मुंबई | 12 डिसेंबर 2023 : राज्य मागासवर्ग आयोगाचे अध्यक्ष माजी न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी अचानक राजीनामा दिल्याचं वृत्त समोर आल्यानंतर एकच खळबळ उडाली आहे. खरंतर त्यांनी 4 डिसेंबरलाच राजीनामा दिला होता. पण विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी संबंधित प्रकरण उजेडात आणल्यानंतर राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलं. गेल्या आठ दिवसांपासून राज्य मागासवर्ग आयोगाच्या नव्या अध्यक्षपदाबाबत निर्णय घेण्यात आला नव्हता. अखेर या प्रकरणावर सर्वत्र चर्चांना उधाण आल्यानंतर राज्य सरकारने याबाबतचा महत्त्वाचा निर्णय घेतला आहे. मागासवर्ग आयोगाच्या अध्यक्षपदी निवृत्त न्यायमूर्ती सुनील शुक्रे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. तसेच सरकारने आयोगाच्या सदस्यपदी ओम प्रकाश जाधव मारुती शिंगारे, मच्छिंद्रनाथ तांबे यांची नेमणूक केली आहे.
“राज्य मागास वर्ग आयोगाचे अध्यक्ष न्यायमूर्ती आनंद निरगुडे यांनी ४ डिसेंबर रोजी दिलेला राजीनामा सरकारने ९ डिसेंबरला स्वीकारल्याची धक्कादायक बातमी पुढे आली आहे. राज्य मागासवर्ग आयोगाचे सदस्य एकामागून एक आपला राजीनामा देत आहे. अध्यक्षांनी दिलेला राजीनामा स्वीकारल्याची माहिती सरकारने लपवून ठेवली. विधानसभेचे हिवाळी अधिवेशन सुरू असताना याबाबत सरकारने कोणतीही माहिती सभागृहात का सांगितली नाही?”, असा सवाल विजय वडेट्टीवार यांनी ट्विटरवर (X) केला होता. “सरकारचं नेमकं अस चाललं काय? राज्य मागासवर्ग आयोगातील सदस्य आणि आता अध्यक्ष का राजीनामा देत आहेत, याबाबत सरकारने सभागृहात स्पष्टीकरण द्यावे”, अशी मागणी विजय वडेट्टीवार यांनी केली होती.
काही दिवसांपूर्वीच मागासवर्ग आयोगाच्या सदस्य पदाचा राजीनामा दिलेले बालाजी किल्लारीकर यांनी राज्य सरकारवर गंभीर आरोप केला होता. “राज्य मागासवर्ग आयोगात सरकारचा हस्तक्षेप वाढला होता. आयोगाचे स्वतंत्र अबाधित राहावे, यासाठी आम्ही हे राजीनामे दिले आहेत”, असं किल्लारीकर म्हणाले होते.
किल्लारीकरांच्या आरोपांना उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रत्युत्तर दिलं. “आम्ही आभ्यासक घेतले, त्यांनी आयोगावर कार्यकर्ते घेतले होते. मागासवर्गीय आयोगाचा राजीनामा दिला तेव्हा त्यांनी सर्वात पहिली भेट कुणाची घेतली? त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवारांची भेट घेतली. कारण त्यांची नियुक्ती शरद पवार यांच्या राष्ट्रवादीने केली होती”, असं प्रत्युत्तर देवेंद्र फडणवीस यांनी दिलं.
देवेंद्र फडणवीस यांनी यावेळी आनंद निरगुडे यांच्या राजीनाम्यावरही प्रतिक्रिया दिली. “निरगुडे साहेब माध्यमांसमोर काय बोलले ते मी पाहिलं. त्यांच्या राजीनाम्यातही म्हटलं आहे. त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला आहे. त्यांनी राजीनामा देताना कुठलाही आक्षेप घेतलेला नाही. किंबहुना आमची अपेक्षा होती की, त्यांनी अधिक काळ काम केलं पाहिजे. ते चांगलं काम करत होते. पण त्यांनी वैयक्तिक कारणाने राजीनामा दिला. आम्ही तर त्यांना सुचवत होतो की, अन्य काही जबाबदारी हवी असेल तर घ्या. पण शेवटी ते त्यांच्यावर आहे. त्यांनी कोणताही आक्षेप घेतलेला नाही”, अशी प्रतिक्रिया देवेंद्र फडणवीस यांनी दिली.