मुंबई: गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर मीडियाशी संवाद साधण्यास कोर्टाने मनाई केलेली असतानाही अमरावतीच्या खासदार नवनीत राणा (Navneet Rana) यांनी काल मीडियाशी संवाद साधला. गुन्ह्याशी संबंधित विषयावर बोलतानाच नवनीत राणा यांनी थेट मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (cm uddhav thackeray) यांना निवडणूक लढण्यास आव्हान दिलं होतं. राणा यांनी मीडियाशी साधलेल्या संवादावर सरकारी वकील प्रदीप घरत (pradip gharat) यांनी आक्षेप घेतला आहे. राणा यांनी सकृतदर्शनी कोर्टाने घालून दिलेल्या अटी आणि शर्तींचं उल्लंघन केल्याचं दिसून येत आहे. त्यामुळे त्यांचा जामीन रद्द करण्यासाठी आम्ही आज दुपारी 11 वाजता कोर्टात याचिका दाखल करणार असल्याचं प्रदीप घरत यांनी म्हटलं आहे. त्यामुळे तब्बल 14 दिवसाच्या तुरुंगवासानंतर बाहेर आलेल्या नवनीत राणा यांच्या अडचणीत वाढ होण्याची शक्यता वर्तवली जात आहे. नवनीत राणा यांचा जामीन रद्द होणार का? याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे.
नवनीत राणा यांनी मीडियाशी संवाद साधल्यानंतर प्रदीप घरत यांनी टीव्ही9 मराठीला प्रतिक्रिया दिली. न्यायालायने त्यांनी जी अट व शर्त घातली आहे. त्यानुसार गुन्ह्याशी संबंधित कोणत्याही विषयावर समाजमाध्यमांसमोर बोलायचे नाही ही महत्त्वाची अट आहे. या अटीचा आणि शर्तीचा त्यांनी भंग केला आहे. त्यामुळे ही बाब कोर्टाच्या निदर्शनास आणून देऊ. कोणतीही विधाने मीडियासमोर केल्यास त्यांना दिलेल्या जामिनाच्या अटीचा भंग समजला जाईल आणि जामीन रद्द केला जाईल, असं कोर्टाने म्हटलं होतं, असं प्रदीप घरत यांनी सांगितलं.
राणा यांनी मीडियाशी साधलेल्या संवादाची आम्ही माहिती घेतली आहे. आम्हाला असं वाटतंय की राणा दाम्पत्याने केलेल्या गुन्ह्यासंदर्भात जामीन देताना मुंबई सत्र न्यायालयाने जी अटी आणि शर्ती दिली होती त्याच्याशी संबंधित विधान नवनीत राणा यांनी केलेलं आहे. म्हणून आम्ही यासंदर्भात मुंबई सत्र न्यायालयाच्या निदर्शनासही बाब आणून देणार आहोत, असं घरत यांनी स्पष्ट केलं. नवनीत राणा यांनी काल मीडियाशी संवाद साधला. त्यानंतर विशेष सरकारी वकील प्रदीप घरत यांनीवरील विधान केलं आहे. मुंबई सत्र न्यायालयाने जामीन देताना राणा दाम्पत्यांना संबंधित गुन्ह्या संदर्भात किंवा त्याच प्रकारच्या गुन्ह्या संदर्भात मीडियाशी बोलण्यावर प्रतिबंध लावला आहे. म्हणून आम्ही कोर्टात धाव घेणार आहोत, असंही त्यांनी सांगितलं.
>> दोघांपैकी प्रत्येकाला 50 हजारांचा रोख जामीन आणि तेवढ्याच किमतीच्या एक जामीनदार द्यावा लागणार
>> आरोपी पुराव्यासोबत काहीही छेडछाड करणार नाही
>> आरोपी असं कुठलाही कृत्य करणार नाही जेणेकरुन तपास प्रभावित होईल
>> राणा दाम्पत्यांना मीडियाशी बोलण्यावर बंदी राहणार, मीडियाशी गुन्ह्या संदर्भात भाष्य केल्यास जामीन रद्द होईल
राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या ‘मातोश्री’ या निवासस्थानाबाहेर राणा दाम्पत्य हनुमान चालीसा पठण करणार होते. मातोश्रीवर हनुमान चालिसा पठण करण्याआड कायदा सुव्यवस्था निर्माण करण्याचा कट राणा दाम्पत्याने आखला होता. एवढंच नाही तर याद्वारे महाविकास आघाडी सरकारच पाडण्याचा त्यांचा हेतू यात होता, असं पोलिसांनी न्यायालयात सांगितले होते. मातोश्री बाहेर हनुमान चालिसा पठण करण्याप्रकरणी राणा दाम्पत्यावर समाजात तेढ निर्माण करणे आणि राजद्रोहाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या अगोदर दोघानी बांद्रा महानगर दंडाधिकारी कोर्टात जामीन अर्ज दाखल केला होता. मात्र तो अर्ज त्यांनी मागे घेतला आणि सत्र न्यायालयात जामीन अर्ज दाखल केला होता.