‘तेव्हा सत्यजीत तांबे यांना विधानसभा लढवायची इच्छा होती?’, काँग्रेसचा अधिकृतपणे गौप्यस्फोट

| Updated on: Feb 04, 2023 | 9:17 PM

सत्यजीत तांबे यांच्या आरोपांवर महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी प्रतिक्रिया दिली. यावेळी त्यांनी सत्यजीत तांबे यांनी सहा महिन्यांपूर्वी विधानसभा निवडणूक लढवण्याची इच्छा व्यक्त केली होती, असं सांगितलं.

तेव्हा सत्यजीत तांबे यांना विधानसभा लढवायची इच्छा होती?, काँग्रेसचा अधिकृतपणे गौप्यस्फोट
Follow us on

मुंबई : नाशिक पदवीधर मतदारसंघातून नुकतंच निवडून आलेले आमदार सत्यजीत तांबे (Satyajeet Tambe) यांनी काँग्रेसच्या महाराष्ट्र प्रदेश कार्यालयावर गंभीर आरोप केले. आपल्याला चुकीचे एबी फॉर्म देण्यात आले. तसेच आपल्या परिवाराला बदनाम करण्याचे षडयंत्र होतं, असा देखील आरोप सत्यजीत तांबे यांनी केला. त्यांच्या आरोपांवर आता महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसकडून अधिकृतपणे उत्तर देण्यात आलं आहे. महाराष्ट्र प्रदेश काँग्रेसचे मुख्य प्रवक्ते अतुल लोंढे (Atul Londhe) यांनी याबाबत प्रतिक्रिया दिली. “माझ्या वडिलांच्या जागेवर मी का लढू?, असं सत्यजीत तांबे बोलले. फॉर्म उशिरा मिळाला, असं त्यांनी सांगितलं नव्हतं. याशिवाय फॉर्म मिळाल्यानंतर सत्यजीत तांबेंनी ओके उत्तर पाठवलं होतं”, असं अतुल लोंढे यांनी सांगितलं. तसेच “सहा महिन्यांपूर्वी सत्यजीत तांबे मला भेटल्यावर म्हणाले की, मी माझ्या वडिलांच्या जागेवर का लढू? मी विधानसभा लढवेन,” असं अतुल लोंढे म्हणाले.

“सत्यजीत तांबे यांनी बाहेर येऊन काय बोलावं की, मी भाजपची मतं घेणार आहे? आमचे नेते राहुल गांधी वैचारिक लढा लढत आहेत. देशामध्ये वैचारिक सुरु आहे. लोकशाही धोक्यामध्ये आहे. या देशामध्ये संविधान अडचणीत आहे. त्याला मोदी-शाह कारणीभूत आहेत. दुसरीकडे काँग्रेसचे निष्ठा असलेली व्यक्ती म्हणते की, मी भाजपची मतं घेईन. हे पॉलिटकली तरी मान्य करु शकतं का?”, असा प्रश्न अतुल लोंढे यांनी उपस्थित केला.

हे सुद्धा वाचा

‘सत्यजित तांबे म्हणाले, मी विधानसभा लढवेन’

“ते निवडून आले. एक तरुण आमदार निवडून आला याचा सर्वांना आनंदच आहे. किंवा त्यांनी आमदार व्हावं हे आम्हाला मान्य आहे. सहा महिन्यांपूर्वी आमची भेट झाली. मी त्यांना सांगितलं की, तुम्ही वडिलांच्या जागेवर आता सभागृहात यावं. ते म्हणाले माझ्या वडिलांचा जागा मी का घेऊ? मी विधानसभा लढेन”, असं अतुल लोंढे यांनी सांगितलं.

ज्या गोष्टी पक्षाच्या आतमध्ये व्हायला पाहिजेत त्या पक्षाच्या आतमध्येच व्हायला हव्यात. आतापर्यंत मी मुख्य प्रवक्ता म्हणून काहीच प्रतिक्रिया दिलेली नाही. पण पक्षावर जे आरोप झाले त्यावरुन जनतेसमोर वस्तुस्थिती समोर यावी, यासाठी भूमिका मांडत आहे, असं अतुल लोंढे यांनी स्पष्ट केलं.

एबी फॉर्म मिळाल्यावर सत्यजीत तांबे यांचा ओके मेसेज आला. याचाच अर्थ त्यांना योग्य वेळेत योग्य फॉर्म मिळाला. फॉर्म मिळाला नसता तर फॉर्म मिळायला उशिर झाला म्हणून अपक्ष फॉर्म भरावा लागला, असा मेसेज आला असता, असं लोंढे म्हणाले.

आपल्या खूप विश्वासाच्या माणसाकडे AB फॉर्म दिला जातो. तो मिळाला की नाही याची शाहानिशा केली जाते. म्हणून ते स्क्रिनशॉट आहेत. एबी फॉर्म स्क्रिनशॉटमध्ये पाठवता येत नाही. आपल्या अतिशय विश्वासाच्या माणसाकडे एबी फॉर्म दिला जातो. एबी फॉर्म तुम्हाला ओरिजनलच पाठवावा लागतो. सत्यजीत तांबे यांनी एबी फॉर्म मिळाल्यानंतर ओकेचा मेसेज पाठवला. याचा अर्थ त्यांना ओरिजनल एबी फॉर्म गेले आणि सुखरुप भेटले, असा दावा अतुल लोंढे यांनी केला.