मुंबई : पश्चिम बंगाल विधानसभा निवडणुकीचा निकाल आज जाहीर होतोय. गेल्या वर्षभरापासून या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बंगालमधील राजकीय घडामोडींना वेग आला होता. अखेर या निवडणुकीच्या निकाल आता समोर येत असून पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर दिसत आहे. विशेष म्हणजे ममता बॅनर्जी यांनी नंदीग्राम मतदारसंघातून यावेळी निवडणूक लढवली होती. भाजपचे उमेदवार शुभेंदू अधिकारी आणि ममता यांच्यात या मतदारसंघात कांटे की टक्कर बघायला मिळाली. मात्र, अटीतटीच्या लढतीत अखेर ममता यांचा 3 हजार 727 मतांनी विजय झाला. याशिवाय तृणमूल काँग्रेस बंगालमधील आपलं वर्चस्व राखण्यात यशस्वी ठरल्याचं आता समोर येत आहे. ममता यांच्या विजयानंतर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी त्यांचं अभिनंदन केलं आहे.
उद्धव ठाकरे नेमकं काय म्हणाले?
“ममता बॅनर्जी या बंगाली जनतेच्या स्वाभिमानाचा लढा एकाकी लढत होत्या. त्यांच्या हिमतीला दाद द्यावीच लागेल. अखेर त्यांचा विजय झालाच आहे. या विजयाचे संपूर्ण श्रेय बंगालच्या या वाघिणीलाच द्यावे लागेल. पंतप्रधानांपासून गृहमंत्र्यांपर्यंत संपूर्ण केंद्र सरकार, राज्यांची सरकारे ममता दीदींच्या पराभवासाठी पश्चिम बंगालच्या भूमीवर एकवटली. त्या सर्व शक्तींची धूळदाण उडवत ममता दीदींनी विजय मिळवला. मी त्यांचे व हिंमतबाज पश्चिम बंगाली जनेतेचे मनापासून अभिनंदन करतो. आता राजकारण संपले असेल तर सगळ्यांनी मिळून कोरोनाविरुद्धच्या लढाईकडे लक्ष देऊया”, अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे (CM Uddhav Thackeray congratulate Mamata Banerjee).
संजय राऊतांकडूनही अभिनंदन
दरम्यान, शिवसेनेचे राज्यसभेचे खासदार संजय राऊत यांनी देखील ममता बॅनर्जी यांचे अभिनंदन केले आहे. “एका स्त्रीने जिला आम्ही बंगालची वाघीण म्हणतो. ती निवडणुकीच्या काळात जखमी झाली. व्हिलचेअर फिरत होती. मात्र तिने बंगालमध्ये एकहाती विजय प्राप्त केला. हा विजय देशाच्या राजकारणाला दिशा देणारा आहे. बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल,” असे संजय राऊत म्हणाले.
बंगालमध्ये तृणमूल सर्वाधिक तर भाजप 81 जागांवर आघाडीवर
पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत समोर आलेल्या आकडेवारीनुसार मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांचा तृणमूल काँग्रेस पक्ष सर्वाधिक जागांवर आघाडीवर आहे. तृणमूल काँग्रेस सध्या 209 जागांवर आघाडीवर आहे. तर भाजप 81 जागांवर आघाडीवर आहे. विशेष म्हणजे बंगालमधील नंदीग्राम या मतदारसंघातून ममता बॅनर्जी यांनी निवडणूक लढवली होती. अत्यंत प्रतिष्ठेची ही निवडणूक होती. कारण या मतदारसंघातून भाजपकडून तेथील विद्यमान आमदार शुभेंदू अधिकारी यांनी निवडणूक लढवली होती. या मतदारसंघातील निवडणूक शेवटपर्यंत अटीतटीची राहिली. अखेर ममता बॅनर्जी 3727 मतांनी विजयी झाल्या. दुसरीकडे या निवडणुकीत बंगालमध्ये काँग्रेस आणि डाव्या पक्षांना प्रचंड कमी जागा मिळताना दिसत आहेत. बंगालमध्ये काँग्रेस दोन तर इतर एका जागेवर आघाडीवर आहेत.
संबंधित व्हिडीओ :
हेही वाचा : जखमी वाघीण नेटाने लढली, बंगालच्या विजयाची मशाल देशभर प्रकाश पाडेल : संजय राऊत