मुंबई : मुंबईत मागच्या काही दिवसांपासून धुवाधार पाऊस कोसळतोय. त्यामुळे सकाळच्या वेळी कामावर जाणाऱ्या तसेच संध्याकाळी घरी परतणाऱ्या नोकरदारांचे हाल होतायत. शाळेला देखील सुट्टी देण्यात आली आहे. सततच्या पावसामुळे मुंबईकरांना घराबाहेर पाऊल ठेवताना छत्री, जॅकेट सोबत ठेवाव लागतय, सततच्या पावसामुळे अनेक नागरिकांच्या घरात छतावरुन पाणी गळती सुद्धा सुरु आहे.
पण त्याचवेळी या पावसामुळे एक चांगली बातमी सुद्धा आहे. जून महिन्यात पावसाने ओढ दिली होती. पाऊस लांबल्याने शेतकऱ्यांप्रमाणे सर्वसामान्य नागरिकही चिंतेत होते. कारण त्याचा पाणी पुरवठ्यावर परिणाम होणार होता.
मुंबईच्या तलावांमध्ये किती टक्के पाणीसाठा?
पण आता पावसामुळे मुंबईकरांची पाण्याची चिंता मिटली आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात तलावातील पाणीसाठा चांगलाच वाढला आहे. मुंबईच्या सात जलाशयात एकूण मिळून 58.93 टक्के पाणीसाठा आहे. बुधवारी सकाळपर्यंत 14,47,363 मिलियन लिटर पाणी तलावांमध्ये जमा झाले होते. आज हा आकडा आणखी वाढण्याची शक्यता आहे. मुंबईला पाणी पुरवठा करणाऱ्या सात जलाशयांपैकी तीन तलाव भरुन वाहू लागले आहेत.
मुंबईला पाणी पुरवठा करणारे किती तलाव ओव्हरफ्लो?
मुंबई महापालिकेच्या डाटानुसार, तुळशी तलाव 20 जुलैपासूनच ओव्हरफ्लो झाला आहे. विहार आणि तानसा तलाव बुधवारी सकाळी भरुन वाहू लागलेत. तानसा तलाव ठाणे जिल्ह्यात आहे. तिथे 22 जुलैला पाणीसाठा 86.65 टक्क्यांवरुन 99.91 टक्क्यांपर्यंत वाढला. विहार तलाव मुंबईच्या संजय गांधी नॅशनल पार्कमध्ये आहे. विहार तलाव 26 जुलैपासून भरून वाहू लागला.
कुठल्या तलावात किती टक्के पाणीसाठा?
अप्पर वैतरणामध्ये 31.42 टक्के आणि मध्य वैतरणामध्ये 67.95 टक्के पाणीसाठा आहे. भातसा आणि मोडक सागरमध्ये 49.70 टक्के आणि 87.69 टक्के पाणीसाठा आहे.