एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार, मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली

| Updated on: Jul 10, 2024 | 9:46 PM

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 47 आमदार असल्याची माहिती आहे. ताज लँड इथल्या बेसमेंटमधील हॉलमध्ये आमदारांची आज बैठक होणार आहे. या बैठकीत अतिशय महत्त्वाच्या घडामोडी घडणार आहेत.

एकनाथ शिंदे 47 आमदारांना भेटणार, मुंबईच्या ताज लँड हॉटेलमध्ये मोठ्या राजकीय हालचाली
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
Image Credit source: TV9 NEWS NETWORK
Follow us on

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज रात्री 10 वाजता वांद्र्यातील ताज लँड हॉटेलमध्ये दाखल होणार आहेत. विधान परिषद निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेना शिंदे गटाच्या सर्व आमदारांना ताज लँड हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे. या आमदारांची आज रात्री 10 वाजता बैठक बोलावण्यात आली आहे. या बैठकीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आपल्या आमदारांना मार्गदर्शन करणार आहेत. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, मुख्यमंत्र्यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आमदारांची आज मतदानाची प्रॅक्टिस होणार आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडून सर्व आमदारांना एका बॅलेट पेपरवर मतदान करायला सांगितलं जाणार आहे. त्याबाबतचं प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यानंतर मतपेटीमध्ये ते मत कसं टाकायचं हे सांगितलं जाणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासोबत सध्या 47 आमदार असल्याची माहिती आहे. ताज लँड इथल्या बेसमेंटमधील हॉलमध्ये आमदारांची आज बैठक होणार आहे. या बैठकीला किती आमदार उपस्थित राहणार हे पाहणं महत्वाचं ठरणार आहे.

ठाकरे गटात काय घडतंय?

ठाकरे गटाकडून आज विधानपरिषद निवडणुकीच्या पक्षाच्या सर्व आमदारांसाठी स्नेहभोजनाचं आयोजन करण्यात आलं आहे. परेल येथील ITC ग्रँड हॉटेल येथे हा स्नेहभोजनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे. पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे देखील स्नेहभोजनासाठी उपस्थित राहणार आहेत. मुंबई पदवीधर आमदार अनिल परब निवडून आल्याने हे स्नेहभोजन अनिल परब यांनी आयोजित केल्याची माहिती आहे. याशिवाय 12 तारखेला विधान परिषदेची निवडणूक असल्याने आमदारांना हॉटेलमध्येच ठेवणार असल्याची माहिती मिळत आहे. ठाकरे गटाचे आमदार ITC गँड हॉटेलमध्ये आजपासून 12 जुलैपर्यंत राहणार आहेत.

हे सुद्धा वाचा

अजित पवार गटात हालचाली काय?

अजित पवार गटात आज महत्त्वाच्या घडामोडी घडल्या. अजित पवार यांनी आज विधान भवनात त्यांच्या दालनात राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सर्व आमदारांना तातडीने बोलावून घेतले. विधान परिषद निवडणुकीच्या अनुषंगाने यावेळी महत्त्वाची बैठक पार पडली. ही बैठक मतांचा राष्ट्रवादीचा कोटा निश्चित करण्याबाबतची बैठक असल्याची माहिती सूत्रांनी दिली. अजित पवार गटाच्या आमदारांना आता द ललीत हॉटेलमध्ये ठेवण्यात येणार आहे.

मैदानात कोण कोण?

भाजपचे उमेदवार

  • 1) पंकजा मुंडे
  • 2) परिणय फुके
  • 3) सदाभाऊ खोत
  • 4) अमित गोरखे
  • 5) योगेश टिळेकर

राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट)

  • 1) शिवाजीराव गर्जे
  • 2) राजेश विटेकर

शिवसेना

  • 1) कृपाल तुमाने
  • 2) भावना गवळी

शिवसेना – उबाठा

  • 1) मिलिंद नार्वेकर

शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार

  • 1) जयंत पाटील (शेकाप)

काँग्रेस

  • 1) प्रज्ञा सातव