मुंबई : राज्य सरकारने राज्यातील सर्व शाळा येत्या 17 ऑगस्टपासून सुरु करण्याचा निर्णय काल (10 ऑगस्ट) घेतला होता. संबंधित निर्णय काल संध्याकाळी जाहीर करण्यात आला होता. मात्र, अवघ्या 24 तासात या निर्णयाला राज्य सरकारने ब्रेक दिला आहे. शाळा-कॉलेज उघडण्याबाबतचा अंतिम निर्णय टास्क फोर्ससोबत चर्चा करुन मुख्यमंत्री घेतील, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीनंतर सांगितलं. त्यामुळे याबाबतचा अंतिम निर्णय उद्यापर्यंत येण्याची शक्यता आहे.
“शाळा आणि कॉलेज संदर्भात नोटीफिकेशनमध्ये आम्ही स्पष्ट केलं आहे. राज्यभरातील त्या त्या भागातील प्रशासन शाळा-कॉलेज उघडण्याबाबत निर्णय घेतील. टास्क फोर्स आणि पिडीयाट्रीक टास्क फोर्स तसेच पहिल्या कोरोनाच्या लाटेपासून असलेला टास्क फोर्स सर्वांनीच शाळा-कॉलेज सुरु करण्यास विरोध दर्शवला आहे. याच अनुषंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी टास्क फोर्स आणि शिक्षण विभागाचे अधिकारी यांच्यासोबत संध्याकाळी बैठक घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्या बैठकीत शाळा-कॉलेजबाबत अंतिम निर्णय होईल. त्यामुळे शाळेच्या बाबतीत जो काही निर्णय असेल तो आज रात्री किंवा उद्या सकाळपर्यंत जाहीर होईल”, असं आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सांगितलं.
“मी स्वत: हायर एज्यूकेशनचे डायरेक्टरसोबत बोलल्यानंतर त्यांनी सांगितलं की, प्रत्येक विद्यापीठाचे कुलगुरु, त्या विद्यापीठाच्या अखत्यारित येणारे जिल्हे, तसेत शिक्षण संस्था यांच्या चर्चा करुन दोन-चार दिवसात आरोग्य विभागात अहवाल दिला जाईल. नंतर कॉलेज संदर्भात निर्णय होईल”, असं त्यांनी सांगितलं.
“टास्क फोर्सने भीती व्यक्त केली आहे. कारण दहावीपर्यंतच्या विद्यार्थ्यांचं अद्याप लसीकरण झालेलं नाही. इतर राज्यात असे प्रसंग घडलेले आहेत. रिस्क घेऊ नये, असं त्यांना वाटतं. त्यामुळे याबाबतची बैठक घेऊन अंतिम निर्णय होईल”, असं राजेश टोपे यांनी सांगितलं.
“फक्त अकरावी-बारावी संदर्भात ग्रामीण आणि शहरी भागात शाळा सुरु करण्याबाबतचा याआधी निर्णय घेण्यात आला आहे. आज कॅबिनेटमध्ये देखील याबाबत चर्चा झाली. त्याबाबत मुख्यमंत्री, शिक्षण विभाग आणि आरोग्य विभागाची बैठक होईल. त्या बैठकीत जो निर्णय होईल, तो खरा अंतिम निर्णय होईल. या बैठकीत टास्क फोर्सचे सर्व सदस्य उपस्थित असतील”, अशी माहिती टोपे यांनी दिली.
संबंधित बातम्या :
हॉटेल्स रात्री 10 पर्यंत सुरु राहणार, पण अटी आणि शर्थी लागू, वाचा काय आहेत नियम ?