मुंबई: एसटी कर्मचाऱ्यांसाठी (msrtc) अत्यंत महत्त्वाची बातमी आहे. एसटी कामगारांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्याचं राज्य सरकारमध्ये घटत आहे. याबाबत आज विधानसभा अध्यक्षांच्या दालनात महत्त्वाची बैठक झाली. या बैठकीत कामगारांच्या एकूण 18 मागण्यांवर चर्चा झाली. त्यातील 16 मागण्यांवर सरकार सकारात्मक आहे. तसेच कामगारांना विलिनीकरण सदृश्य लाभ देण्यास सरकार सहमत आहे. परिवहन मंत्री अनिल परब (anil parab) हे उद्या मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि अर्थमंत्री अजित पवार यांच्याशी चर्चा करणार आहेत. त्यानंतर अनिल परब उद्या याबाबतची घोषणा विधानसभेत करणार आहेत, अशी माहिती विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar) यांनी दिली आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे. शिवाय गेल्या दीडएक महिन्यापासून सुरू असलेला एसटी कामगारांचा संपही उद्याच मिटण्याची शक्यताही वर्तवली जात आहे.
काल विधिमंडळ सभागृहात एसटी संपाबाबत मी सरकारचं लक्ष वेधलं होतं. विलीनीकरण शक्य नाही असं सरकार म्हणतंय. कर्मचारी विलीनीकरणावर ठाम आहेत. आपण यावर सुवर्णमध्य काढावा असं मी म्हटलं होतं. सभापती महोदयांनी त्याबाबत आज तातडीने बैठक बोलावून एक कमिटी गठीत केली. सरकार उद्या याबाबत आपली भूमिका मांडण्याची शक्यता आहे. परिवहन मंत्री अनिल परब हे अर्थमंत्री आणि मुख्यमंत्र्यांशी बोलून निर्णय घेतील आणि त्याची माहिती सभागृहाला देतील, असं विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी सांगितलं.
आजच्या बैठकीला मी स्वत: होतो. एसटी कामगारांचे नेते आणि प्रतिनिधी होते. यावेळी एसटी कर्मचाऱ्यांनी 18 मुद्दे मांडले. या सर्व मुद्द्यांवर चर्चा झाली. यातील 18 पैकी 16 मुद्द्यांवर सरकारनं सकारात्मकता दर्शवली आहे. विलीनीकरण झाल्यावर जे लाभ द्यायचे आहेत, ते विलीनीकरण सदृश्य लाभ एसटी कामगारांना देण्यात येणार आहे. याबाबत उद्या राज्य सरकार अंतिम धोरण जाहीर करणार आहे, असं त्यांनी सांगितलं.
एसटीवर तोडगा निघायलाच हवा. एसटी कर्मचारी आत्महत्या करत आहेत. त्यांचे कुटुंब वाऱ्यावर आहे. प्रवासी वाहतुकीअभावी लोकांचे हाल होत आहेत. विद्यार्थी लोकांना मनस्ताप होतोय. मायबाप सरकारनं यातून मार्ग काढायला हवा. आज बैठक झाल्यानंतर उद्या यावर निश्तिच काहीतरी तोडगा निघेल, अशी आशा आहे, असंही त्यांनी सांगितलं.
संबंधित बातम्या:
‘आम्ही खंबीरपणे तुमच्या पाठीशी उभे आहोत’ राऊतांना राहुल गांधींचं पत्र
राजीनामा तुमच्या बापालाही घ्यावा लागेल, सुधीर मुनगंटीवार कडाडले