गिरीश गायकवाड, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 12 मार्च 2024 : सहकारी कारखान्यांना एनसीडीसी मार्फत थकहमी कर्ज देणे प्रकरणी एक महत्त्वाची अपडेट समोर आली आहे. मंत्रालयात सहकार मंत्री दिलीप वळसे पाटील यांच्या दालनात विविध कारखान्यांचा चेअरमन सोबत बैठक पार पडली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, सहकार विभागाकडून कोणत्या कारखान्यांना थकहमी कर्ज उपलब्ध करुन द्यायचे याची यादी तयार आहे. एकूण 21 कारखान्यांना कर्ज उपलब्ध करुन देण्यासाठी सरकारचे प्रयत्न आहेत. नुकतंच भाजपवासी झालेले औसाचे माजी आमदार बसवराज पाटील यांच्या विठ्ठल साई सहकारी साखरकारखान्याला कर्ज मिळण्याची शक्यता आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार अशोक पवार यांच्या कारखान्याला देखील कर्ज मिळण्याची शक्यता आहे.
मात्र भाजप नेत्या पंकजा मुंडे यांच्या वैद्यनाथ कारखान्याला कर्ज मिळणार का? याकडे राजकीय वर्तुळाचं लक्ष लागलं आहे. आजचा बैठकीबाबत सहकार विभागाकडून कारखानदारांना दिलेल्या नोटीसीमध्ये पंकजा मुंडे यांच्या कारखान्याचा समावेश नाही. कारखानदारांना सोबत पार पडलेल्या बैठकीनंतर सहकारमंत्री वळसे पाटील अर्थमंत्री अजित पवार यांच्या भेटीला दाखल झाले. उद्या पार पडणाऱ्या कॅबिनेट बैठकीत कारखान्यांना थकहमी देण्याबाबत निर्णय होण्याची दाट शक्यता आहे.