मुंबई : ब्रिटनमध्ये आढळलेल्या नव्या कोरोना विषाणूच्या प्रजातीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली जारी केली आहे. राज्य सरकारने मिशन बिगिनिंग अगेन अंतर्गत नवीन अध्यादेश जारी केला आहे. या अध्यादेशानुसार युरोप, ब्रिटनमधून येणाऱ्या प्रवाशांसाठी विमानतळावर करोनाची RTPCR टेस्ट केली जाणार आहे. या टेस्टमध्ये पॉझिटिव्ह आलेल्या रुग्णाला covid-19 च्या हॉस्पिटलमध्ये 14 दिवस क्वारंटाईन केलं जाणार आहे. तर निगेटिव्ह असणाऱ्या प्रवाशाला सात दिवस घरामध्ये होम क्वारंटाईन राहावं लागणार आहे (Maharashtra Government issue SOP for passengers).
अध्यादेशात नेमकं काय?
राज्यात येणाऱ्या प्रवाशांना हॉटेलमध्ये पेड क्वारंटाईन राहावं लागेल.
पाचव्या आणि सातव्या दिवशी RTPCR टेस्ट केली जाईल.
रिपोर्ट निगेटिव्ह आल्यास 7 दिवसात सोडणार, मात्र घरात सात दिवस क्वारंटाईन राहावं लागेल.
रिपोर्ट पॉझिटिव्ह आल्यास कोविड हॉस्पिटलमध्ये 17 दिवस भरती (Maharashtra Government issue SOP for passengers)
कोरोना स्ट्रेनच्या पार्श्वभूमीवर राज्यात कडक संचारबंदी
ब्रिटनमध्ये कोरोना विषाणूचा नवा अवतार आढळून आल्यानंतर राज्यात 22 डिसेंबरपासून रात्री 11 ते सकाळी सहा वाजेपर्यंत संचारबंदी (Night Curfew) लागू करण्यात आलीय. विशेष म्हणजे ही संचारबंदी 5 जानेवारीपर्यंत राहणार असून, त्यासाठी नियमावलीही जाहीर झालीय. नाइट कर्फ्यूदरम्यान पाचपेक्षा अधिक व्यक्तींना एकत्र जमण्यास मनाई आहे, पण संचाराला बंदी नसल्याची माहिती मुंबई पोलिसांनी दिलीय.
नागरिक कामानिमित्त बाहेर पडू शकतात, कर्फ्यू हा सुरक्षा आणि आरोग्यासाठी असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय. रात्री 11 ते सकाळी 6 वाजेपर्यंत पाच किंवा त्यापेक्षा जास्त व्यक्तींच्या जमावावर निर्बंध लादण्यात आले आहेत. नाइट शिफ्टमधील व्यवसाय, करमणुकीशी संबंधित पब, रेस्टॉरंट्स, थिएटर 11 वाजता बंद करणे सक्तीचे करण्यात आले आहे.
त्याव्यतिरिक्त अन्य व्यवसायाला तसेच सर्व अत्यावश्यक सेवांना परवानगी देण्यात आली असून, नागरिक दुचाकी आणि चार चाकी वाहनांतून प्रवास करू शकतात. मात्र कारमध्ये चारपेक्षा अधिक व्यक्तींना परवानगी नाही. कर्फ्यूच्या वेळी फिरायला जाऊ शकता किंवा गाडी चालवू शकता. पण फक्त पाचपेक्षा अधिक लोकांना एकत्र फिरता येणार नाही. नागरिकांनी मास्कचा वापर करीत फिजिकल डिस्टन्सिंगचे पालन करणं गरजेचं आहे अन्यथा कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचंही मुंबई पोलिसांनी सांगितलंय.
त्याचबरोबर युरोपातून आलेल्या प्रवाशांना नव्या विषाणूची लक्षणे असल्यास त्यांच्यासाठी स्वतंत्र रुग्णालयाची देखील व्यवस्था करण्याचे आदेश उद्धव ठाकरेंनी यावेळी दिले. अन्य देशांमधून महाराष्ट्रात आलेल्या प्रवाशांची तपासणी करून त्यांच्या हातावर शिक्का मारून त्यांना होम क्वारंटाईन केले जाईल. युरोपीयन देश, मध्य-पूर्व देशातून आलेल्या प्रवाशांची तपसाणी करणाऱ्या विमानतळावरील सर्व कर्मचाऱ्यांना पीपीई किट देण्याचे निर्देशही मुख्यमंत्र्यांनी दिले.
हेही वाचा : राज्यात संचारबंदीची कडक अंमलबजावणी, जाणून घ्या नियम काय सांगतात