मुंबई : राज्यात कोरोनाने प्रचंड थैमान घातलं आहे. राजधानी मुंबईत कोरोना प्रचंड वेगात फोफावतोय. त्यामुळे सरकारची चिंता वाढली आहे. अशा परिस्थितीत मुंबई आणि उपनगरातील सर्वसामान्यांची लाईफलाईन मानली जाणारी लोकलवर राज्य सरकार पुन्हा निर्बंध आणण्याच्या तयारीत आहे. राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी आज प्रसारमाध्यमांना प्रतिक्रिया देताना या विषयावर भाष्य केलं (Rajesh Tope on Mumbai Local Train).
आरोग्यमंत्री लोकलबाबत नेमकं काय म्हणाले?
“मुंबईत कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. सर्वसामान्य नागरिकांनी नियम पाळले पाहिजे. मास्क, सोशल डिस्टन्सिंगचं पालन केलं पाहिजे. पण लोकांनी नियम पाळले नाहीत तर लोकलबाबत काही कठोर निर्णय घ्यावे लागतील”, असं राजेश टोपे म्हणाले (Rajesh Tope on Mumbai Local Train).
राज्यात पुन्हा लॉकडाऊन?
राज्यात कोरोना रुग्णांची संख्या प्रचंड प्रमाणात वाढत आहे. त्यामुळे सर्वसामान्यांना राज्यात पुन्हा लॉकडाऊन होईल, अशी भीती वाटत आहे. याबाबत आरोग्य मंत्र्यांना प्रश्न विचारला असता, लॉकडाऊन हा शेवटचा पर्याय आहे, असं त्यांनी सांगितलं.
‘कॅबिनेट बैठकीत चर्चा होईल’
“मुख्यमंत्र्यांनी या आठवड्यात आढावा घेऊ असं म्हटलं आहे. ही बैठक या आठवड्यात कधीही होऊ शकेल. उद्या कैबिनेट बैठक आहे. या बैठकीत लॉकडाऊन आणि कोरोना स्थितीवर सविस्तर चर्चा होईल. कॅबिनेट बैठकीच्या चर्चेअंती पुढील उपाययोजना आणि निर्णय घेतले जातील”, असंदेखील राजेश टोपे यांनी सांगितलं.
महाराष्ट्रात कोरोना रुग्णांच्या आकडेवारीत कुठलीही लपवाछपवी होत नाही. इतर राज्यात बहुदा आकडे लवपले जात असतील, अशी शंका टोपे यांनी व्यक्त केली आहे. कारण काही राज्यात निवडणूक होत आहे. मोठ्या सभा होत आहेत. पण तिथली रुग्णसंख्या कमी आहे. त्याचबरोबर महाराष्ट्र अन्य राज्यांच्या तुलनेत मोठं राज्य आहे. महाराष्ट्रात साडे बारा कोटी लोक राहतात. त्यामुळे तुलना करायची झाल्यास रुग्णसंख्येत महाराष्ट्राच्या पुढेही काही राज्य असल्याचं टोपे म्हणाले.
होळीवर निर्बंध
येत्या 28 आणि 29 मार्चला होळी आणि रंगपंचमी सण आहे. या सणाच्या मुंबई महापालिका नियमावली जाहीर करणार आहे. सार्वजनिक ठिकाणी आणि नातेवाईकांसोबत होळी साजरी करण्यास बंदी घालण्यात येणार आहे.
हेही वाचा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या पत्नी रश्मी ठाकरे कोरोना पॉझिटिव्ह