राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या झळा, तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय?

| Updated on: Sep 06, 2023 | 5:13 PM

राज्यासमोर दुष्काळ आणि पाणीटंचाई नावाचं मोठं संकट उभं राहण्याची शक्यता आहे. कारण राज्यात पावसाने दडी मारली आहे. अनेक जिल्ह्यांमध्ये पाणीटंचाईमुळे भीषण परिस्थिती आहे.

राज्यातील 22 जिल्ह्यांमध्ये दुष्काळाच्या झळा, तुमच्या जिल्ह्याची परिस्थिती काय?
Follow us on

मुंबई | 6 सप्टेंबर 2023 : महाराष्ट्र दुष्काळाच्या संकटाच्या सावटाखाली आहे. राज्यात यावर्षी फार कमी पाऊस पडलाय. त्यामुळे आगामी काळात पाऊस पडला नाही तर पाणीटंचाईच्या झळा जास्त तीव्र झालेल्या बघायला मिळण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे राज्यात सध्याच्या स्थितीत कमी पाणीसाठा आहे. अनेक धरणांमध्ये पाण्याच्या पातळीत दिवसेंदिवस घट होताना दिसत आहे. त्यामुळे आगामी काळात भीषण पाणीटंचाईचं संकट उभं राहू शकतं. याशिवाय पाऊस नसल्याने मध्य महाराष्ट्र, विदर्भ, मराठवाडा आणि खान्देशातील काही भागांत पिकांचं प्रचंड नुकसान झालंय.

राज्यातून पावसाने सुट्टी घेतली आहे. त्यामुळे शेतकरी प्रचंड संकटात सापडले आहेत. गेल्या महिन्यात हवा तसा पाऊस पडला नाही म्हणून पिकांचं प्रचंड नुकसान झालंय. याशिवाय ऑगस्ट महिना कोरडा गेल्यानंतर सप्टेंबरमध्ये तरी पाऊस होईल, अशी आशा लावून बसलेल्या बळीराजाच्या पदरी आता निराशाच पडली आहे. कारण पावसाने पाठ फिरवल्याने राज्यातील 22 जिल्हे कोरडेठाक आहेत. तलाव, विहिरील कोरड्या पडल्यामुळे पिकं करपू लागली आहेत.

राज्यात दुष्काळाच्या झळा

विदर्भ, मराठवाडाच नाही तर पश्चिम आणि उत्तर महाराष्ट्रात दुष्काळाच्या झळा बसायला लागल्या आहेत. या भागात पाणी चिंता निर्माण झालीय. त्यामुळे शेतकरी हवालदिल झालाय. पाऊस पडत नसल्याने किमान सरकारने तरी लक्ष द्यावं, असं शेतकऱ्यांचं म्हणणं आहे. राज्यातील 1995 गावे आणि वाड्या-वस्त्यांमध्ये पिण्याच्या पाण्याची टंचाई आहे. पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करण्यासाठी 406 टँकर तैनात करण्यात आली आहेत. कमी पावसाचा राज्यातील 14 जिल्ह्यांच्या 1054 महसूल मंडळातील पिकांवर परिणाम झालाय.

सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस

गेल्या तीन महिन्यांमध्ये सरासरीच्या 75 टक्क्यांपेक्षा कमी पाऊस पडलाय. धरणांमध्ये गेल्या वर्षीच्या तुलनेत 20 टक्क्यांपेक्षा कमी पाणीसाठा आहे. पावसाच्या कमतरेचा राज्यातील एक तृतीयांश पिकांवर परिणाम झालाय. राज्यातील 2579 महसूल मंडळांपैकी 446 महसूल मंडळांमध्ये 21 दिवसांपेक्षा कमी पाऊस पडलाय. तर 608 महसूल मंडळांमध्ये 15 दिवसांपेक्षा जास्त काळ पाऊस नाही, असं कृषी आयुक्त कार्यालयाच्या अहवालात म्हटलं आहे.

महत्त्वाच्या धरणांमधील पाणीसाठा किती?

  • कोयना धरणात गेल्यावर्षी 94.60 टक्के पाणीसाठा होता. पण यावर्षी हाच पाणीसाठा 80.36 टक्क्यांवर आलाय.
  • उजनी धरणात गेल्यावर्षी 100 टक्के पाणी साठा होता. पण यावर्षी फक्त 17.54 टक्के पाणीसाठा आहे.
  • जायकवाडी धरणात गेल्यावर्षी 97.75 टक्के पाणीसाठा होता. पण यावर्षी तो अवघा 32.94 इतकाच आहे.
  • माजलगाव धरणात गेल्यावर्षी 61.83 टक्के पाणीसाठा होता. पण आता या धरणात फक्त 12.59 टक्के पाणीसाठी आहे.
  • मांजरा धरणात गेल्यावर्षी 43.05 टक्के पाणीसाठा होता. पण यावर्षी हा पाणीसाठा अवघा 23.98 टक्के पाणीसाठा आहे.