मुंबई | 20 डिसेंबर 2023 : महाराष्ट्रात पुन्हा एकदा कोरानाने थैमान घालण्यास सुरुवात केली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत नव्याने वाढ होण्यास सुरुवात झाली आहे. काही दिवसांपूर्वी केरळमध्ये कोरोनाचा नवा व्हेरिएंट सापडल्याची माहिती समोर आली होती. या व्हेरिएंटमुळे केरळमध्ये तीन जणांचा मृत्यू झाल्याचीदेखील माहिती समोर आली. त्यानंतर आता कोरोनाच्या या नव्या व्हेरिएंटने महाराष्ट्रात शिरकाव केल्याची माहिती समोर आली आहे. विशेष म्हणजे कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत एकाच दिवशी तब्बल 14 नवे कोरोनाबाधित रुग्ण आढळल्याने खळबळ उडाली आहे. महाराष्ट्रासाठी खरंतर ही धोक्याची घंटा मानली जात आहे. महाराष्ट्रात सक्रिय कोरोनाबाधित रुग्णांची आकडेवारी 45 वर पोहोचली आहे. यामध्ये मुंबईतील 27, ठाण्यातील 8, रायगड 1, पुणे 8, कोल्हापूरमधील 1 रुग्णाचा समावेश आहे.
कोरोनाबाधितांचा आकडा सारखा वाढतोय. विशेष म्हणजे संपूर्ण देशभरात कोरोनाबाधितांची आकडेवारी वाढताना दिसत आहे. देशात सध्या 2311 सक्रिय कोरोनाबाधित रुग्ण आहेत. कोरोनाबाधितांचा वाढता आकडा पाहता महाराष्ट्र शासन सतर्क झालं आहे. कोरोनाच्या नवीन व्हेरीयंटच्या दृष्टीने राज्य सरकारने तयारी सुरु केल्याची माहिती समोर आली आहे.
कोरनाच्या नव्या व्हेरिएंटचा प्रादुर्भाव पाहता राज्यातील 17 डिसेंबरला विविध रुग्णालयांमध्ये तयारीच्या दृष्टीने मॉकड्रिल पार पडलं आहे. JN.1 हा ओमिक्रॉन व्हेरीयंटचा उपप्रकार असून, यामुळे रुग्णांमध्ये सौम्य प्रकारची लक्षणे आढळून येत आहेत. त्यामुळे या व्हेरीयंटची भीती बाळगण्याची गरज नाही. तथापी कोविड प्रतिबंधासाठी आवश्यक दक्षता घेण्याची गरज आहे, असं शासनाकडून स्पष्ट करण्यात आलं आहे.
राज्यामध्ये आजपर्यंत एक JN.1 या व्हेरियंटचा रुग्ण सापडला आहे. हा रुग्ण सिंधुदुर्ग येथील 41 वर्षाचा पुरूष आहे. सर्व नागरिकांनी आवश्यकतेनुसार गरजेच्या ठिकाणी मास्क घालणे, वारंवार हात धुणे आणि कोविड नियमांचे पालन करणे गरजेचे आहे. या नवीन व्हेरीयंटच्या पाश्र्वभूमीवर सर्व जिल्हयांना दक्षता घेण्याचे कळविण्यात आलं आहे. रुग्णांचे सर्वेक्षण अधिक सक्षम करण्यासाठीच्या सूचना देण्यात आल्या आहेत.
या सर्वेक्षणांमध्ये आढळून आलेल्या I.L.I आणि SARI रुग्णांचे कोविड चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. याबरोबर सर्व जिल्ह्यांना कोविड चाचण्या वाढविण्याचे सांगण्यात आले आहेत. या अनुषंगाने महाराष्ट्र राज्यामध्ये कोविड पूर्व तयारी करण्यात आलीय. त्यामध्ये सर्व जिल्हयामध्ये आरोग्य संस्थाचे मॉकड्रील 17 डिसेंबरला पूर्ण करण्यात आले.
भारत सरकारच्या सूचनेनुसार, कोविडच्या परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर रुग्णालयीन पूर्वतयारीचा एक महत्वाचा भाग म्हणून राज्यातील द्वितीय आणि तृतीय स्तरावरील सर्व आरोग्य संस्थांचे मॉकड्रील 15 ते 17 डिसेंबर दरम्यान करण्यात आले. राज्यातील सर्व जिल्हे, महानगरपालिका आणि शासकीय वैद्यकीय महाविद्यालयांनी या महत्वपूर्ण मॉकड्रीलमध्ये सहभाग नोंदविला. रुग्णालयातील उपलब्ध खाटा, आयसीयु, सुविधा, यंत्रसामुग्री, ऑक्सिजन सुविधा, औषध साठा, मनुष्यबळ, मनुष्यबळाचे प्रशिक्षण, टेलिमेडीसीनची सुविधा या सर्व बाबतीत राज्यातील रुग्णालयांचा आढावा घेण्यात आला.