मुंबई | 19 मार्च 2024 : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या दणक्यानंतर राज्य सरकारला जाग आली आहे. राज्य सरकारने निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर लगेच प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्या केल्या आहेत. विशेष म्हणजे ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांचादेखील यामध्ये समावेश आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे, जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अंकित, बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी विशाल नरवाडे आणि धुळे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी शुभम गुप्ता, आएएस अधिकारी संजय मीना, अमित सैनी यांची तडकाफडकी बदली केल्याची माहिती समोर आली आहे. प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या तडकाफडकी बदल्यानंतंर अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. पण या बदल्या निवडणूक आयोगाच्या आदेशानंतर करण्यात आल्याची चर्चा आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर निवडणुका योग्य पद्धतीने पार पडाव्यात म्हणून देशभरातील काही अधिकाऱ्यांच्या बदलीचे आदेश दिले होते.
निवडणूक आयोगाने नुकतंच देशभरातील विविध राज्यांना तीन वर्षांपेक्षा जास्त कार्यकाळ असणाऱ्या अधिकाऱ्यांचा किंवा गृह कॅडर असलेल्या अधिकाऱ्यांच्या तातडीने बदलीचे आदेश दिले होते. त्यानुसार विविध अधिकाऱ्यांची बदली करण्यात येत असल्याची माहिती समोर आली होती. विशेष म्हणजे नुकतंच निवडणूक आयोगाने मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह यांना हटवण्याचे आदेश दिले होते. त्यानंतर आज महत्त्वाची माहिती समोर आली आहे. राज्य सरकारने ठाणे महापालिका आयुक्त अभिजित बांगर यांची तडकाफडकी बदली केली आहे. त्यांना मुबई महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदाची जबाबदारी देण्यात आली आहे. तिथे सध्या पी. वेलरासू कार्यरत आहेत. तसेच मुंबई महापालिकेच्या दुसऱ्या विद्यमान अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे यांची मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनमध्ये बदली करण्यात आली आहे. त्यांच्यावर मुंबई मेट्रो रेल कॉर्पोरेशनच्या व्यवस्थापकीय संचालक पदाचा कार्यभार सोपवण्यात आला आहे.
जळगाव जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकीरी अंकित यांची बुलढाणा जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी बदली करण्यात आली आहे. तसेच आएएस अधिकारी संजय मीना यांची नागपूर महानगर प्रदेश विकास प्राधिकरण येथे महानगर आयुक्त म्हणून नियुक्त केली आहे. सध्या इथे मनोजकुमार सूर्यवंशी कार्यरत आहेत. तर बुलढाणा जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विशाल नरवाडे यांची धुळे जिल्हा परिषदेत मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून बदली केली आहे. सध्या इथे शुभम गुप्ता हे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत.