मुंबई : महाराष्ट्रातील 18 लाख सरकारी कर्मचाऱ्यांनी जुनी पेन्शन योजना (Old Pension Scheme) लागू करण्याच्या मागणीसाठी संप पुकारला आहे. या सर्व कर्मचाऱ्यांनी संप मागे घ्यावा, अशी विनंती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी केली आहे. परंतु कर्मचारी संपावर ठाम आहे. यामुळे राज्यशासनाने अनेक आघाड्यांवर काम सुरु केले आहे. मंगळवारी विधिमंडळात मेस्मा कायदा विधेयक मंजूर केले. त्यानंतर खाजगी एजन्सीच्या माध्यमातून कर्मचारी भरती करण्याचा निर्णय घेतला आहे.
अभ्यासाकरिता समिती स्थापन
राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजना (एनपीएस) आणि जुनी पेन्शन योजना यांचा तुलनात्मक अभ्यास करण्यासाठी सुबोधकुमार, के.पी.बक्षी आणि सुधीरकुमार श्रीवास्तव यांच्या अध्यक्षतेखाली मंगळवारी समिती नेमली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी संपकरी कर्मचाऱ्यांना संप मागे घेण्याचं आवाहन केलं. सरकार पूर्णपणे सकारात्मक दृष्टीने सगळ्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांच्या मागण्यांकडे पाहत आहे. आजही पुन्हा एकदा सांगतो की, पुन्हा एकदा त्यांनी विचार करा अन् संप मागे घ्यावे, असे आवाहन मुख्यमंत्र्यांनी केले आहे.
राज्य सरकारकडून ७५ हजार पदांची भरती करण्याची घोषणा झाली असतानाच खासगी तत्त्वावर कर्मचारी भरण्याच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. शिपाई, शिक्षक, अकाऊंटंट, क्लार्क ते अधिकाऱ्यांपर्यंतची पदे थेट खासगी एजन्सीच्या माध्यमातून भरण्यात येणार आहे. सरकारचे कामकाज सुरळीत सुरु राहावे, यासाठी हा निर्णय राज्याच्या उद्योग, ऊर्जा व कामगार विभागाकडून घेण्यात आला. एकूण ९ एजन्सीजच्या माध्यमातून सरकारी, निमसरकारी अस्थापने, महामंडळांत १३६ प्रकारची पदे भरली जातील.
कोणती पदे भरणार
प्रकल्प अधिकारी, समन्वयक, कन्सल्टंट, प्रशिक्षण व्यवस्थापक, इंजिनीअर, अकाऊंटंट, मार्केटिंग एक्स्पर्ट, लेखापाल, विधी अधिकारी, शिक्षक, अधीक्षक, ऑडिओ व्हिज्युअल कोऑर्डिनेटर, टेक्निकल आर्किटेक्ट, हार्डवेअर, सॉफ्टवेअर इंजिनीअर, डेटा एण्ट्री ऑपरेटर, ग्राफीक डिझायनर, सोशल मीडिया एक्सपर्ट, सर्व्हेअर अशी एकूण ७४ प्रकारची पदे भरण्यात येणार आहे. त्यांना २८ हजार ते १.५० लाख रुपयांपर्यंत वेतन देण्यात येणार आहे.
कुशल कर्मचारी पदे
इस्टेट मॅनेजर, लायब्रेरेरियन, जनसंपर्क अधिकारी, बँक समन्वयक, उप लेखापाल, हेड क्लार्क, होस्टेल मॅनेजर, जुनिअर अकाऊंटंट, स्टोअर किपर, स्टेनोटायपिस्ट, सिनिअर क्लार्क,टेलिफोन ऑपरेटर, ड्रायव्हर, निरीक्षक, ट्राफिक वॉर्डनय अशी ४६ प्रकारची पदे भरण्यात येणार आहे. त्यासाठी वेतन २५ हजार ते ७३ हजारांपर्यंत देण्यात येणार आहे. केअरटेकल स्त्री-पुरुष, सुतार, माळी, सफाई कामगार, लिफ्टऑपरेटर, स्टोअर असिस्टंट ही आठ प्रकारची पदे भरली जाणार असून वेतन २५ हजार ते ३२ हजार रुपयांपर्यंत दिले जाणार आहे.
नेमण्यात आलेल्या एजन्सीज
ॲक्सेस टेक सर्व्हिसेस लि., सीएमएस आयटी सर्व्हिसेस प्रा. लि., सीएससी ई गव्हर्नन्स सर्व्हिसेस इंडिया लि., इनोवेव आयटी इन्फ्रास्ट्रक्चर लि., क्रिस्टल इंटिग्रेटेड सर्व्हिसेस प्रा. लि., एस-२ इन्फोटेक इंटरनॅशनल प्रा. लि., सैनिक इंटेलिजन्स सिक्युरिटी प्रा. लि., सिंग इंटेलिजन्स सिक्युरिटी सर्व्हिसेस प्रा. लि., उर्मिला इंटरनॅशनल सर्व्हिसेस प्रा. लि.