मुंबई |27 सप्टेंबर 2023 : राज्यात सध्या गणेशोत्सवाचा उत्साह सुरु आहे. या उत्साचा उद्या शेवटचा दिवस आहे. राज्यभरात उद्या अनंत चतुर्दशीचा उत्साह असणार आहे. अनंत चतुर्दशी असल्यामुळे लाखो भाविक आपल्या बाप्पाचं उद्या नदी, तलाव आणि समुद्रात विसर्जन करणार आहेत. बाप्पाच्या विसर्जनाआधी भव्य मिरवणुकादेखील निघणार आहेत. राज्यातील अनेक शहरांमध्ये गणपती विसर्जनाच्या मोठमोठ्या मिरवणुका बघायला मिळतील. अनंत चतुर्दशीचा दिवस असल्याने उद्या सरकारी सुट्टी आहे. पण याच दिवशी मुस्लिम समाजाचा ईद-ए-मिलाद हा सण देखील आहे.
मुस्लिम समाजाच्या ईद-ए-मिलाद या सणाच्या दिवशी देखील राज्य सरकारकडून सुट्टी दिली जाते. पण यावर्षी अनंत चतुर्दशी आणि ईद-ए-मिलाद हे दोन्ही सण एकाच दिवशी आल्यामुळे अनेक सरकारी कर्मचाऱ्यांचा हिरमोड झाला. कारण हे दोन्ही सण एका पोठापाठ असते तर आणखी एक सुट्टी कर्मचाऱ्यांना मिळाली असती. पण सुट्टीचा विचार करणाऱ्या सर्व सरकारी कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. याबाबत राज्य शासनाने जीआर काढत माहिती दिली आहे.
राज्य सरकारने ईद-ए-मिलादची सुट्टी ही 28 सप्टेंबर ऐवजी 29 सप्टेंबरला देण्याचा निर्णय घेतलाय. त्यामुळे आता 28 आणि 29 या दोन्ही दिवशी सरकारी सुट्टी असणार आहे. विशेष म्हणजे यावर्षी पुढच्या पाच दिवसांपैकी फक्त एकाच दिवशी सरकारी कर्मचाऱ्यांना नोकरीवर जावं लागेल. कारण 28 सप्टेंबरला अनंत चतुर्दशीची सुट्टी, त्यानंतर 29 सप्टेंबरला ईद-ए-मिलादची सुट्टी असणार आहे. पण 30 सप्टेंबरला शनिवारी कामकाज सुरु असणार आहे. त्यामुळे कर्मचाऱ्यांना कार्यालयांवर जावं लागेल. पण त्यानंतर पुन्हा सलग दोन सुट्ट्या असणार आहेत. कारण 1 ऑक्टोबरला रविवारची सुट्टी येत आहे. तर 2 ऑक्टोबरला महत्मा गांधी यांच्या जयंतीची सुट्टी असणार आहे. सरकारी कर्मचाऱ्यांसाठी ही आनंदाची पर्वणी आहे.
राज्य शासनाने अधिसूचित केलेल्या 24 सार्वजनिक सुट्ट्यांमध्ये ईद-ए-मिलाद या सणाची सुट्टी गुरुवारी , 28 सप्टेंबर 2023 ला देण्यात आली आहे. ईद-ए-मिलाद हा मुस्लिम धर्मियांचा सण मुस्लिम बांधव मोठ्या प्रमाणात साजरा करत असतात. यावेळी जुसूल कार्यक्रमाचे आयोजन करण्यात येते. यावर्षी गुरुवारी, 28 सप्टेंबर 2023 ला हिंदू धर्मियांचा अनंत चतुर्दशी हा सण आहे, असं शासनाने जीआरमध्ये म्हटलं आहे.
अनंत चतुर्दशीच्या दिवशी राज्यात सर्वत्र सार्वजनिक गणेश मुर्तीची मोठी मिरवणूक काढण्यात येते. नंतर तिचे विसर्जन करण्यात येत असल्याने हिंदू बांधवांची मोठी गर्दी जमा होत असते. यामुळे दोन्ही समाजामध्ये शांतता आणि सामाजिक सलोखा कायम राहण्याच्या हेतूने ईद-ए-मिलादची सार्वजनिक सुट्टी ही गुरुवारी, 28 सप्टेंबर 2023 ऐवजी 29 सप्टेंबर 2023 ला जाहीर करण्यात येत आहे, असंही शासनाने जीआरमध्ये म्हटलं आहे.