टीम इंडिया मुंबईत, मरीन ड्राईव्हला तुफान गर्दी, एकनाथ शिंदे म्हणाले….

| Updated on: Jul 04, 2024 | 8:01 PM

"संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल असं यश टीम इंडियाने मिळवलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. टीम इंडिया आणि खेळाडूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ नये यासाठी मी पोलिसांना सूचना केल्या आहेत", अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली.

टीम इंडिया मुंबईत, मरीन ड्राईव्हला तुफान गर्दी, एकनाथ शिंदे म्हणाले....
टीम इंडिया मुंबईत, मरीन ड्राईव्हला तुफान गर्दी, एकनाथ शिंदे म्हणाले....
Follow us on

टीम इंडिया मुंबईत दाखल झाली आहे. मुंबईत भव्य विजयी यात्रा आयोजित करण्यात आली आहे. या विजयी यात्रेसाठी लाखो क्रिकेट प्रेमी मरीन ड्राईव्ह परिसरात दाखल झाले आहेत. मरीन ड्राईव्ह परिसरात रस्त्याच्या दुतर्फा प्रचंड मोठी गर्दी आहे. विशेष म्हणजे आज दुपारपासून ही गर्दी बघायला मिळत आहे. क्रिकेट प्रेमींची ही गर्दी पाहता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे सतर्क झाले आहेत. गर्दीमुळे कोणताही गैरप्रकार, अनपेक्षित किंवा अनुचित घटना घडू नये यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुढे सरसावले आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गर्दीची दखल घेत मुंबईचे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना फोन करत महत्त्वाचे आदेश दिले आहेत. दरम्यान, टीम इंडियाची विजयी यात्रा सुरु झाली आहे. या यात्रेवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी प्रतिक्रिया दिली. एकनाथ शिंदे यांनी टीम इंडियाचं मुंबईत स्वागत केलं आहे.

एकनाथ शिंदे यांनी आज ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी टीम इंडियाचं मुंबईत स्वागत असल्याचं म्हटलं आहे. “टीम इंडियाचं मी मनापासून स्वागत करतो. टीम इंडियाचं अभिनंदन करावं तेवढं कमी आहे. मरीन ड्राईव्हच्या परिसरात गर्दी उसळली आहे. सागराच्या बाजूलाच मुंबईकरांचा महासागर उसळला आहे. त्यांचंही मनापासून मी अभिनंदन करतो”, असं एकनाथ शिंदे म्हणाले.

“आपल्या लाडक्या टीम इंडियाचं स्वागत करताना मुंबईकरांकडून ज्या भावना व्यक्त होत आहेत ते आपण पाहत आहोत. संपूर्ण देशवासियांना अभिमान वाटेल असं यश टीम इंडियाने मिळवलं आहे. त्यांचं मी मनापासून स्वागत करतो. टीम इंडिया आणि खेळाडूंची कोणतीही गैरसोय होऊ नये, त्यांच्या चाहत्यांची गर्दी होऊ नये यासाठी मी पोलिसांना सूचना केल्या आहेत. व्यवस्थित नियोजन करा आणि सुरक्षितपणे या उत्साहाचा आनंद लोकांना घेऊ द्या”, अशी प्रतिक्रिया एकनाथ शिंदे यांनी दिली.

मुख्यमंत्र्यांच्या पोलीस आयुक्तांना सूचना

दरम्यान, भारतीय क्रिकेट संघाच्या स्वागतासाठी जमलेल्या क्रिकेट प्रेमींच्या गर्दींचे संनियत्रण करण्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मुंबई पोलीस आयुक्तांना निर्देश दिले आहेत. विजयवीर संघाच्या स्वागतासाठी वानखेडे स्टेडियम तसेच नरीमन पॉईंट ते वानखेडे स्टेडियम दरम्यान, मरिन ड्राईव्ह या परिसरात मोठी गर्दी झाली आहे. या गर्दीमुळे वाहतुक विस्कळीत होऊ नये तसेच जमलेल्या क्रिकेट प्रेमींना कोणताही त्रास होऊ नये याकडे मुंबई पोलीस दल आणि संबंधित यंत्रणांनी लक्ष पुरवावे, अनुषांगिक उपाययोजना कराव्यात, अशा सूचना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दुरध्वनीद्वारे पोलीस आयुक्त विवेक फणसाळकर यांना दिल्या आहेत.