मुंबई | 5 जानेवारी 2024 : महाराष्ट्रात कोरोनाने पुन्हा डोकंवर काढलं आहे. कोरोनाबाधितांच्या आकडेवारीत आता पुन्हा वाढ होऊ लागली आहे. महाराष्ट्रात गेल्या 24 तासात 146 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. विशेष म्हणजे गेल्या काही दिवसांपासून दररोज बाधितांचा आकडा हा 100 पेक्षा जास्त आढळतोय. कोरोनामुळे सध्या तरी घाबरुन जाण्यासारखी परिस्थिती नाहीय. पण काळजी घेणं जास्त आवश्यक आहे. कारण कोरोनाचा संसर्ग कधी वेग पकडेल याचा अंदाज नाही. त्यामुळे आपण सतर्क राहणं जास्त आवश्यक आहे. कोरोनाचा संभाव्य धोका लक्षात घेता महाराष्ट्रातील आरोग्य यंत्रणा सतर्क झालीय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संभाव्य धोका लक्षात घेता नुकतंच आरोग्य विभागाचा आढावा घेतला होता. त्यानुसार शासनाचं कामकाजही सुरु आहे. पण बाधितांचा वाढता आकडा हा चिंतेला कारण ठरत आहे.
विशेष म्हणजे कोरोनाच्या नवा व्हेरिएंटमुळे खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रातही या नव्या व्हेरिएंटचे रुग्ण सापडत आहेत. राज्याच्या आरोग्य विभागाने दिवसभरातील नव्या बाधित रुग्णांची आकडेवारी जाहीर केली आहे. या आकडेवारीनुसार, महाराष्ट्रात आज कोरोनाचे 146 नवीन रुग्ण आढळले आहेत. तसेच गेल्या 24 तासात 129 रुग्ण बरे होऊन घरी गेले असल्याची माहिती समोर आली आहे.
राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.17 टक्के आहे. तर सध्या राज्यातील मत्यृदर हा 1.81टक्के एवढा आहे. दरम्यान, राज्यात आज 14 हजार 379 कोव्हिडच्या चाचण्या झाल्या आहेत. त्यापैकी RT-PCR च्या 2 हजार 542 चाचण्या झाल्या आहेत. तसेत RAT च्या 11 हजार 837 चाचण्या झाल्या आहेत.
राज्यात कोरोनाचा नवीन व्हेरिएंट हातपाय पसरत आहे. या व्हेरिएंटचे रुग्णही वाढत आहेत. राज्यात आतापर्यंत या विषाणूचे 110 रुग्ण आहेत. राज्यात कोरोनाच्या जेएन.1 या नव्या व्हेरिएंटने बाधित असेलेला पहिला रुग्ण 21 डिसेंबरला सिंधुदुर्ग येथील 41 वर्षीय व्यक्तीमध्ये आढळून आला होता. यानंतर आरोग्य विभागाने राज्यभरातील सर्व स्थानिक स्वराज्य संस्थांना चाचणी आणि जीनोम अनुक्रम वाढविण्यास सांगितले आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, 1 जानेवारी 2023 पासनू आजपर्यंत 139 कोरोना रुग्णांचा मृत्यू झालाय. त्यात 17.22 टक्के रुग्ण हे 60 वर्षांवरील होते. तर यातील 84 टक्के सहव्याधी असलेले रुग्ण होते. तसेच 16 टक्के रुग्ण हे सहव्याधी नसलेले होते.
राज्यात सध्या कोव्हिडचे 914 रुग्ण सक्रिय आहेत. या रुग्णांमधील 870 रुग्णांना घरीच विलगीकरणात ठेवण्यात आले आहे. तर 44 रुग्ण हे रुग्णालयात दाखल आहेत. यामध्ये 32 रुग्णांची प्रकृती स्थिर आहे. तर 12 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरू आहेत.