मुंबई : राज्यात कोरोनाबाधितांच्या संख्येत सातत्याने वाढ होत आहे. गेल्या काही दिवसांपासून महाराष्ट्रात जवळपास 7 ते 8 हजारांहून अधिक रुग्ण आढळत आहे. त्यामुळे काही जिल्ह्यात लॉकडाऊन घोषित करण्यात आला आहे. मात्र तरीही रुग्णसंख्या आटोक्यात येत नसल्याने सरकारकडून संपूर्ण महाराष्ट्रात लॉकडाऊन लावण्याची शक्यता वर्तवली जात आहे. (Maharashtra Lockdown Again After Corona patient Increase)
राज्यातील कोरोनाची स्थिती काय?
राज्यात गेल्या दोन दिवसात 20 हजारांच्या आसपास रुग्ण आढळले आहेत. काल (8 मार्च) 8 हजार 744 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर 22 जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यात 97 हजार 638 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तसेच राज्यातील मृत्यूदर हा 2.36 टक्क्यांवर पोहोचला आहे. तर रविवारी 7 मार्चला 11 हजार 141 कोरोना रुग्ण आढळले आहेत. तर 38 जणांचा मृत्यू झाला होता.
तर कोरोनाचे हॉट्स्पॉट ठरलेल्या मुंबईत पुन्हा एकदा रुग्णसंख्येत वाढ होत आहे. काल मुंबईत 1 हजार 014 कोरोनाबाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर चार जणांचा मृत्यू झाला होता. तर रविवारी मार्चला 1 हजार 360 कोरोना रुग्ण आढळून आले आहेत. मुंबईत सध्या 9 हजार 373 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तीन आठवड्यापूर्वी मुंबईत दरदिवशी 500 पेक्षा कमी रुग्ण आढळत होते. त्यानंतर मात्र अचानक कोरोना रुग्णांच्या संख्येत वाढ होत आहे. त्यामुळे मुंबई पुन्हा एकदा कोरोनाचे हॉटस्पॉट ठरते का? अशी भीती आता सर्वांना वाटू लागली आहे.
मुंबई महापालिकेने दिलेल्या माहितीनुसार, गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्येत सातत्याने वाढ होत आहे. मुंबईतील अनेक इमारतींमध्ये कोरोनाचे रुग्ण आढळत आहेत. वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशतः लॉकडाऊनचा सूचक इशारा दिला आहे. दररोज वाढत्या कोरोना रुग्णांची आकडेवारी पाहता आवश्यक असल्यास सरकार अंशतः लॉकडाऊनचा निर्णय घेऊ शकतं, असे अस्लम शेख म्हणाले.
राजधानी मुंबई हे शहर अत्यंत दाट लोकवस्तीचे शहर म्हणून ओळखले जाते. लोकसंख्या जास्त असल्यामुळे येथे कोरोना संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढतोय. अशीच रुग्णवाढ कायम राहिली तर आगामी काळात येथे कोरोना संसर्गावर नियंत्रण ठेवणे अशक्य असल्याचे सांगितले जात आहे. या पार्श्वभूमीवर मुंबईचे पालकमंत्री अस्लम शेख यांनी राजधानीत अंशत: लॉकडाऊनचा इशारा दिला आहे.
अस्लम शेख यांनी अंशत: लॉकडाऊनचे विधान करण्याआधी मुंबईच्या आरोग्य विभागाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना कोरोना संसर्गाबाबत एक प्रेझेंटेशन दिलं. यावेळी वाढत्या कोरोना रुग्णांच्या आकड्यावर मुख्यमंत्र्यांनी काळजी व्यक्त केली. या बैठकीत अंशतः लॉकडाऊनच्या मुद्द्यावरही चर्चा झाल्याचे सांगण्यात येत आहे. (Maharashtra Lockdown Again After Corona patient Increase)
ठाणे शहरात अनलॉकनंतर सर्वकाही आलबेल झाले असतानाच कोरोनाचा संसर्ग पुन्हा एकदा वाढण्यास सुरुवात झाली. सध्या ठाण्यात कोरोनाग्रस्तांचे प्रमाण चांगलेच वाढले आहे.अशाच प्रमाणात रुग्णांचा संसर्ग वाढत गेला तर आगामी काळात कोरोनावर नियंत्रण मिळवणे शक्य होणार नाही. त्यामुळे खबरदारी म्हणून ठाणे महापालिका क्षेत्रात 16 ठिकाणं कोरोना हॉटस्पॉट (प्रतिबंधित क्षेत्र ) निश्चित केली आहेत. त्यामुळे आता कोरोनाला अटकाव करण्यासाठी या 16 हॉटस्पॉटमध्ये येत्या 31 मार्चपर्यंत पुन्हा लॉकडाऊन असेल. अशी माहिती ठाण्याचे महापालिका आयुक्त डॉ. विपीन शर्मा यांनी दिली.
पुणेकरांच्या चिंतेत वाढ
दरम्यान पुण्यात फेब्रुवारीच्या दुसऱ्या आठवड्यापासून कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढू लागली आहे. त्यामुळे पुणेकरांच्या चिंतेत वाढ झाली आहे. पुण्यात कोरोना रुग्ण वाढत असल्याने शहरातील कंटेनमेंट झोनमध्ये वाढ होत आहे. पुणे पालिकेकडून गेल्याच आठवड्यात 42 कंटेनमेंट झोन घोषित करण्यात आले होते. त्यात आता 20 कंटेनमेंट झोनची भर पडली आहे. त्यामुळे पुण्यातील कंटेनमेंट झोनची संख्या 62 वर पोहोचली आहे.
सोमवारी (8 मार्च) पुणे शहरात नव्याने 248 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. शहरातील एकूण रुग्णसंख्या आता 1 लाख 01 हजार 005 इतकी झालीय. दुसरीकडे पुणे महापालिका हद्दीत 782 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. यामुळे पुणे महापालिका क्षेत्रातील एकूण रुग्णसंख्या 2 हजार 15 हजार 804 इतकी झाली आहे. पुण्यात मृतांची एकूण संख्या 8 हजार 092 इतकी झाली आहे. सध्या पुण्यात 19 हजार 030 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
औरंगाबादमध्येसुद्धा कोरोना रुग्णांची संख्या लक्षणीयरित्या वाढताना दिसत आहे. येथे नागरिकांना कोरोना नियम पाळण्याचे आवाहन केले जात असूनही प्रत्यक्षात मात्र या नियमांची अंमलबजावणी होताना दिसत नाहीये. त्यामुळे वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता येत्या 11 मार्चपासून औरंगाबादेत अंशत: लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. हा लॉकडाऊन 11 मार्च ते 4 एप्रिलपर्यंत लागू असेल. औरंगाबादमधील कोरोना परिस्थिती आणि लॉकडाऊन याबाबत नुकतंच वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत याबाबतचा निर्णय घेण्यात आला. त्यानंतर अंशत: लॉकडाऊनची घोषणा केल्यानंतर औरंगाबाद शहरातील भाजी मंईडी, बाजारपेठात तुफान गर्दी होताना दिसत आहे. (Maharashtra Lockdown Again After Corona patient Increase)
मुंबई आणि औरंगाबाद पाठोपाठ आता नाशिक जिल्ह्यातही कडक निर्बंध लादण्यात आलेत. नाशिक आणि मालेगावमध्ये सर्व शाळा, कॉलेज, कोचिंग क्लासेस पूर्णपणे बंद राहणार आहेत, अशी माहिती नाशिक जिल्हााधिकाऱ्यांनी दिलीय
राज्यात मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात कोरोना रुग्णांची संख्या घटली होती. त्यांनर आता फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यापासून कोरोनाने पुन्हा डोकं वर काढलं आहे. नाशिकमध्येही कोरोना रुग्णांच्या संख्या वाढत आहे. त्यामुळे सामाजिक, राजकीय, धार्मिक समारंभांवर पूर्णतः बंदी लादण्यात आली आहे. तसेच जिल्ह्यातील धार्मिक स्थळं सकाळी 7 ते संध्याकाळी 7 पर्यंत उघडी असतील. शनिवार आणि रविवार सर्व धार्मिक स्थळं बंद राहणार आहेत. भाजी मंडई 50 टक्के क्षमतेने सुरू राहणार असून, कोरोना जनजागृती सप्ताहही राबवण्यात आला.
नाशिकमध्ये किती कोरोना रुग्ण?
नाशिक जिल्ह्यात कोरोना रुग्णांचा वाढता आलेख कायम आहे. येथे काल दिवसभरात 645 नवे रुग्ण आढळले होते तर आज या जिल्ह्यात नव्याने 675 कोरोनाग्रस्त आढळले आहेत. येथे अवघ्या 2 दिवसांत 1320 नव्या कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली. (Maharashtra Lockdown Again After Corona patient Increase)
संबंधित बातम्या :
Mumbai Lockdown news | तर मुंबईत अंशत: लॉकडाऊन, पालकमंत्र्यांचा इशारा
महाराष्ट्रातील तीन शहरं लॉकडाऊनच्या उंबरठ्यावर, तुमच्या शहरातील कोरोना स्थिती काय?