मुंबई : मंत्रिमंडळाच्या विस्तारासंदर्भात मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या बैठका झाल्यात. या बैठकीत उर्वरित विस्तार आणि जागा वाटपासंदर्भात समीकरण ठरल्याची माहिती आहे. तर फोन आला की लगेच शपथविधीसाठी जाणार, असं भरत गोगावले म्हणालेत. मंत्रिमंडळाचा विस्तार उद्या होणार, परवा होणार असं शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार सांगतायत. मात्र एवढंच खरं आहे की, विस्तार कधीही होऊ शकतो. कारण मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हालचाली वाढल्यात.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानी रात्री 2 वाजेपर्यंत मुख्यमंत्री शिंदे, उपमुख्यमंत्री फडणवीस आणि अजित पवारांमध्ये बैठक झाली. तिघांची 2 तास बैठक झाल्यानंतर अजित पवार निघाले आणि पुन्हा शिंदे-फडणवीसांमध्ये अर्धा तास बैठक झाली. पुन्हा अजित पवार आणि प्रफुल्ल पटेल उपमुख्यमंत्री फडणवीसांच्या सागर बंगल्यावर आले. जवळपास सव्वा तास दोघांमध्ये चर्चा झाली.
तसंच शिंदेंच्या शिवसेनेचे आमदार आणि मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत असलेले भरत गोगावले, संजय शिरसाट आणि महेंद्र थोरवे यांनी मुख्यमंत्री शिंदे यांची वर्षा निवासस्थानी भेट घेतली. या भेटीनंतर, आपण शपथविधीसाठी तयारच आहोत. एक फोन आला की निघणार अशी प्रतिक्रिया भरत गोगावले यांनी दिली. अपक्ष आमदार आणि शिंदेंसोबत आलेले बच्चू कडूंनी आता आपण मंत्रिपदाचा विचारच करत नसल्याचं म्हटलंय.
10 दिवसांआधी अजित पवार गटाला सोबत घेऊन 9 मंत्र्यांचा शपथविधी झाला. मात्र अद्याप त्यांचंही खाते वाटप झालेलं नाही. पण आता उर्वरित विस्तारानंतर एकत्रच खातेवाटप होईल, अशी माहिती आहे. तर अजित पवार यांच्या गटाला भाजपच्याच कोट्यातली मंत्रिपदं मिळणार अशी माहिती आहे.
अजित पवार गटाला अर्थ खातं, ग्रामविकास खातं, अल्पसंख्याक विकास, महिला आणि बालकल्याण, अन्न-नागरी पुरवठा, कामगार खातं मिळण्याची शक्यता आहे. सध्या 14 मंत्रिपदं शिल्लक आहेत. मात्र येत्या विस्तारात भाजप आणि शिंदे यांच्या शिवसेनेला 7-7 मंत्रिपदं मिळतील असा दावा भरत गोगावले यांनी केला आहे.
अजित पवार यांनी आपल्याला आणखी मंत्रिपदं मिळणार असल्याचं जाहीरपणे आमदारांच्या बैठकीत सांगितलंय. उर्वरित 14 मंत्रिपदांमध्ये भाजपलाच अधिक वाटा मिळेल अशीच शक्यता आहे. शिंदे यांच्या शिवसेनेचे मंत्री उदय सामंतांच्या बोलण्यातूनही तेच दिसतंय. संख्येनुसार किती मागावं हे तिन्ही पक्षाला कळतं असं सामंत म्हणालेत.