मुंबई : गणेशोत्सव आठवड्याभरावर आलाय. अश्यात बाजारांमधली गर्दी वाढतेय. पण सध्या कोरोनाचा धोकाही पूर्णपणे टळलेला नाही. मुंबईत पूर्ण नियंत्रणात आलेला कोरोना पुन्हा वाढू लागलाय. गणपती विसर्जनावेळी होणाऱ्या गर्दीवर नियंत्रण ठेवण्यासाठी पालिकेने नवीन निर्णय (Ganeshotsav Guideline) घेतले आहेत. घरगुती-सार्वजनिक मूर्तीच्या (Ganpati Murti) विसर्जनासाठी ऑनलाइन नोंदणीची सुविधा उपलब्ध करून दिली आहे. नोंदणीसाठी सर्व 24 वॉर्डसाठी वेबसाईटची लिंक उपलब्ध करून दिली आहे. या ठिकाणी नोंदणी केल्यास मूर्तीच्या विसर्जनासाठी तारीख व वेळ निश्चित करता येणार आहे. नोंदणीनुसार 73 नैसर्गिक तलाव आणि बनवण्यात येणाऱ्या 173 कृत्रिम तलावांवर विसर्जनाची सुविधा मिळणार आहे. विसर्जनासाठी shreeganeshvisarjan.com ही वेबसाइटची लिंक उपलब्ध करून देण्यात आली आहे. विसर्जन स्थळांवर पालिकेच्या कर्मचाऱ्यांकडे विसर्जनासाठी मूर्ती सुपूर्द करता येणार आहे. या ठिकाणी मोठ्या मूर्तीसाठी क्रेनची व्यवस्थाही करण्यात येणार आहे.
विसर्जन स्थळांवर 210 नियंत्रण कक्ष, नियंत्रण कक्ष 210, जीवरक्षक – 679, मोटार बोट 46,जर्मन तराफा 33,स्वागत कक्ष 134, फ्लड लाइट 3069, सर्च लाइट 71, प्रथमोपचार केंद्र 155, निर्माल्य कलश 376,निर्माल्य वाहन / डंपर, टेम्पो 235, तात्पुरती शौचालये 112, निरीक्षण मनोरे 46 ,अॅम्ब्युलन्स 60 आणि आवश्यकतेनुसार संरक्षक कठडे या सुविधा पालिकेकडून देण्यात येणार आहेत.
मुंबईत ऑगस्टपासून पुन्हा कोरोनाबाधितांची दैनंदिन संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे पालिकेसमोर आगामी गणेशोत्सवात होणाऱ्या गर्दीचे आव्हान निर्माण झाले आहे. या पार्श्वभूमीवर गणेशोत्सवादरम्यान गर्दी टाळून सुरक्षितरीत्या गणेशोत्सव साजरा करण्याचे निर्देश मंडळांना परवानगी देतानाच देण्यात आले आहेत. तर विसर्जनाच्या मिरवणुकीत होणारी गर्दी टाळण्यासाठी उपाययोजना करण्यात येत आहेत. गणेशोत्सवासाठी जास्तीत जास्त 30 फूट उंचीचा मंडप असावा आणि 25 फुटांपेक्षा जास्त उंचीचा मंडप असल्यास पालिकेला त्याची माहिती देणे बंधनकारक करण्यात आले आहे. शिवाय मंडपामुळे रस्त्यावर खड्डे निर्माण केल्यास संबंधितांकडून प्रत्येक खड्यासाठी 2 हजार रुपयांचा दंड वसूल केला जाईल, असेही पालिका प्रशासनाकडून स्पष्ट करण्यात आले आहे.