मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांनी 2 जुलैला उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. त्यांच्यासह राष्ट्रवादीच्या आणखी आठ नेत्यांनी मंत्रीपदाची शपथ घेतली. या सर्व नव्या मंत्र्यांना कोणती खाती मिळतात हे पाहणं औत्सुक्याचं ठरलं होतं. अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिवसेना शिंदे गटाचा विरोध होता. त्यामुळे खातेवाटपाचा तिढा निर्माण झाला होता. गेल्या अनेक दिवसांपासून हा तिढा सुटताना दिसत नव्हता. या तिढ्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, अजित पवार यांच्यात सातत्याने बैठका पार पडल्या. वरिष्ठ पातळीवर सारख्या बैठका पार पडल्यानंतरही तोडगा निघत नव्हता.
दोन दिवसांपू्र्वी अजित पवार हे दिल्लीत जावून आले. दिल्लीत त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांची भेट घेतली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या वर्षा निवासस्थानी सातत्याने बैठका पार पडल्या. तसेच उपमुख्यमंत्री अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांच्याही निवासस्थानी बैठकांच्या जंत्री सुरु होत्या. या सगळ्या घडामोडींनंतर अखेर आज खातेवाटप जाहीर झालं आहे. या खातेवाटपात शिंदे गट आणि भाजपच्या काही मंत्र्यांना मोठा फटका बसला आहे. कारण चांगली खाती त्यांच्या हातून निसटली आहेत.
शिवसेना शिंदे गटाचे मंत्री अब्दुल सत्तार यांना मोठा फटका बसला आहे. शेती हे महत्त्वाचं खातं आहे. याशिवाय शेतकरी मंत्री हा राज्यातील शेतकऱ्यांचं विधानसभेत प्रतिनिधित्व करतो, असं मानलं जातं. हा मंत्री शेतकऱ्यांचा लोकप्रतिनिधी असतो. तो शेतकऱ्यांचे प्रश्न मांडतो, चांगले निर्णय घेतो. त्यामुळे कृषीमंत्रीपदाला चांगला मान आहे.
अब्दुल सत्तार यांना वर्षभरापूर्वी सत्तापालट झाली तेव्हा कृषीमंत्रीपदाची जबाबदारी मिळाली. ही अब्दुल सत्तार यांच्यासाठी पर्वणी होती. पण गेल्या वर्षभरात अब्दुल सत्तार यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्य केली. तसेच त्यांच्यावर खोटी धाड टाकण्याचे देखील आरोप झाले. विविध मुद्द्यांवरुन त्यांची कृषीमंत्रीपदाची कारकीर्द वादग्रस्त ठरली. त्यानंतर अखेर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना मोठा निर्णय घ्यावा लागला आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अब्दुल सत्तार यांच्याजवळ असलेलंल कृषी खातं काढून घेतलं आहे. त्यांच्याकडे आता अल्पसंख्याक विकास विभागाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. तर कृषी विभागाची जबाबदारी ही नवनिर्वाचित राष्ट्रवादी काँग्रेसचे मंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. धनंजय मुंडे यांच्यासाठी ही गुड न्यूज आहे. याआधी महाविकास आघाडीचं सरकार असताना ते सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभागाचे मंत्री होते.
विशेष म्हणजे शिंदे गटातील आणखी एका मंत्र्यांना जोरदार धक्का बसला आहे. मंत्री संजय राठोड यांच्याकडे असणारं अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबदारी काढण्यात आली आहे. त्यांना आता मृदा आणि जलसंधारण विभागाची जबाबदारी देण्यात आली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री धर्मरावबाबा भगवंतराव आत्राम यांच्याकडे अन्न आणि औषध प्रशासन विभागाची जबाबादारी सोपवण्यात आली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंद यांच्याकडे मदत व पुनर्वसन खातं होतं. पण हे खातं देखील आता राष्ट्रवादी काँग्रेसकडे गेलं आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री अनिल पाटील यांच्याकडे मदत व पुनर्वसन खात्याची जबाबदारी देण्यात आली आहे.
या खातेवाटपात भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांनादेखील फटका बसला आहे. कारण भाजपचे मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे असणारं वैद्यकीय शिक्षण व विशेष सहाय्य विभागाची जबाबादारी काढण्यात आली आहे. त्यांच्याऐवजी आता ही जबाबदारी राष्ट्रवादी काँग्रेसचे नवनिर्वाचित मंत्री हसन मुश्रीफ यांना देण्यात आली आहे. हा महाजन यांच्यासाठी मोठा झटका मानला जातोय.
या खातेवाटपात भाजपला आणखी एक मोठा झटका बसला आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे अर्थ खातं होतं. पण आता हे खातं अजित पवार यांना देण्यात आलं आहे. विशेष म्हणजे अजित पवार यांना अर्थ खातं देण्यास शिंदे गटाचा देखील विरोध होता. पण अखेर अजित पवार यांना अर्थ खातं देण्यात आलं आहे. दुसरीकडे भाजप मंत्री अतुल सावे यांच्याकडून सहकार खातं काढण्यात आलं आहे. पण तरीही त्यांना गृहनिर्माण, इतर मागास व बहुजन कल्याण सारख्या ताकदवान खात्यांची जबाबदारी मिळाली आहे.