मुंबई | 10 ऑक्टोबर 2023 : राज्य मंत्रिमंडळाची आज महत्त्वाची बैठक पार पडली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली ही बैठक पार पडली. या बैठकीत विविध भागांसाठी महत्त्वाचे मोठे निर्णय घेण्यात आले आहेत. या बैठकीत मुलींसाठी अतिशय महत्त्वाचा निर्णय घेण्यात आलाय. महिला आणि बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी राज्य मंत्रिमंडळात मुलींसाठी घेण्यात आलेल्या निर्णयाची माहिती दिली. “मार्च 2023 च्या आर्थसंकल्पीय अधिवेशनात लेक लाडकी योजनेची घोषणा केली होती. त्याचा आज अंतिम प्रस्ताव मंत्रिमंडळ बैठकीत सादर करण्यात आला”, अशी माहिती मंत्री अदिती तटकरे यांनी दिली.
“लेक लाडकी योजनेबाबत जो प्रस्ताव सादर झाला, त्याला मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मंत्रिमंडळाने मान्यता दिलीय. 1 लाख 1 हजार अशी रक्कम मुलींना दिली जाणार आहे. त्यामुळे आजपासून ही योजना राज्यात लागू होईल. मूळ संकल्पना अशी होती की, मुलीचा जन्म झाल्यानंतर ती 18 वर्षाची होईपर्यत ही मदत टप्प्या टप्प्यात होणार आहे”, अशी माहिती अदिती तटकरे यांनी दिली.
“मुलींचा जन्मदर वाढण्यासाठी ही योजना आहे. नवरात्रीच्या पार्श्वभूमीवर आम्ही या योजनेची सुरुवात करत आहोत. मुलींना सक्षम करण्यासाठी ही योजना आहे. मुख्यमंत्री महिला सशक्तीकरण अभियान याला देखील मागच्या मंत्रिमंडळात मान्यता मिळाली”, असं अदिती तटकरे यांनी सांगितलं.
लेक लाडकी योजनेतून महाराष्ट्रातील गरीब कुटुंबातील मुलींना आर्थिक मदत केली जाणार आहे. विशेषत: पिवळ्या आणि केशरी रेशनकार्डधारक कुटुंबातील मुलींना या योजनेचा लाभ मिळणार आहे. या योजनेअंतर्गत मुलीला जन्मानंतर 5000 रुपये दिले जातील. त्यानंतर टप्प्याटप्प्यानुसार राज्य सरकारकडून मदत केली जाईल.
मुलगी पहिली इयत्तेत गेल्यानंतर तिला 4000 रुपयांची मदत केली जाईल. त्यानंतर मुलगी सहावीत गेल्यानंतर 6000 रुपयांची आर्थिक मदत सरकारकडून केली जाईल. तसेच मुलगी अकरावीत गेल्यानंतर 8000 रुपयांची आर्थिक मदत केली जाईल. मुलगी 18 वर्षांची झाल्यानंतर तिला महाराष्ट्र सरकारकडून 75,000 रुपयांची आर्थिक मदत दिली जाईल.