मुंबई | 6 नोव्हेंबर 2023 : राज्यातील तब्बल 2 हजार 359 ग्रामपंचायत निवडणुकींचा निकाल समोर आलाय. राज्यात गेल्या काही दिवसांपासूनच्या राजकीय घडामोडी पाहता जनता नेमकी कोणाला मतदान करते? हे पाहणं महत्त्वाचं होतं. उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी तीन महिन्यांपूर्वी राष्ट्रवादी पक्षात मोठं बंड पुकारलं आणि ते भल्यामोठ्या आमदारांच्या ग्रुपसह सत्तेत सहभागी झाले. राष्ट्रवादीचे तब्बल 9 नेते मंत्री बनले. या राजकीय घडामोडीमुळे महाराष्ट्राच्या राजकारणात आणखी एक भूकंप आला. या भूकंपामुळे अनेकांना धक्का बसला. विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्याविरोधात अजित पवार यांनी भूमिका घेतली. त्यामुळे राज्याची जनता निवडणुकीत कुणाला साथ देते? याबाबतची उत्सुकता होती. अखेर काल राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींमध्ये मतदान पार पडलं. त्याचा निकाल आज समोर आलाय. ग्रामपंचायत निवडणुकीचा निकाल हा सत्ताधारींच्या बाजूने लागला आहे. पण मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष चौथ्या क्रमांकावर गेलाय.
राज्यातील 2 हजार 359 ग्रामपंचायतींच्या निवडणुकीमध्ये भाजप हा सर्वात मोठा पक्ष ठरला आहे. भाजपला या निवडणुकीत सर्वाधिक 717 जागांवर विजय मिळाला आहे. त्यापाठोपाठ उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या गटाला 382 जागांवर यश मिळालं आहे. तर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचा पक्ष या यादीत चौथ्या क्रमांकावर आहे. एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात राज्यात सरकार आहे. पण त्यांच्या पक्षाला या निवडणुकीत 273 जागांवर यश मिळालं आहे. त्यांचा पक्ष या निवडणुकीत चौथ्या क्रमांकाचा पक्ष ठरलाय. भाजप नेहमीप्रमाणे मोठा भाऊ तर अजित पवार यांचा गट दुसरा मोठा भाऊ ठरला आहे. या तीनही पक्षांच्या महायुतीने सर्वाधिक तब्बल 1372 जागांवर विजय मिळाला आहे. तर महाविकास आघाडीचा या निवडणुकीत सुपडा साफ झालाय.
याआधी सत्तांतर झाल्यानंतर पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणुकांमध्या महाविकास आघाडीने महायुतीवर बाजी मारलेली बघायला मिळाली होती. पण यावेळी महाविकास आघाडीची अत्यंत वाईट परिस्थिती बघायला मिळाली आहे. महाविकास आघाडीला या निवडणुकीत फक्त 638 जागांवर समाधान मानावं लागलंय. महाविकास आघाडीत काँग्रेस हा मोठा पक्ष ठरला आहे. तर पूर्ण निवडणुकीच्या निकालानुसार काँग्रेस हा राज्यात तीन नंबरचा पक्ष ठरला आहे. काँग्रेसला एकूण 293 जागांवर यश मिळालं आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्या पक्षाला 205 जागांवर समाधान मानावं लागलं आहे. तर ठाकरे गटाला सर्वात कमी अवघ्या 140 जागांवर समाधान मानावं लागलं आहे.
महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या दीड वर्षात अनेक घडामोडी घडल्या आहेत. शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात मोठी फूट पडली. त्यानंतर अनेक घडामोडी घडल्या. या घडामोडींनंतर जनतेने पक्षाच्या प्रमुखांना सर्वाधिक मतदान न करता शिंदे गट आण अजित पवार गटाला मतदान करणं पसंत केलं आहे. त्यामुळे चर्चांना उधाण आलंय. विशेष म्हणजे ही निवडणूक लोकसभा निवडणुकीच्या आधी महत्त्वाची निवडणूक मानली जात होती. या निवडणुकीतून महाराष्ट्रातील जनतेचा नेमका मूड काय? याबाबत अनेकजण अंदाज लावू शकतात. त्यामुळे आगामी काळ ठाकरे गट आणि शिंदे गटासाठी फार महत्त्वाचा असण्याची शक्यता आहे.