मुंबई | 13 मार्च 2024 : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली आज मंत्रिमंडळाची बैठक पार पडली. मंत्रालयात पार पडलेल्या आजच्या बैठकीत 25 पेक्षा जास्त अतिशय महत्त्वाचे निर्णय घेण्यात आले. यामध्ये एक शहर, एक तालुका आणि मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याचा अर्थात नामांतराचे निर्णय घेण्यात आले आहेत. उपमुख्यमंत्री अजित पवार गेल्या अनेक दिवसांपासून पुणे जिल्ह्यातील वेल्हे तालुक्याच्या नामांतरणासाठी प्रयत्नशील होते. वेल्हे तालुक्यात राजगड, तोरणासारखे महत्वाचे ऐतिहासिक किल्ले आहेत. राजगड किल्ल्यावरुन छत्रपती शिवाजी महाराजांनी 27 वर्षे स्वराज्याचा कारभार केला. त्यामुळे वेल्हे तालुक्याचं नाव राजगड करावं, अशी उपमुख्यमंत्र्यांची इच्छा होती. त्यांनी या मागणीसाठी पाठपुरावादेखील केला. त्यानंतर आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत या मागणीवर शिक्कोर्तब झालं. वेल्हे तालुक्याचं नामांतर राजगड असं करण्यात आलंय. तसेच अहमदनगर शहराचं नांमातर पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर असं करण्यास आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत मान्यता देण्यात आली आहेत. तसेच मुंबईतील 8 रेल्वे स्थानकांची नामांतरण करण्याचा निर्णय आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला.
खासदार राहुल शेवाळे यांनी मुंबईतील आठ रेल्वे स्थानकांची नावे बदलण्याची मागणी केली होती. राहुल शेवाळे यांनी या रेल्वे स्थानकांची नावे पत्राद्वारे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पाठवली होती. राहुल शेवाळे यांनी पत्रात नामांतर करण्यामागची कारण सांगितलं होतं. या आठही रेल्वे स्थानकांना ब्रिटीश कालीन नावं आहेत. त्यातील अनेक रेल्वे स्थानकांची नावे अपभ्रंश होऊन वेगळंच नाव स्थानिक आणि प्रवाशांकडून घेतलं जातं. तसेच रेल्वे स्थानक असलेल्या परिसराचा इतिहास पाहून नामांतर करण्याचा निर्णय घेण्यात यावा, अशी मागणी राहुल शेवाळे यांनी केली होती. तसेच राहुल शेवाळे यांनी रेल्वे स्थानकांसाठी नावे देखील सूचवली होती. त्यांच्या या विनंतीस आजच्या बैठकीत मान्यता देण्यात आली आहे.