Maharashtra Breaking News in Marathi : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात

| Updated on: Mar 22, 2024 | 7:01 AM

Maharashtra Breaking News in Marathi : आज 21 मार्च 2024. देश, विदेश, राज्य पातळीवरील राजकीय, सामाजिक, आर्थिक, गुन्हेगारी क्षेत्र, क्रीडा अन् मनोरंजन क्षेत्रातील महत्वाच्या घडामोडी जाणून घ्या. तुमच्या जिल्ह्यातील, तुमच्या गावातील बातमी तुम्हाला इथे वाचायला मिळेल.

Maharashtra Breaking News in Marathi : केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात
Follow us on

मुंबई | 21 मार्च 2024 : महाविकास आघाडी आणि महायुतीसाठी आज महत्वाचा दिवस आहे. काँग्रेस पक्षाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार आहे. महायुतीचे रखडलेले जागावाटप दिल्लीत आज होणार आहे. लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग अलर्ट झाले आहे. आयोगाने मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी लावलेले होर्डिंग्ज, बॅनर 24 तासांत हटवण्याचे आदेश दिले आहेत. हिंगोली जिल्ह्यात अनेक ठिकाणी भूगर्भातून आवाज येऊन जमीन हादरली. या ठिकाणी भूंकपाचे धक्के बसले आहे. गोंदिया जिल्ह्यात अवकाळी पावसाचा तडाखा बसला आहे. त्यात शेतीचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. यासह अन्य महत्वाच्या बातम्या क्रीडा, मनोरंजन, राजकीय क्षेत्रातील बातम्या तुम्हाला या ब्लॉगमध्ये वाचायला मिळतील. त्यामुळे आज दिवसभर हा ब्लॉग फॉलो करा.

LIVE NEWS & UPDATES

The liveblog has ended.
  • 21 Mar 2024 06:40 PM (IST)

    वाईवरुन मुंबईला येताना अपघात, सुदैवाने कोणतीही जीवितहानी नाही

    या क्षणाची मोठी बातमी समोर आली आहे. केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांच्या गाडीला अपघात झाला आहे. वाईवरुन मुंबईला येताना आठवलेंच्या गाडीची कंटेनरला धडक लागली. या अपघातात सुदैवाने कोणलाही दुखापत झालेली नाही.

  • 21 Mar 2024 06:17 PM (IST)

    तामिळनाडूतील 9 जणांना उमेदवारी

    नवी दिल्ली | आगामी लोकसभा निवडणुकीसाठी भाजपने तिसरी यादी जाहीर केली आहे. भाजपने तिसऱ्या यादीत 9 जणांना उमेदवारी दिली आहे. भाजपने तामिळनाडूतील 9 जणांना लोकसभेचं तिकीट दिलं आहे.


  • 21 Mar 2024 05:52 PM (IST)

    दिल्ली उच्च न्यायालयाकडून केजरीवालांना अटकेपासून दिलासा नाही

    दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दारू घोटाळ्याशी संबंधित मनी लॉन्ड्रिंग प्रकरणात तात्काळ दिलासा मिळालेला नाही. दिल्ली उच्च न्यायालयाने सध्या केजरीवाल यांच्या अटकेला स्थगिती देण्यास नकार दिला आहे. हायकोर्टाने ईडीला अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर 2 आठवड्यांत उत्तर देण्यास सांगितले आहे. या प्रकरणाची पुढील सुनावणी 22 एप्रिल रोजी होणार आहे.

  • 21 Mar 2024 05:35 PM (IST)

    राक्षसी शक्तीने काँग्रेसची बँक खाती गोठवली: राहुल गांधी

    काँग्रेसची पत्रकार परिषद संपल्यानंतर राहुल गांधी यांनी त्यांच्या सोशल मीडियावर लिहिले की, द्वेषाने भरलेल्या ‘राक्षसी शक्तीने’ लोकशाहीची हत्या करण्यासाठी काँग्रेसचे बँक खाते गोठवले आहे.

  • 21 Mar 2024 05:25 PM (IST)

    ठाण्यातील 40 गोदामांना आग, सुदैवाने जीवितहानी नाही

    ठाणे जिल्ह्यातील गोदाम संकुलात गुरुवारी पहाटे लागलेल्या आगीत भंगाराची किमान 40 गोदामे जळून खाक झाली. अग्निशमन अधिकारी सुधीर दुशिंग्स यांनी सांगितले की, डोंबिवली परिसरातील गोलावली गावातील एका गोदाम संकुलात सकाळी 12.20 वाजता आग लागली. सुदैवाने जीवितहानी नाही. 

  • 21 Mar 2024 05:04 PM (IST)

    यूपीच्या प्रतापगडमध्ये फर्निचर व्यावसायिकाची गोळ्या झाडून हत्या

    उत्तर प्रदेशातील प्रतापगड जिल्ह्यात गुरुवारी एका फर्निचर व्यावसायिकाची मोटरसायकलवरून आलेल्या अज्ञातांनी गोळ्या झाडून हत्या केली. मोहम्मद नईम (50) हे सकाळी दहा वाजता आपल्या मुलाला मोटारसायकलवरून शाळेत सोडण्यासाठी जात असताना मोटारसायकलवरून आलेल्या तिघांनी त्याला अडवून गोळ्या झाडल्या.

  • 21 Mar 2024 04:21 PM (IST)

    मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांना दिलासा नाही, अटक होण्याची शक्यता

    नवी दिल्ली : दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सध्या सुनावणी नाही, असा निर्णय दिल्ली हायकोर्टाने घेतला आहे. ईडीकडून होत असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याबाबत दिल्ली हायकोर्टात केजरीवाल यांनी दाद मागितली होती. मात्र त्यावर निर्णय घेण्यास कोर्टाने नकार दिलाय यामुळे केजरीवाल यांना अटक होण्याची शक्यता आहे.

  • 21 Mar 2024 04:08 PM (IST)

    शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट

    मुंबई : साताऱ्याचे भाजपाचे आमदार शिवेंद्रराजे भोसले सागर बंगल्यावर दाखल झाले आहेत. माढा, बारामती नंतर साताऱ्याच्या जागेसंदर्भात खलबते सुरु आहेत. साताऱ्याचा उमेदवार अद्याप भाजपाने घोषित केला नाही. मात्र येथून उदयनराजे भोसले हे लोकसभेसाठी इच्छुक आहेत. तर, उदयनराजे विरुद्ध शिवेंद्रराजे हा वाद संपूर्ण महाराष्ट्राला माहित आहे. त्यामुळेच शिवेंद्रराजे भोसले यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली आहे.

  • 21 Mar 2024 03:24 PM (IST)

    चिराग पासवान सहपरिवार साई दरबारी

    शिर्डी – लोकजनशक्ती पार्टीचे अध्यक्ष चिराग पासवान सहपरिवार साई दरबारी पोहोचले आहेत. लोकसभा निवडणुकीच्या आधी चिराग पासवान यांनी साईबाबांच दर्शन घेतलं.

  • 21 Mar 2024 03:23 PM (IST)

    उद्धव ठाकरे यांचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा

    उद्धव ठाकरे यांचा आज कोल्हापूर आणि सांगली दौरा असणार आहे. उद्धव ठाकरे यांचं कोल्हापूर विमानतळावर आगमन झालं असून न्यू पॅलेस इथं शाहू छत्रपती महाराज यांची भेट घेणार आहेत. छत्रपती महाराज हे महाविकास आघाडीचे कोल्हापूरचे संभाव्य उमेदवार असू शकतात. छत्रपती महाराज यांच्यासाठी शिवसेनेने काँग्रेसला जागा सोडली आहे.

  • 21 Mar 2024 02:56 PM (IST)

    शेतकऱ्यांच्या खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो, आचारसंहितेचा भंग होतोय – रोहिणी खडसे

    खतांच्या बॅगांवर पंतप्रधानांचे फोटो आहेत. शहराच्या भिंती रंगून ठेवल्या आहेत. त्यामुळे हा आचारसंहितेचा भंग नाही का? असा सवाल राष्ट्रवादीच्या रोहीणी खडसे यांनी केला आहे.

  • 21 Mar 2024 02:52 PM (IST)

    लोकसभा जागेवरून शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मधला तणाव वाढला

    मिरजेतील आज पार पडणारया उद्धव ठाकरेंच्या जनसंवाद मेळाव्यावर बहिष्कार टाकण्याचा निर्णय काँग्रेसने घेतला आहे. मेळाव्याला उपस्थित राहण्यासाठी शिवसेना ठाकरे गटाकडून काँग्रेसला निमंत्रण देण्यात आलं होतं. मात्र काँग्रेसकडून निमंत्रण नाकारण्यात आले आहे.

  • 21 Mar 2024 02:37 PM (IST)

    या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल – प्रणिती शिंदे

    ही निवडणूक आपल्या सगळ्यांच्या आयुष्यातील महत्त्वाची निवडणूक आहे, ही निवडणूक करो या मरो अशी ठरणार आहे. या निवडणुकीत आपण योग्य मतदान नाही केले तर लोकशाही संपेल तर संविधान संपेल असे सोलापूर लोकसभेच्या उमेदवार कॉंग्रेसच्या प्रणिती शिंदे यांनी म्हटले आहे.

  • 21 Mar 2024 02:30 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका होत आहेत. शिवसेना लोकसभा पार्श्वभूमीवर निरीक्षक,खासदार आमदार, नेते आणि उपनेत्यांची बैठक संपली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती, निरीक्षकांचा अहवाल, ठरलेला जागावाटप फॉर्मुला व इतर विषयावर चर्चा झाली.

  • 21 Mar 2024 02:29 PM (IST)

    मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांची फेसबुक पोस्ट

    मनसेचे शहराध्यक्ष साईनाथ बाबर यांनी फेसबुक पोस्ट केली आहे. आजचा हा फोटो खूप काही सांगून जातो अशा आशयाची पोस्ट त्यांनी केली आहे. लोकसभा २०२४ त्यावर उल्लेख असून अमित ठाकरे आणि बाळा नांदगावकर यांचा फोटो आहे.

  • 21 Mar 2024 02:16 PM (IST)

    लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने मुंबईत आज शिवसेनेच्या मॅरेथॉन बैठका

    लोकसभा पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या वरळी येथे बैठका सुरु आहेत. निरीक्षक, खासदार, आमदार, नेते आणि उपनेत्यांची बैठक संपली आहे. लोकसभा निवडणुकीची रणनीती, निरीक्षकांचा अहवाल, जागावाटप फॉर्मुला आणि इतर विषयावर चर्चा झाली आहे.

     

  • 21 Mar 2024 01:56 PM (IST)

    निवडणूक आयोगाची केंद्र सरकारला नोटीस

    विकसित भारतचे मेसेज येत असल्याने नोटीस. हा आदर्श अचारसंहितेचा भंग असल्याने असे मेसेज पाठवू नयेत. नोटीसित उल्लेख. हे मेसेज येत असल्याने विरोधी पक्षांनी केली होती भाजपवर टीका

  • 21 Mar 2024 01:41 PM (IST)

    प्रमुख पदाधिकाऱ्यांसोबत भावना गवळी यांची बैठक

    यवतमाळ जिल्ह्यातील भावना गवळीच्या गटातील लोकप्रतिनिधी , तालुका प्रमुख, युवा सेना पदाधिकारी बैठकीला उपस्थित. आगामी लोकसभा निवडणुकी संदर्भात कश्या पध्दतीने प्रचार यंत्रणा राबवायची याबाबत बैठक

  • 21 Mar 2024 01:22 PM (IST)

    नितेश राणेंचा पोलिस पत्नींबाबतचा वक्तव्याचा पोलीस पत्नींकडून निषेध

    आज माटूंगा पोलीस ठाण्यात वरळी पोलीस कॅंपातील महिलांनी घेतली भेट. नितेश राणेवर कारवाई करण्यासाठी पोलिसांकडे केली तक्रार

  • 21 Mar 2024 01:08 PM (IST)

    लोकसभेच्या जागेसाठी महायुतीमध्ये रस्सीखेच सुरूच, भाजपाचे शिष्टमंडळ तिसऱ्यांदा मुंबईत

    भाजपा आमदार तानाजी मुटकुळे यांच्या नेतृत्वात तिसऱ्यांदा भाजपचे शिष्टमंडळ मेघदूत बंगल्यावर दाखल. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांची सायंकाळी चार वाजता मुंबई येथील मेघदूत बंगल्यावर भाजपाचे शिष्ट मंडळ घेणार भेट..

  • 21 Mar 2024 12:50 PM (IST)

    पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत- वसंत मोरे

    “मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी जाहीर झाल्यावर अनेक भाजप नेते म्हणाले की ही निवडणुक एकतर्फी करू. पण पुणेकर कधीच कुणाला एकतर्फी निवडून देत नाहीत. रवींद्र धंगेकर यांना मी शुभेच्छा देतो. त्यांच्या पक्षाने त्यांना तिकीट दिलं तर ते आमदारकीवरून खासदारकीसाठी लढवतील,” असं वसंत मोरे म्हणाले.

  • 21 Mar 2024 12:40 PM (IST)

    पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही- वसंत मोरे

    “महायुतीत जातील की नाही हे मला माहीत नाही. मी त्या पक्षातून बाहेर पडलो पण मनसेचे पुण्यातले जे साहेब लोक आहेत त्यांना याबद्दल विचारा,” असा टोला वसंत मोरे यांनी मनसे पदाधिकाऱ्यांना लगावला आहे. त्याचसोबत ते पुढे म्हणाले, “मी लोकसभा निवडणूक लढणारच आहे. पुण्याची निवडणूक एकतर्फी होणार नाही. मुंगी कितीही लहान असली तरी ती हत्तीचा चावा घेऊ शकते. मी अनेक मुद्दे घेऊन पुणेकरांसमोर जाणार आहे.”

  • 21 Mar 2024 12:30 PM (IST)

    निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

    निवडणूक आयोगाच्या आयुक्तांच्या नियुक्तीवर स्थगिती देण्यास सर्वोच्च न्यायालयाने नकार दिला आहे. याचिकांवर सुनावणी होईल पण स्थगितीसाठीचे दोन अर्ज फेटाळले आहेत. सर्वोच्च न्यायालयाने एका निकाल पत्राद्वारे निवडणूक आयोग त्यांच्या नियुक्ती समितीमध्ये पंतप्रधान विरोधी पक्ष नेते आणि सरन्यायाधीश असावेत असे निर्देश दिले होते. परंतु त्यानंतर सर्वोच्च न्यायालयाचा निकाल निरस्त करणारा कायदा केंद्र सरकारने संसदेत मंजूर करून घेतला आणि नियुक्ती समितीतून सरन्यायाधीशांना वगळलं. त्यानंतर नव्या नियुक्ती समितीने सुखविंदर संधू आणि ज्ञानेश कुमार या दोघांची निवडणूक आयुक्तपदी नियुक्ती केली.

    केंद्र सरकारच्या नव्या कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल झाल्या होत्या. तसंच कायदा आणि नियुक्तीवर स्थगिती देण्यासाठी अर्जही दाखल करण्यात आले होते. सर्वोच्च न्यायालयाने याचिकांवर सुनावणी होईल असं म्हटलं, पण कायदा आणि नियुक्तीवर स्थगिती देण्यास नकार दिला. त्याचसोबत स्थगितीसाठीचे अर्ज फेटाळले.

  • 21 Mar 2024 12:20 PM (IST)

    दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दाखल असलेल्या याचिका SC ने फेटाळल्या

    नवी दिल्ली- सुप्रीम कोर्टाने मोठा निर्णय सुनावला आहे. निवडणूक आयोगाच्या दोन नव्या निवडणूक आयुक्तांच्या नियुक्तीबाबत दाखल असलेल्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळल्या आहेत.

  • 21 Mar 2024 12:10 PM (IST)

    मनसे महायुतीत आल्यास जनतेलाही आवडेल- दरेकर

    मनसे महायुतीत आल्यास जनतेलाही आवडेल. बाळासाहेब ठाकरे यांचे खरे वारसदार राज ठाकरेच आहेत. राज ठाकरे सोबत येत असतील तर आम्हाला आनंदच होईल, अशी प्रतिक्रिया प्रविण दरेकर यांनी दिली.

  • 21 Mar 2024 12:00 PM (IST)

    जळगावचा लोकसभेचा शिलेदार कोण

    जळगाव लोकसभा मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाचा उमेदवार कोण हे गुलदस्त्यात आहे. ॲड. ललिता पाटील यांचं नाव आघाडीवर , डॉ.हर्षल माने, कुलभूषण पाटील यांच्या नावाचीही चर्चा मात्र अधिकृत घोषणा होईना.

  • 21 Mar 2024 11:53 AM (IST)

    नितेश राणे यांची संजय राऊत यांच्यावर टीका

    पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वर टीका करतील तेवढे ते खड्ड्यात जातील.एकीकडे मालकाच्या मुलाला वाचविण्यासाठी राऊत आणि त्याच्या मालकाची बायको दिल्ली वाऱ्या करत आहेत अशी टीका नितेश राणे यांनी संजय राऊत यांच्यावर केली.

  • 21 Mar 2024 11:43 AM (IST)

    मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात बैठक

    मनसे महायुतीमध्ये सहभागी होण्यासंदर्भात पुढच्या काही तासात घडामोडी घडणार आहेत. वांद्रे येथील ताज लॅन्डस एंड हॉटेलमध्ये एक बैठक होत आहे. महायुतीची ही महत्त्वाची बैठक सुरु आहे. या बैठकीला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि मनसे अध्यक्ष राज ठाकरे उपस्थित आहेत.

  • 21 Mar 2024 11:35 AM (IST)

    उद्धव ठाकरे गटाचा मिरजमध्ये मेळावा

    सांगली लोकसभा मतदारसंघाचा तिढा कायम असताना दुसरीकडे उद्धव ठाकरे गटाचे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचा मिरज दौरा निश्चित झाला आहे. या मिरज दौऱ्याचे निमित्त जरी शिवसेनेचा जनसंवाद मेळावा असला तरी सांगली लोकसभेच्या प्रचाराचा अप्रत्यक्ष शुभारंभ या निमित्ताने होणार असल्याची चर्चा आहे. यासाठी मिरज पंढरपूर रोडवरील कोळेकर मठाच्या जागेवर मेळाव्याची संपूर्ण तयारी झाली आहे.

  • 21 Mar 2024 11:20 AM (IST)

    प्रसाद लाड यांच्या कंपनीचा आयपीओ बाजारात

    प्रसाद लाड त्यांची क्रिस्टल कंपनी त्यांनी आपला आयपीओ लॉन्च झाला आहे. याविषयीची माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिली. गेल्या 25 वर्ष मेहतन घेऊन त्यांनी कंपनी उभी केली आहे. एखादी कंपनी लिस्ट होते त्यावेळेस गव्हर्नर्स आणि सीबीच्या सर्व परीक्षा पार होऊन त्यानंतर आयपीओ येत असतो. आयपीओच्या माध्यमातून इन्वेस्टरचा पैसा येत असतो, असे ते म्हणाले.

  • 21 Mar 2024 11:09 AM (IST)

    निवडणूक आयोगाचा अल्टिमेटम

    लोकसभा निवडणुकीचे पडघम वाजल्यानंतर निवडणूक आयोग आता ॲक्शन मोडवर आला आहे. पुढील 24 तासांत राज्य सरकारने बेकायदेशीर पोस्टर्स-बॅनर तात्काळ हटविण्याचा आदेश निवडणूक आयोगाने दिले आहेत.

  • 21 Mar 2024 11:01 AM (IST)

    उदयनराजे घड्याळावर निवडणूक लढवणार?

    खासदार उदयनराजे अजित पवार यांच्या नेतृत्वात घड्याळ्याच्या चिन्हावर लढणार का? राजधानी दिल्लीत याविषयीचा फैसला होणार आहे. उदयनराजे अमित शहा यांची भेट घेणार आहे. साताऱ्याच्या ऐवजी अजित पवार यांच्या पक्षाला म्हाड्याची जागा देण्याची शक्यता आहे.

  • 21 Mar 2024 10:55 AM (IST)

    राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांचं खोचक ट्विट

    आज देशभरात भाजपसाठी असलेली प्रतिकूल परिस्थिती बघता पराभवाच्या भीतीपोटी भाजपा आता छोटे छोटे मित्रपक्ष जोडत आहे. एकीकडे ४०-४० आमदार असलेल्या फुटीर गटांना जागावाटपाच्या वाटाघाटी करताना हवं ते मिळत नाही तर दुसरीकडे १-१ आमदार असलेल्या छोट्या पक्षांना मात्र भाजप पायघड्या अंथरतोय.

    असला #शाही_पाहुणचार बघून #छोटे_पक्ष मनातले मांडे खात असले तरी ‘उपयुक्तता असेपर्यंत वापरायचे आणि नंतर पूर्णतः संपवून आपले गुलाम बनवून फेकायचे’ या भाजपच्या मूळ स्वभावापासून मात्र ते अनभिज्ञ दिसतात.  राज ठाकरे आणि अमित शहा यांच्या भेटीवरून रोहित पवार यांनी हे खोचक ट्विट केलं आहे.

  • 21 Mar 2024 10:13 AM (IST)

    सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये नाराजी

    सांगली लोकसभेच्या जागेवरून महाविकास आघाडीतल्या शिवसेना ठाकरे गट आणि काँग्रेस मध्ये चांगलीच नाराजी आहे. या नाराजीचे सावट सांगलीत उद्धव ठाकरे यांच्या जनसंवाद मेळाव्यात देखील पाहायला मिळत आहे. मिरजेत पार पडणाऱ्या उद्धव ठाकरेंच्या मेळाव्याला काँग्रेसकडून न जाण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

  • 21 Mar 2024 10:05 AM (IST)

    भाजपला शरद पवारांना संपवायचं आहे – सरोज पाटील

    भाजपाचा संपूर्ण रोख शरद पवारांवर आहे. त्यांना शरद पवारांना संपवायचं आहे. – सरोज पाटील

  • 21 Mar 2024 10:03 AM (IST)

    आमच्या घरात फूट नाही – सरोज पाटील

    आमच्या घरात फूट नाही. अजित पवार बोलल्यानं दु:ख झालं. त्यांचा तोल सुटला. आता त्यांना पश्चाताप झाला असेल, अशी प्रतिक्रिया शरद पवार यांची बहीण सरोज पाटील यांनी दिली.

  • 21 Mar 2024 09:57 AM (IST)

    लोकसभा उमेदवारीसाठी पुण्यात आरती

    महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसचे अध्यक्ष कुणाल नितीन राऊत यांनी लोकसभा उमेदवारीसाठी पुण्यात आरती करणार आहेत. लोकसभेच्या उमेदवारीसाठी पुण्यात श्रीमंत दगडूशेठ हलवाई गणपतीची ते आरती करणार आहेत. युवक काँग्रेसच्या वतीने कुणाल राऊत यांच्या उमेदवारीसाठी दगडूशेठ गणपतीला युवक काँग्रेस साकडं घालणार आहे.

  • 21 Mar 2024 09:45 AM (IST)

    राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती

    भाजप नेते राजेंद्र मिरगणे यांची गृहनिर्माण मंत्रालयाच्या सल्लागारपदी नियुक्ती करण्यात आली आहे. यापूर्वी राजेंद्र मिरगणे यांची कॅबिनेट दर्जा असलेल्या गृहनिर्माण विकास महामंडळाच्या सहअध्यक्षपदी निवड झाली होती. राजेंद्र मिरगणे यांची ही निवड तीन वर्षांसाठी असून, हे अशासकीय पद आहे. गृहप्रकल्पाचा अभ्यास करून काळानुरूप त्यात बदल करण्याची आणि सुचवण्याची जबाबदारी मिरगणे यांच्याकडे आहे. गरिबांना परवडणारी घरे असावीत, तांत्रिक आणि आर्थिक बाबतीत सुलभता यावी यासाठीही हे पद आहे.

  • 21 Mar 2024 09:30 AM (IST)

    सुप्रिया सुळे पुणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर

    मी रोजच दौरा करते. मी 15 वर्ष असंच जगते आहे. माझ्यासाठी हे नवीन नाहीत. पक्षात अजून कोण कोण येणार आहेत मला माहिती नाही. पवार साहेब देशाचे मोठे नेते आहेत. त्यांचं अनेक वर्षाच राजकीय आणि सामाजिक काम आहे. त्यांनी शून्यातून विश्व निर्माण केलं आहे. अनेक सामाजिक बदल त्यांनी केलेले आहेत. लोकांचा त्यांच्यावर विश्वास आहे अनेक लोक येऊ इच्छित आहेत, असं सुप्रिया सुळे म्हणाल्या.

  • 21 Mar 2024 09:15 AM (IST)

    माढा मतदारसंघात मोहिते पाटील कुटुंबीयांचे दौरे वाढले

    माढा लोकसभा मतदार संघात मोहिते पाटील कुटुंबीयांचे दौरे वाढले आहेत. शिवतेजसिंह मोहिते-पाटील यांनी माढ्याचे काॅग्रेसचे माजी आमदार धनाजीराव साठे यांचेसह माढ्यातील नेते मंडळीच्या भेटी घेण्यास सुरुवात केली आहे.  कोणत्याही परिस्थितीत मोहिते पाटील कुटुंबीय येत्या निवडणुकीत लोकसभा निवडणुकीला सामोरे जाणार असल्याची  चर्चा आगे. शिवतेजसिंह यांनी माढ्यातील नेते मंडळी सोबत झालेल्या भेटी दरम्यान केल्याची माहिती समोर आली आहे.

  • 21 Mar 2024 08:59 AM (IST)

    Maharashtra News | महंत सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीत

    सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज श्रीराम शक्तीपीठ संस्थांचे आहेत महंत. आज पत्रकार परिषद घेऊन करणार अधिकृत घोषणा. शांतिगिरी महाराजांनंतर महंत सिद्धेश्वरानन्द सरस्वती महाराज देखील नाशिकच्या लोकसभा निवडणुकीच्या रिंगणात. साधू महंत नाशिक लोकसभा निवडणुकीत उतरल्याने निवडणूक चुरशीची ठरण्याचे अंदाज.

  • 21 Mar 2024 08:43 AM (IST)

    Maharashtra News | मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे जमेना

    मावळ लोकसभा मतदारसंघात महायुतीचे जमेना. निवड बैठकांच्या फेऱ्या. उमेदवारांचा जीव टांगणीला. लोकसभेचा मावळ मतदारसंघ महायुतीतील शिवसेना, भाजपला की राष्ट्रवादीला याबाबत अद्यापही अंतिम निर्णय झालेला नाही. शिवसेनेच्या जागेवर भाजप आणि राष्ट्रवादीचा दावा कायम आहे. यावर बैठका सुरू आहेत, तर इच्छुकांचा जीव टांगणीला लागलेला आहे.

  • 21 Mar 2024 08:28 AM (IST)

    National News | मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्यावर अटकेची टांगती तलवार ?

    आज ईडीकडून पुन्हा एकदा समन्स. 9 व्यांदा ईडीकडून अरविंद केजरीवाल यांना समन्स. अरविंद केजरीवाल पुन्हा एकदा कोर्टात. दिल्ली कोर्टात दाखल केली याचिका. ईडी कडून होत असलेल्या कारवाईला स्थगिती देण्याची मागणी. दिल्ली जल बोर्ड प्रकरणी केजरीवाल यांना दिलासा, पण कथित दारू घोटाळ्याप्रकरणी न्यायालय काय निर्देश देणार ?

  • 21 Mar 2024 08:14 AM (IST)

    Maharashtra News | बुलढाणा लोकसभा मतदार संघातील वातावरण तापले

    बुलढाण्यात महाविकास आघाडी आणि महायुतीचा उमेदवार अद्याप घोषित नाही. उद्धव ठाकरे यांनी सुद्धा कालच्या जनसंवाद यात्रेत उमेदवार घोषित केला नाही. उबाठाकडून संभाव्य उमेदवार म्हणून प्रा नरेंद्र खेडेकर यांचे नाव चर्चेत. मतदारांत संभ्रमावस्था कायम. आघाडीत काँग्रेसने ही केला दावा. शिवसेना उबाठा आणि काँग्रेसमध्ये रस्सीखेच सुरू. अपक्ष उमेदवार रविकांत तुपकर यांचा प्रचार सुरू.

  • 21 Mar 2024 07:54 AM (IST)

    Marathi News | निवडणूक आयोग अलर्ट, बॅनर हटवण्याचे आदेश

    लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर केंद्रीय निवडणूक आयोग अलर्ट झाले आहे. मतदारांना आकर्षित करण्यासाठी राजकीय पक्षांनी लावलेले होर्डिंग्ज, बॅनर 24 तासांत हटवण्याचे आदेश आयोगाने काढले आहेत. आज संध्याकाळपर्यंत सर्व राज्यांना याबाबतचा अहवाल निवडणूक आयोगाकडे सादर करावा लागणार आहे.

  • 21 Mar 2024 07:44 AM (IST)

    Marathi News | पुण्यात आरएसएसची लोकसभा निवडणुकीसाठी तयारी

    पुण्यात लोकसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाची मोठी तयारी सुरु आहे. 100 टक्के मतदानासाठी संघ घरोघरी जाणार आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर मतदान वाढवण्यासाठी संघाचे घरोघर संपर्क अभियान सुरु झाले आहे.

  • 21 Mar 2024 07:30 AM (IST)

    Marathi News | काँग्रेस उमेदवारांची यादी आज जाहीर होणार

    लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेस पक्षाकडून आज उमेदवारांची तिसरी यादी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रासह तामिळनाडू झारखंड राज्यातील उमेदवारांची यादी जाहीर होणार आहे. महाराष्ट्रातील 12 उमेदवारांची यादी आज येण्याची शक्यता आहे.

  • 21 Mar 2024 07:18 AM (IST)

    Marathi News | महायुतीची आज बैठक

    महायुतीच्या जागा वाटपसाठी आज नवी दिल्लीत बैठक होणार आहे. यामध्ये गेल्या काही दिवसांपासून रखडलेले जागा वाटप पूर्ण होणार आहे. भाजपने यापूर्वीच आपल्या २० उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. परंतु राष्ट्रवादी आणि शिवसेनेकडून अद्याप अधिकृत उमेदवार जाहीर केले नाही.