मुंबई : राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या (Corona Update) झपाट्याने वाढताना दिसत आहे. शनिवारी दिवसभरात राज्या 1 हजार 397 नवे कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. त्यातील सर्वाधिक 889 रुग्ण एकट्या मुंबईत, 104 रुग्ण नवी मुंबईत, तसंच ठाणे शहर, ठाणे जिल्हा आणि पुणे महापालिका क्षेत्रात कोरोनाचे नवे रुग्ण आढळल्यानं एकच खळबळ उडाली आहे. राज्य सरकारकडून नागरिकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. 15 जूनच्या आसपास राज्यातील शाळा सुरु होणार आहेत. अशावेळी राज्यातील शाळा (School) पुन्हा बंद ठेवण्यात येणार का? असा प्रश्न विचारला जात आहे. त्याबाबत बोलताना शालेय शिक्षणमंत्री डॉ. वर्षा गायकवाड (Varsha Gaikwad) यांनी शाळेबाबत सरकारची भूमिका स्पष्ट केलीय.
कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे शाळांना खबरदारी बाळगण्याचे आदेश देण्यात आले आहेत. अशावेळी शाळा पुन्हा बंद करणे योग्य नाही, असं वर्षा गायकवाड म्हणाल्या. तसंच सर्वांनी मास्क वापरलाच पाहिजे. सध्या मास्क सक्ती नसली तरी मास्कबाबत पुन्हा एकदा जनजागृती व्हायला हवी, असं मत गायकवाड यांनी व्यक्त केलंय.
केंद्र सरकारने कोरोना रुग्णसंख्या वाढत असलेल्या 5 राज्यांना पत्र पाठवली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. राज्यात सहा जिल्ह्यांत रुग्णसंख्या अटोक्यात आणण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. त्यात महाराष्ट्रातील मुंबई, मुंबई उपनगर, ठाणे, पालघर आणि पुण्याचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर राज्य सरकारनेही मास्क सक्ती नसली तरी गर्दीच्या ठिकाणी मास्क वापरण्याचं आवाहन नागरिकांना केलं आहे.
मुंबई – 889
नवी मुंबई – 104
ठाणे शहर – 91
ठाणे जिल्हा – 25
पुणे महापालिका क्षेत्र – 68
पुणे जिल्हा – 10
मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीबाबतही वर्षा गायकवाड यांनी भूमिका मांडली. मुंबई महापालिकेच्या आरक्षण सोडतीवर आम्ही नाराज आहोत. कारण विद्यमान नगरसेवकांपैकी 21 नगरसेवकांच्या जागेचं आरक्षण बदललं आहे. याबाबत आम्ही चर्चा करणार आहोत. चर्चेतून मार्ग निघाला नाही तर आम्ही कोर्टात जाऊ, असा इशारा त्यांनी दिलाय.