महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्र्यांनी एसी लोकल ट्रेनमध्ये अनुभवल्या अडचणी, पाहा VIDEO

| Updated on: Oct 23, 2023 | 9:19 PM

महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षणमंत्र्यांनी आज मुंबईच्या एसी लोकल ट्रेनमधून प्रवास केला. यावेळी त्यांच्या निदर्शनास एक विचित्रप्रकार लक्षात आला. मुंबई लोकल ट्रेनने दररोज लाखो मुंबईकर प्रवास करतात. त्यांना रेल्वे प्रशासनाकडून कशी सुविधा पुरवली जाते, याचा प्रत्यय त्यांना आला.

महाराष्ट्राच्या माजी शिक्षणमंत्र्यांनी एसी लोकल ट्रेनमध्ये अनुभवल्या अडचणी, पाहा VIDEO
Follow us on

मुंबई | 23 ऑक्टोबर 2023 : महाराष्ट्राच्या माजी शालेय शिक्षणमंत्री आणि मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी आपल्या अधिकृत ट्विटर (X) अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करत काही प्रश्न उपस्थित केले आहेत. वर्षा गायकवाड यांनी आज मुंबईच्या एसी लोकल ट्रेनने प्रवास केला. यावेळी त्यांना एका विचित्र परिस्थिचा सामना करावा लागला. एसी लोकल ट्रेनमध्ये एसीमधून पाणी गळत होतं. त्यामुळे प्रवाशांना प्रचंड मनस्तापाला सामोरं जावं लागत होतं. वर्षा गायकवाड यांनादेखील याच मनस्तापाला सामोरं जावं लागलं. त्यांनी संबंधित प्रकाराचा व्हिडीओ बनवत ट्विटरवर शेअर केलाय. या व्हिडीओत त्यांनी आपला संताप व्यक्त केलाय. तसेच त्यांनी या प्रकारावरुन रेल्वे प्रशासनाला जाब विचारला आहे.

लोकल ट्रेनमध्ये अवकाळी वाहती धारा, अशा शिर्षकाखाली वर्षा गायकवाड यांनी पोस्ट केली आहे. “आज संध्याकाळी 5.50 वाजेच्या चर्चगेट – बोरीवली या एसी लोकल ट्रेनने प्रवास केला. ट्रेनच्या एसीमधून खूप पाणी गळत होतं. पाणी इतकं गळत होतं की जणू पाऊसच पडत आहे. पाणी गळत असल्याने खाली पूर्ण पाणीच पाणी जमा झालं होतं. सर्व प्रवाशांना त्रास होत होता. त्यांचं सामान भिजत होतं”, असं वर्षा गायकवाड यांनी ट्विटमध्ये सांगितलं.

वर्षा गायकवाड यांनी घेतलं शीतल म्हात्रे यांचं नाव

“माझी सहकारी, माजी नगरसेविका शीतल म्हात्रे यांनी 6 ऑक्टोबरला याच ट्रेनची तक्रार केली होती. पण काहीच कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे एसीची देखील हवा येत नव्हती. आम्ही जोपर्यंत बोरीवली पोहोचलो तोपर्यंत घामाघूम झालेलो होतो”, असं वर्षा गायकवाड यांनी सांगितलं.

“एसी ट्रेनचे तिकीट हे इतर सामान्य ट्रेनपेक्षा अनेक पटीने जास्त आहेत. प्रवाशांकडून इतके पैसे घेतले जात आहेत तर मग रेल्वे प्रशासनाचंदेखील योग्य सुविधा पुरवण्याचं कर्तव्य आहे. मुंबईच्या सर्व लोकल ट्रेनमध्ये सर्वेक्षण करण्यात यावं आणि सर्व दुरुस्थी करण्यात यावी, अशी मी मागणी करते”, अशी भूमिका वर्षा गायकवाड यांनी मांडली.