मुंबई: राज्यातील कोरोनाची लाट आता जवळपास ओसरल्याचे दिसत आहे. राज्य सरकारने 15 ऑगस्टपासून कोरोना लसीचे दोन डोस घेतलेल्या नागरिकांना रेल्वेचा मासिक पास काढून प्रवास काढण्याची मुभा दिली होती. तेव्हापासून सातत्याने रेल्वे प्रवाशांच्या संख्येत वाढ होताना दिसत आहे.
या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने संपूर्ण लसीकरण झालेल्या नागरिकांना युनिव्हर्सल पास देण्यास सुरुवात केली होती. युनिव्हर्सल पासचा वापर करुन तुम्हाला सार्वजनिक वाहतूक व्यवस्थेने आणि विमानाने प्रवास करता येतो. तसेच हा पास दाखवून मॉलमध्येही प्रवेश मिळतो.
* सर्वप्रथम पात्र नागरिकांनी https://epassmsdma.mahait.org या संकेतस्थळावर जावे.
* त्यावर Travel Pass for Vaccinated Citizens यावर क्लिक करावे.
* त्यानंतर नागरिकांनी आपला कोव्हिड लसीकरणासाठी नोंदविलेलाच मोबाईल क्रमांक नमूद करावा.
* लगेचच मोबाईलवर ओटीपी पासवर्ड लघुसंदेश (एसएमएस) द्वारे प्राप्त होईल.
* हा ओटीपी नमूद केल्यानंतर लाभधारकाचे नाव, मोबाईल क्रमांक, लाभधारकाचा संदर्भ क्रमांक इत्यादी तपशील आपोआप समोर दिसतील.
* त्यामध्ये ‘पास निर्माण करा’ (जनरेट पास) या पर्यायावर क्लिक करावे.
* त्यावर क्लिक करताच अर्जदाराचा तपशील तसेच कोव्हिड लसीचा पहिला आणि दुसरा डोस घेतल्याची तारीख इत्यादी सर्व तपशील आपोआप दिसेल.
* या तपशिलामध्ये सेल्फ इमेज’ या पर्यायामध्ये अर्जदाराने स्वतःचे छायाचित्र अपलोड करावे. मोबाईल गॅलरीतून छायाचित्र अपलोड करता येवू शकते किंवा मोबाईल कॅमेऱ्याद्वारे जागीच छायाचित्र (सेल्फी) काढून देखील अपलोड करता येईल.
* ही सर्व प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर पुढील 24 तासांमध्ये युनिव्हर्सल ट्रॅव्हल पास करीता लघुसंदेश (एसएमएस) द्वारे लिंक प्राप्त होईल, असा संदेश झळकेल. लिंक प्राप्त झाल्यानंतर ई पास मोबाईलमध्ये जतन (Save) करुन, उपनगरीय रेल्वे स्थानकांवर तिकिट खिडकीवर सादर करावा, त्याआधारे रेल्वे पास प्राप्त करता येईल.
देशात कोरोनाग्रस्तांच्या रुग्णसंख्येत (Corona Cases In India) चढउतार पाहायला मिळत आहेत. गेले काही दिवस नव्या कोरोनाग्रस्तांच्या संख्येत वाढ होताना दिसत होती, मात्र आता पुन्हा एकदा रुग्णसंख्या घटताना दिसत आहे. गेल्या 24 तासात आदल्या दिवसाच्या तुलनेत नव्या कोरोना बाधितांच्या संख्येत जवळपास 2 हजारांनी घट झाली. कालच्या दिवसात देशात 20 हजार 799 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 180 कोरोनाग्रस्तांना प्राण गमवावे लागले.
कोरोनातून बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असल्याने त्यातल्या त्यात दिलासा मानला जात आहे. देशातील सक्रिया कोरोनाग्रस्त रुग्णसंख्या गेल्या काही दिवसांपासून सातत्याने पावणे तीन लाखांच्या खाली आहे. कालच्या दिवसात या संख्येने गेल्या 200 दिवसातील निचांक गाठला.
संबंधित बातम्या:
पुणेकरांसाठी लोकल प्रवास सुरू, युनिव्हर्सल पाससाठी कसा कराल अर्ज?
नवी मुंबईत रेल्वे पाससाठी महापलिकेतर्फे 11 रेल्वे स्थानकांवर स्टॉल