मुंबई | 4 सप्टेंबर 2023 : मराठवाड्यातील मराठा समाजाच्या नागिराकांना कुणबी जातीचं प्रमाणपत्र देवून ओबीसीचं आरक्षण द्यावं, अशी उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांची मागणी आहे. विशेष म्हणजे शिवसेना नेते अर्जुन खोतकर यांनी मनोज जरांगे यांची भेट घेवून याबाबतचा मसुदा दाखवला. मनोज जरांगे यांनी काही दुरुस्ती सुचवली. त्यानंतर खोतकर आज मुंबईसाठी रवाना झाले आहेत. याबाबत उद्या जीआर काढला जाईल. त्यानंतर जीआर घेऊन आपण उपोषणस्थळी येऊ, असं खोतकर म्हणाले. पण त्यांच्या या वक्तव्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी वेगळीच प्रतिक्रिया दिली.
“कुणबी समाजाच्या दाखल्यासंदर्भात चर्चा झाली. महसूल विभागाचे अतिरिक्त सचिव काम करत आहे. मनोज जरांगे पाटील यांची जुन्या नोंदी आहेत. त्यांना दाखले मिळायला अडचणी येत आहेत. आम्ही समिती तयारी केली आहे. त्या समितीकडून अहवाल मागवला आहे. त्यांच्या कुणबी प्रमाणपत्राच्या मागणीवर आम्ही युद्ध पातळीवर काम करतोय”, असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं.
“आमचे मंत्री गिरीश महाजन जातील. चर्चेतून विषय सुटतील. मनोज जरांगे पाटील यांना आवाहन आहे की, मराठा समाजाला आरक्षण देण्यासाठी आम्ही सकारात्मक आहोत. आमचीदेखील तीच भूमिका आहे. जुने रेकॉर्ड्स आहेत ते तपासायला थोडा वेळ लागतो. त्यामुळे महिन्याभराच्या आत पूर्ण माहिती आल्यानंतर त्यावर कायदेशीर कार्यवाही करुन त्यांच्या मागणीवर सकारात्मक निर्णय होईल, असा विश्वास व्यक्त करतो”, असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. तसेच “मराठा कार्यकर्त्यांवरील गुन्हे मागे घेण्यात येतील”, अशी मोठी घोषणा मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली.
मराठा आरक्षण उपसमितीची आज महत्त्वपूर्ण बैठक झाली. या बैठकीत काय-काय घडलं? याविषयी मुख्यमंत्र्यांनी माहिती दिली. “आम्ही आज उच्च स्तरीय बैठक घेतली. जालन्यात उपोषण, त्यानंतर दुर्देवी घटना, त्याबाबत मी स्वत: उपोषणकर्ते मनोज जरांगे पाटील यांच्याशी बोललं होतो. त्यांना सांगितलं होतं की, सरकार तुमच्या मागणीवर गांभीर्याने काम करतो. अनेक दिग्गज मंत्री आणि नेत्यांना तिथे चर्चेसाठी पाठवलं होतं”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“मराठा समाजाचे 58 मोर्चे अतिशय शिस्तबद्ध पद्धतीने निघाले. पण दुर्देवाने दोन-तीन दिवसात जे काही सुरु आहे, मराठा समाज शिस्तबद्ध आहे. याचा अनुभव आपल्याला गेल्या काही वर्षांमध्ये आला. पण आंदोलनाच्या आडून महाराष्ट्रातील शांतता भंग करु इच्छूणाऱ्यांपासून सावध भूमिका घेतली पाहिजे”, असं आवाहन मुख्यमंत्र्यांनी केलंय.
“मी उदयनराजे यांचे धन्यवाद मानतो. त्याचबरोबर संभाजीराजे देखील गेले. त्यांनीही शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला. जरांगे पाटील यांच्या जीवाची काळजी सरकारला आहे. त्यांना रुग्णालयात दाखल करण्यासाठी अधिकारी गेले, पण दुर्देवाने प्रकार घडला. आम्हालाही त्याचं दु:ख आहे”, अशी भावना मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली.
“सरकार सर्वसामान्यांच आहे. अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलं. मराठा समजाला आरक्षण मिळालं होतं. पण वर्षभराने सरकार बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टात ते आरक्षण रद्द झालं. उद्धव ठाकरे आणि अशोक चव्हाण यांनी जे भाष्य केलं पण सत्तेत असताना त्यांचे हात कुणी बांधले होते?”, असा सवाल मुख्यमंत्र्यांनी केला.
“मराठा समजाला आरक्षण मिळालं पाहिजे ही सरकारची प्रामाणिक भूमिका होती. कोर्टात काही बाबी ते सरकार आणू शकलं नाही. भोसले समिती आणि सरकार त्रुटी दूर करण्याचं काम सुरु आहे. मराठा समाज मागास नाही, असं सुप्रीम कोर्टाने म्हटलं आहे. त्यावर आपलं काम सुरु आहे. अधिसंख्य पदाचा विषय आला. 3700 विद्यार्थी होते. पण याबाबत निर्णय घेतला गेला नाही. मी मुख्यमंत्री झाल्यानंतर सर्व विद्यार्थ्यांसाठी निर्णय घेतला. राज्याचा प्रमुख म्हणून इच्छाशक्ती असावी लागते. काय-काय घटना घडलंय ते मी आज बोलणार नाही”, असं मुख्यमंत्री यावेळी म्हणाले.
“आम्ही 3700 विद्यार्थ्यांना सरकारी नोकरीत कामावर रुजू केलं. अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळाला कर्ज दिलं. सारथीच्या माध्यमातून अनेक निर्णय घेतोय. परदेश शिष्यवृत्ती आपण भरतोय. युपीएससीचे 51 मुलांची निवड झालीय. तसेच 300 पेक्षा जास्त मुलांची निवड झालीय. सरकार यावर काम करतंय”, असं मुख्यमंत्री म्हणाले.
“आतादेखील मराठा समाजाला आरक्षण मिळालं पाहिजे ते कायद्याने टिकलं पाहिजे. आम्हाला कुणाची फसवणूक करायची नाही. मराठा समाजाला आरक्षण देण्याची भूमिका युती सरकारच्या काळात आम्ही करुन दाखवलं होतं. आम्ही आयोगाला सूचना केल्या आहेत.”
“त्रुटी दूर करण्यासाठी ज्या गोष्टी लागतील ते करायचं काम सरकार करत आहे. त्यासाठी सरकार कुठेही मागे राहणार नाही. फक्त मराठा समाजाने संयम राखण्याची आहे. मराठा समाज पुढारलेला आहे. पण आर्थिक आणि सामाजिक दृष्टीने मागासलेला आहे. आपल्याला ते सुप्रीम कोर्टात सिद्ध करावं लागेल. त्यावर आम्ही काम करतोय.”
“आम्ही मराठा समाजाला विनंती आहे की, सरकार मराठा समाजाला आरक्षण देण्याच्या बाजूने आहे. मराठा समाजाला लाभ मिळाला पाहिजे. तोपर्यंत विद्यार्थ्यांना लाभ देण्याचा प्रयत्न सरकारचा असेल. विविध योजनांच्या माध्यमातून सरकार मदत करत राहणार आहे.”
“जे लोकं मराठा समाजाच्या आंदोलनाचा फायदा घेऊन राजकीय पोळी भाजपत आहे त्यांच्यापासून सावध राहिलं पाहिजे. संभाजीराजे, उदयनराजे यांनी आंदोलकाच्या प्रकृतीबाबत चिंता व्यक्त केली. बाकी लोकं सरकारला बदनाम करण्याचं एककलमी कार्यक्रम करत होतं. आम्हाला कोणतंही राजकारण करायचं नाही.”
“जी घटना घडली त्याबाबतीत एसपी सतीश जोशी यांना जिल्ह्याबाहेर पाठवण्याचा निर्णय घेतला. नव्या अधिकाऱ्याने चार्च घेतलेला आहे. याची सखोल चौकशी पोलीस महासंचालक करत आहेत. तसेच अॅडीशनल डीजी माहिती घेतील. पोलीस महासंचालकांच्या माध्यमातून पूर्ण चौकशी करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. त्या दोषींवर कारवाई करण्याचा निर्णय आम्ही घेतलेला आहे. मराठा कार्यकर्त्यांना कुठलाही त्रास होणार नाही.”