राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली आहे. या बैठकीत काही महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले आहेत. राज्य सरकारने नुकतंच मुलींच्या मोफत शिक्षणाची घोषणा केली होती. उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थीनींची संख्या वाढावी या उद्देशाने राज्य सरकारने याबाबतचा निर्णय घेण्यात आला होता. यानंतर राज्य सरकारने आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत आणखी एक मोठा निर्णय घेतला आहे. हा निर्णय व्यावसायिक अभ्यासक्रमाचं शिक्षण घेणाऱ्या मुलींसाठी घेण्यात आला आहे.
व्यवसायिक अभ्यासक्रमास प्रवेश घेणाऱ्या आर्थिक दृष्ट्या दुर्बल घटक (ईडब्ल्यूएस), सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास प्रवर्ग(एसईबीसी) तसेच इतर मागास प्रवर्गातील (ओबीसी) मुलींना शिक्षण शुल्क आणि परीक्षा शुल्कामध्ये ५० टक्के ऐवजी आता १०० टक्के शिक्षण शुल्क प्रतिपूर्ती मंजूर करण्यात आली आहे. राज्य सरकारचा हा निर्णय म्हणजे EWS, SEBC आणि OBC विद्यार्थीनींच्या कुटुंबियांना मिळालेला मोठा दिला आहे.
दरम्यान, राज्य मंत्रिमंडळ बैठकीत सभापती निवडीबाबतही चर्चा झाल्याची शक्यता आहे. विधान परिषदेचं सभापती पद सध्या रिक्त आहे. उपसभापती नीलम गोऱ्हे या सध्या कार्यवाहू सभापती आहे. आता सभापतीच्या निवडीबाबतही लवकरच निर्णय होण्याची शक्यता आहे. सभापती निवडीबाबत राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत चर्चा करावी लागते आणि त्यानंतर निर्णय घ्यावा लागतो. सभापती पदाच्या उमेदवारीवर भाजप ठाम आहे. भाजपकडून प्रवीण दरेकर, राम शिंदे आणि निरंजन डावखरे यांच्या नावाची चर्चा आहे, अशी भाजपच्या वरिष्ठ मंत्र्याची माहिती आहे.