वयासाठी एक पाऊल उचललं आहे. त्याचबरोबर आंदोलन प्रकरणी दाखल गुन्ह्यांची माहिती घेण्याचं काम सुरु असल्याचं बलकवडे यांनी सांगितलं आहे. “नागरिक आणि पोलिस यांच्यात जे काही गैरसमज असतील ते दूर करण्याचं आणि विश्वासाचं वातावरण तयार करण्याची भूमिका आहे.”, असं जालना पोलीस अधीक्षक बलकवडे यांनी सांगितलं.
गणशोत्सवात पाचव्या, नवव्या आणि अनंत चतुर्थीला रात्री 12 वाजेपर्यंत लाऊडस्पीकरला परवानगी असणार आहे.
आरएसएसची समन्वय बैठक 14 सप्टेंबरपासून पुण्यात होणार आहे. 14 ते 16 सप्टेंबर दरम्यान पुण्यात होणाऱ्या संघाच्या बैठकीत भाजपचे अध्यक्ष जेपी नड्डा देखील उपस्थित राहणार आहेत. जेपी नड्डा यांच्याशिवाय भाजपचे संघटन मंत्री बीएल संतोष, सहसंघटन मंत्री व्ही सतीश आणि सरचिटणीस सुनील बन्सल हेही या बैठकीला उपस्थित राहणार आहेत. आगामी 5 राज्य आणि लोकसभा निवडणुकीपूर्वी संघाची ही समन्वय बैठक आहे.
जम्मू-काश्मीरच्या रियासीमध्ये सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांमध्ये चकमक झाल्याची माहिती समोर आली आहे. गुप्तचर यंत्रणांनी दिलेल्या माहितीच्या आधारे सुरक्षा दलांनी संपूर्ण परिसराला वेढा घातला. दोन्ही बाजूकडून जोरदार धुमश्चक्री सुरु आहे. या भागात किती दहशतवादी लपले आहेत याची माहिती अद्याप मिळालेली नाही.
जालना येथील लाठीमार घटनेच्या निषेधार्थ जळगाव जिल्ह्यातील बोदवड येथे सकल मराठा समाजाच्या वतीने निषेध मोर्चा काढण्यात आला. कृषी उत्पन्न बाजार समिती येथून तहसील कार्यालयावरील निषेध मोर्च्यात राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेशाध्यक्षा रोहिणी खडसे यांच्यासह राष्ट्रवादीचे आणि शिंदे गटाचे पदाधिकारी सहभागी झाले होते.
मराठा आंदोलकांवर 307 सारखे गुन्हे दाखल केले. ते मागे घेण्यात यावे. सरकारच्या शिष्टमंडळाने मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन यावं. त्यानंतर आंदोलन मागे घेण्यासंदर्भात निर्णय घेऊ. दोन दिवसांचा वेळ शिल्लक आहे. असं काल सांगितलं होतं. आता एक दिवस शिल्लक आहे. मराठ्यांना आरक्षण मिळवून देणार तेव्हाच थांबणार. राज्य सरकारचं शिष्टमंडळ येईल, अशी अपेक्षा असल्याचं मनोज जरांडे पाटील म्हणाले.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेऊन मराठा आंदोलनासंदर्भात भूमिका स्पष्ट केली. सरकारच्या पत्रकार परिषदेनंतर मनोज जरांगे पाटील म्हणाले, सरकारने येताना मराठा आरक्षणाचा अध्यादेश घेऊन यावा. बैठका आणि चर्चेचे गुऱ्हाळ हे अपेक्षित नाही. तुम्ही पहिले पाढे पुन्हा पुन्हा सांगू नका. सरकारने मराठ्यांना आरक्षण देण्याचा निर्णय घेतला असेल. मराठा आरक्षणाचा जीआर घेऊन केव्हा येतात, याची वाट पाहतो, अशी अपेक्षा व्यक्त केली. जीआर आला नाही, तर आंदोलन थांबणार नाही. उद्यापासून पाणी सुटलं म्हणून समजा, असा इशारा मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
मुंबई : हे आरक्षण देवेंद्र फडणवीस यांच्या काळातले होते. त्याची काळजी घेतली होती. सुप्रीम कोर्टाने ते रद्द केले. त्यावेळी अशोक चव्हाण त्या समितीचे अध्यक्ष होते. तेच काळ तिथे गेले होते. मराठा समाजाचा गळा त्यांनी घोटला. तेच काल गळा काढायला गेले होते, अशी टीका मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुंबई : मराठा समाजाच्या कार्यकर्त्यांना त्रास होणार नाही याची काळजी घेण्यात येईल. दोषींवर कारवाई करण्यात येईल. उपविभागीय अधिकारी चौकशी करत आहे. त्याच्ब्या अहवालाप्रमाणे कारवाई करू. कुणबी समाजाचे दक्ल्याचा विषय आहे. महसूल विभागाचे सचिव काम करत आहेत, असे मुख्यमंत्री शिंदे यांनी सांगितले.
चर्चेतून हा प्रश्न सुटणार आहे. मनोज जरांगे यांना आवाहन मराठा समाजाला पूर्ण आरक्षण देणे हा मोठा विषय आहे. सर्वच स्तरावर काम सुरु आहे. महिनाभरात ते काम पूर्ण होईल. ज्यांच्यावर केसेस करण्यात आल्या आहेत, त्या मागे घेण्यात येतील अशी घोषणा मुख्यमंत्री शिंदे यांनी केली.
मुंबई : त्रुटी दुर करण्याचे निर्देश आयोगाला दिले आहे. संयम राखण्याची गरज आहे. मराठा समजा पुढारलेला आहे. पण आर्थिक दृष्ट्या सक्षम नाही. आरक्षण टिकले पाहिजे. त्याचा लाब समाजाला घेता आला पाहिजे. तोपर्यंत जे लाभ मिळत आहेत ते लाभ मिळतीलच. आर्थिक तरतूद आवश्यक आहे ते देण्यात येतील. जे लोक यामध्ये आंदोलनाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजत आहेत त्यांच्यापासून सावध रहाण्याची गरज आहे. कुणी तिथे जाऊन त्यांच्या प्रकृतीची चौकशी केली नाही. फक्त भाषणे दिली. आतापर्यंत शांततेने आंदोलन केले. पण आता भडकावून राज्यात कायदा सुव्यवस्था बिघडविण्याचे काम करत आहेत
मुंबई : शासन गंभीर आहे आम्ही मराठा आरक्षणाच्या समितीमध्ये होतो. आम्ही काम केले. त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण देण्याचा कायदा केला. येथे काही भाग, बाबी होत्या त्या कोर्टाच्या निदर्शनास आणल्या. मराठा समाज कसा आर्थिक, सामाजिक दृष्ट्या मागास आहे हे सिद्ध केलं. हे आरक्षण झाले त्या वेळेला सर्वोच्च न्यायालयात काही जण गेले. त्यावेळी युती सरकार होते. पण, नंतर सरकार बदलले आणि दुर्दैवाने सुप्रीम कोर्टाने हे आरक्षण रद्द केले. पण, आज त्या ठिकाणी जाऊन आरक्षण मिळाले पाहिजे असे माजी मुख्यमंत्री म्हणत असतील तर त्यावेळी निर्णय घेणारे कोण होते? त्यांनी निर्णय का घेतला नाही असे सवाल मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला
गेले दोन दिवस मी आजारी होतो. बरं नव्हतं. पण त्या वरूनही टीका केली. जालना येथे घडले त्या संदर्भात सगळ्यांनी स्पष्ट सांगायला पाहिजे की अशा प्रकारचे प्रसंग येतात तेव्हा राज्याचे समोर ठेवून निर्णय घ्यायला पाहिजे. पण, दुर्दैवाने राजकीय पोळी भाजता येते का? राजकीय स्वार्थ स्वार्थ साधता येतो का असा प्रयत्न केला अशी टीका उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी केली.
70 हजार लाभार्थी तयार झाले आहेत. ५ हजार कोटी कर्ज दिले आहे. सारथी सारखी महत्वाची संस्था सुरु केली. त्यामाध्यमातून सगळ्या ५०४ कोर्सेस लाभ देत आहोत. राज्य सरकारने विविध योजना आणल्या आहेत. या घटनेचे राजकारण करू नका असे आवाहन देवेंद्र फडणवीस यांनी केले
उद्धव ठाकरे यांचे भाषण ऐकले. मावळला जेव्हा शेतकरी मृत्युमुखी पडले तेव्हा राजीनामा का दिला नाही? सरकार काही करते असे दाखविण्याचा प्रयत्न झाला. आरक्षणाचा कायदा २०१८ साली तयार केला. त्यानंतर उच्च न्यायालयाने हा कायदा मान्य केल. आतापर्यंत दोनच कायदे मान्य झाले आहेत. 5 / 5 / 21 पासून एक वर्ष एक महिना मुख्यमंत्री होते. मग त्यावेळी चूप का बसला.
मी पाच वर्ष गृहमंत्री होतो. आंदोलने झाली. पण कधी बलाचा उपयोग केला नाही. त्यामुळे जे बलाच्या वापरामुळे जखमी झाले आहेत. त्यांची क्षमा मागतो. दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे. या विषयावर राजकारण होऊ नये. जाणीवपूर्वक लाठी चार्जचे आदश दिले. असे आरोप झाले. लाठी चार्जचे आदेश हे डीवायएसपी देतात.
मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर मराठा उपसमितीची सह्याद्री अतिथी गृहावर सुरु असलेली बैठक संपली आहे. लवकरच मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पत्रकार परिषद घेणार आहेत.
जालन्यातील लाठीमार प्रकरणाची चौकशी राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना करीत आहेत. या प्रकरणी आजची अतिरिक्त पोलीस महासंचालकांची बैठक संपली आहे. या प्रकरणाचा चौकशीचा अहवाल संजय सक्सेना राज्याच्या गृह खात्याला सादर करणार आहेत.
मराठा आरक्षण उपसमितीच्या बैठकीला येण्याचं मनोज जरांगेंना निमंत्रण देण्यात आलं आहे. त्याचबरोबर मुख्यमंत्र्यांनी चर्चेचं निमंत्रण दिलं आहे. अर्जून खोतकर यांनी मुख्यमंत्र्यांचा निरोप पोहोचवला आहे.
मराठा आरक्षणाचा प्रश्नी खुद्द सत्ताधारी शिंदे गटाच्या आमदाराच्या गावांतच आज सोमवारी जाळपोळ करण्यात आली. सांगली जिल्ह्यातील खानापूर तालुक्यातील शिवसेना शिंदे गटाचे एकमेव आमदार अनिलराव बाबर यांच्या गार्डी येथे “एक मराठा,लाख मराठा,” “जय भवानी- शिवाजी”, “आरक्षण आमच्या हक्काचे नाही कुणाच्या बापाचे,” आरक्षण द्या नाहीतर खुर्च्या खाली करा, अशा घोषणाबाजीत जालन्यामध्ये सरकारमधील ज्यांनी लाठीमारीचा आदेश दिला त्यांचा राजीनामा घ्या, अशी जोरदार मागणी केली.
जळगावात उद्या राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची भव्य जाहीर सभा होणार आहे. सभेकडे संपूर्ण राज्याचे लक्ष लागून राहिले आहे. जळगावात राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार पहिली सभा होणार आहे. जळगाव शहरातील सागर पार्क मैदानावर उद्या दुपारी तीन वाजता सभेला सुरुवात होईल. शरद पवार यांच्या सभेची तयारी अंतिम टप्प्यात आली आहे.
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देण्याबाबत राज्य सरकारच्या हालचाली सुरु झाल्या आहेत. धाराशिवचे जिल्हाधिकारी डॉ सचिन ओम्बासे यांनी सादर केला 114 पानाचा लेखी अहवाल. मराठा कुणबी असल्याच्या कागदपत्रासह सादर केला अहवाल, धाराशिव व उमरगा तालुक्यात मराठा हे कुणबी नोंदी असल्याचे पुरावे आढळले आहेत. गाव नमुना 14 मध्ये 89 ठिकाणी कुणबी असल्याच्या नोंदी आढळल्या आहेत.
जालना येथे मराठा आंदोलकांवर लाठीचार्ज करण्यात आला होता. त्याच्या निषेधार्थ आज मावळ बंदची हाक देण्यात आली आहे. लोणावळा येथे बंदला नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला आहे. लोणावळा शहरातील बाजारपेठेत कडकडीत बंद ठेवण्यात आला आहे. तर कोणताही अनुचित प्रकार घडू नये म्हणून पोलिसांचा मोठा फौजफाटा तैनात करण्यात आला आहे.
मराठा आरक्षणासाठी आमरण उपोषण करत असलेले मनोज जरांगे यांची रोज दोन वेळेस मेडिकल चेक अप केले जाता आहे. डॉक्टरच्या पथकाने आज त्यांची तपासणी केली. डॉक्टरांनी त्यांना जास्त बोलणे टाळले पाहिजे, असा सल्ला दिला आहे.
जालना घटनेच्या निषेधार्थ उद्या कोल्हापूर बंद पुकारण्यात आला आहे. सकल मराठा समाजातर्फे हा बंद पुकारण्यात आला आहे. कोल्हापुरातील मराठा समाज आरक्षण प्रश्नी आक्रमक झाला आहे.
मराठवाड्यातील आठ जिल्ह्यासंदर्भातील अहवाल विभागीय आयुक्तांनी सादर केला आहे. निझामकाळात मराठा कुणबी असल्याचा उल्लेख होता, असा हा अहवाल दिला आहे. शैक्षणित आणि महसूल नोंदी असल्याचा उल्लेख असल्याचे म्हटले आहे.
बारामतीत सकल मराठा समाजाचा मोर्चा काढण्यात आला. जालना येथील लाठी हल्ल्याच्या निषेधार्थ काढलेल्या या मोर्च्यात अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडा अशा घोषणा देण्यात आल्या. यावेळी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात घोषणाबाजी झाली.
राज्याचे अतिरिक्त पोलीस महासंचालक संजय सक्सेना जालना पोलीस अधिक्षक कार्यालयात दाखल झाले आहेत. जालना लाठीचार्ज प्रकरणी ते चौकशी करणार आहेत. त्यांच्यासोबत औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक ज्ञानेश्वर चव्हाण देखील उपस्थीत आहेत.
जालन्यातील घटनेच्या निषेधार्था बारामतीमध्ये आंदोलन करण्यात येत आहे. अजित पवार यांनी सत्तेतून बाहेर पडावं, अशी मागणी यावेळी करण्यात येत आहे.
मराठा आरक्षण उपसमितीची थोड्याच वेळात सह्याद्रीवर बैठक होणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत ही बैठक पार पडणार आहे.
अजित पवार, चंद्रकांत पाटील, प्रवीण दरेकर हे बैठकीसाठी दाखल झाले आहेत.
पुण्यातील कोथरूड येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याजवळ महाविकास आघाडीचं आंदोलन सुरू. आंदोलन स्थळी पुणे पोलिसांचा मोठा बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
सुप्रीम कोर्टातील आरक्षणाचा मुद्दा पूर्णपणे वेगळा, तो आमचा मुद्दा नाही. मराठा समाजाला कुणबी जातीचं प्रमाणपत्र देण्यात यावं , अशी आमची मागणी आहे, असे मनोज जरांगे पाटील यांनी सांगितलं.
आम्ही आमचा विषय राज ठाकरे यांना समजावून सांगितला. ते मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी चर्चा करतील, असं म्हणाले हेही पाटील यांनी नमूद केलं.
काल उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हमाले, की या मुद्याचं राजकारण करू नका. ते जर विरोधी पक्षात असते तर त्यांनी काय केलं असतं, असं विचारत राज ठाकरे यांनी फडणवीसांच्या वक्तव्याचा समाचार घेतला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याशी संवाद साधेन. आरक्षणाच्या मुद्यावर त्यांच्याशी बोलून हा प्रश्न सोडवायचा पूर्ण प्रयत्न करेन, असे आश्वासन राज ठाकरे यांनी दिले.
राजकीय नेत्यांकडून तुमचा वापर केला जातो. ते फक्त आरक्षण आणि पुतळ्याचं राजकारण करतात. लाठीहल्ल्याचे आदेश देणाऱ्यांना मराठवाड्यात येऊ देऊ नका, असे राज ठाकरे म्हणाले.
आरक्षणाच्या मुद्यावर राजकीय नेते फक्त तुमची मत मागतात. सगळे राजकारणी तुमचा वापर करून घेतात -राज ठाकरे
मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे उपोषण स्थळी पोहोचले असून त्यांचे पुत्र अमित ठाकरे हेदेखील उपस्थित आहेत. राज ठाकरे यांची आंदोलकांशी चर्चा सुरू असून, त्यांच्या मागण्या, त्यांच म्हणणं ते समजून घेत आहेत.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे जालन्यात आले असून मराठा आरक्षणासाठी उपोषण करणाऱ्या मनोज जरांगे पाटील यांची त्यांनी भेट घेतली आहे. राज ठाकरे यांची आंदोलकांशी चर्चा सुरू.
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज अनेक शहरांत बंदची हाक देण्यात आली आहे. छत्रपती संभाजीनगर, सातारा, बारामती, तसेच खेड, दर्यापूर, बार्शीतही आज कडकडीत बंद पाळण्यात येत आहे.
गेल्या सात दिवसांपासून आमरण उपोषण करत असलेल्या मनोज जरांगे पाटील यांची आज राज ठाकरे भेट घेणार आहेत. राज ठाकरे उपोषणाच्या ठिकाणी पोहोचले आहेत.
छत्रपती संभाजीनगरमधील क्रांती चौकामध्ये आंदोलन सुरू आहे. या आंदोलनामध्ये माजी खासदार चंद्रकांत खैरेसुद्धा आंदोलनामध्ये सहभागी झाले असून यावेळी त्यांनी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
जालना येथे निघालेल्या राज ठाकरे यांचा ताफा तिसऱ्यांदा थांबवण्यात आला आहे. आडगाव जावळेमध्ये आता त्यांचा ताफा थांबवण्यात आलाय.
जालन्यातील लाठीमाराचा खासदार संजय राऊत यांनी निषेध केला आहे. महाराष्ट्रात तीन-तीन जनरल डायर आहेत. महाराष्ट्रात जनरल डायरचं सरकार आहे, असं म्हणत संजय राऊत यांनी शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
जालना येथील घटनेच्या पडसाद संपूर्ण राज्यभर उमटत आहेत. या घटनेचा निषेध करण्यासाठी पुणे जिल्ह्याच्या खेड तालुक्यात आज बंदची हाक देण्यात आलेली आहे. सकल मराठा समाजाच्या वतीने पुकारण्यात आलेल्या या बंदला विविध संघटनांकडूनही पाठिंबा मिळाला आहे. आज राजगुरुनगर शहरात शुकशुकाट पाहायला मिळत आहे. त्यासोबत शाळा महाविद्यालय यामधील शैक्षणिक काम बंद ठेवण्यात आलं आहे.
मराठा समाजावर जालन्यात झालेल्या घटनेच्या निषेधार्थ उद्या माळशिरस तालुका बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. शाळा कॉलेज देखील बंद राहणार आहे. आज झालेल्या मराठा समाजाच्या निषेध बैठकीत निर्णय घेण्यात आला आहे. तालुक्यात वेगवेगळ्या ठिकाणी चक्काजाम आंदोलन करण्याचाही निर्णय घेतला आहे. तसंच जोपर्यंत मराठा समाजाला न्याय मिळत नाही, गृहमंत्र्यांना राजीनामा घेतला जात नाही आणि पोलीस अधीक्षक यांना निलंबित केलं जात नाही तोपर्यंत माळशिरस तालुक्यामध्ये कोणत्याही मंत्र्यांना मराठा समाज फिरकू देणार नाही अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. मराठा क्रांती मोर्चाचे राज्य समन्वय धनाजी साखळकर यांनी ही माहिती दिली आहे.
जालना लाठीचार्ज घटनेमुळे गेल्या तीन दिवसांपासून पुण्याहून जालन्याकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्यात आल्या आहेत. शिवाजीनगर बसस्थानकावरून जालना, छत्रपती संभाजीनगर,लातूर नांदेडकडे जाणाऱ्या बसेस बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. मराठवाड्याकडे जाणाऱ्या बसेस बंद असल्यामुळे प्रवाशांचे हाल होत आहेत. तलाठी पदाच्या परीक्षेसाठी जाणाऱ्या विद्यार्थ्यांना बसेस बंदचा फटका बसला आहे.
जालना येथील घटनेनंतर आज मराठा समाजतर्फे बार्शी बंदची हाक. सकाळपासून बार्शी शहरातील सर्व दुकाने बंद. हॉस्पिटल, मेडिकल आणि शाळा वगळता इतर सर्व आस्थापना बंद. जालना येथे पोलिसांनी मराठा समाज बांधवावर केलेल्या लाठीचार्ज नंतर मराठा समाजातर्फे बंदचे आवाहन करण्यात आले होते. त्यानंतर आज सकाळपासून बार्शीतील सर्व व्यवहार बंद. शहरातील संकेश्वर उद्यान, कसबा पेठ आणि कोर्ट परिसरातील सर्व दुकाने बंद.
जालन्यातील घटनेच्या निषेधार्थ आज महाराष्ट्रातील काही भागात बंद पाळण्यात येणार आहे. लासलगावमध्ये आज दुकान बंद ठेवणार. धुळ्यातून संभाजीनगरकडे जाणाऱ्या बस बंद. सोलापुरातील बार्शीमध्ये बंदची हाक. सातारा, बारामतीमध्ये बंद.
खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून आज पुणे जिल्ह्यातील खेड तालुका बंदची हाक खेड तालुक्यातील व्यापारी असोसिएशन, वकील आणि विविध संघटनांचा बंदला पाठिंबा. खेड तालुक्यातील सर्व शाळांना सुट्टी. खेड तालुका मराठा क्रांती मोर्चाकडून प्रांत अधिकारी यांना निवेदन देण्यात येणार. चाकण आणि राजगुरूनगर शहरात पोलिसांचा मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात येणार
जालना येथील लाठीचार्जच्या निषेधार्थ आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, या मागणीसाठी आज अमरावतीच्या दर्यापूर येथे सकल मराठा समाजाच्या वतीने दर्यापूर शहर बंदची हाक देण्यात आलीय. जयस्तंभ चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत मराठा क्रांती मोर्चा निघणार आहे.
जालना शहरासह संपूर्ण जिल्ह्यात आजपासून जमाव बंदीचे आदेश जारी करण्यात आले आहेत. आज सकाळी 6 वाजल्यापासून जमाव बंदीला सुरूवात झाली आहे. या आदेशानुसार 5 पेक्षा अधिक लोक एकत्र येण्यास मज्जाव घालण्यात आला आहे. 17 सप्टेंबरच्या मध्यरात्री 12 वाजेपर्यंत जमावबंदी आदेश लागू राहणार आहेत. जिल्हा दंडाधिकारी केशव नेटके यांनी हे आदेश काढले आहेत.
भाजप नेत्या पंकजा मुंडे यांची आजपासून शिवशक्ती यात्रा सुरू होत आहे. या यात्रेच्या माध्यमातून त्या एकूण 11 हजार किलोमीटरचा प्रवास करणार आहेत. आज त्यांचा पहिलाच दौरा असून आज त्या औरंगाबाद आणि नाशिकला जाणार आहे. परळीतल्या वैजनाथ मंदिरात त्यांच्या दौऱ्याचा समारोप होणार आहे.
मनसे अध्यक्ष राज ठाकरे आज जालन्यातील अंतरवाली सराटी गावात जाणार आहेत. या ठिकाणी उपोषण करणारे मनोज जरांगे पाटील यांच्याशी राज ठाकरे संवाद साधून त्यांची विचारपूस करणार आहेत. थोड्याच वेळात ते शिवतीर्थ या आपल्या निवासस्थानाहून जालन्याकडे रवाना होतील.
राज्यात आजपासून तलाठी भरती परीक्षा सुरू होत आहे. त्यामुळे तलाठी होण्यासाठी अनेकजण आज नशीब आजमावणार आहेत. येत्या 14 सप्टेंबपर्यंत ही तिसऱ्या सत्रातील परीक्षा होणार आहे. परीक्षे दरम्यान कोणताही गोंधळ होऊ नये म्हणून सर्व खबरदारी घेण्यात आली आहे.