मुंबई: राज्यातील नगरपंचायत निवडणुकीचा काल निकाल लागला. या निवडणुकीत महाविकास आघाडीने घवघवीत यश मिळवलं आहे. तर भाजपनेही नेत्रदीपक कामगिरी केली आहे. त्यामुळे राज्याचं राजकारणावर टीव्ही9 मराठीने याबाबतचा पोल घेतला होता. नगरपंचायत निवडणुकीचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे? असा सवाल करून आम्ही जनतेचा कौल मागितला होता. त्यावर, 43 टक्के जनतेने भाजपला तर 41 टक्के लोकांनी शिवसेनेला धोका असल्याचं म्हटलं आहे.
नगरपंचायत निवडणुकीचे निकाल आल्यानंतर या निकालावर टीव्ही 9 मराठीने जनमताचा कौल घेतला. नगरपंचायतचा निकाल नेमका कुणासाठी धोक्याचा इशारा आहे? असा सवाल टीव्ही9 ने जनतेला युट्यूबवरून विचारला होता. या प्रश्नावर जनतेची मते मागवली होती. शिवसेना, काँग्रेस, राष्ट्रवादी आणि भाजपचे नाव देऊन होय/नाही असे दोन पर्याय विचारण्यात आले होते.
तब्बल 17 तास जनमताचा कौल घेण्यात आला. त्यात 43 टक्के लोकांनी भाजपला धोक्याचा इशारा असल्याचं म्हटलं आहे. तर 41 टक्के लोकांनी शिवसेनेला धोका असल्याचं म्हटलं आहे. 10 टक्के लोकांनी काँग्रेसला तर 7 टक्के लोकांनी केवळ राष्ट्रवादीला धोका असल्याचं म्हटलं आहे.
काल झालेल्या नगरपंचायत निवडणुकीत भाजपला सर्वाधिक 420 जागा मिळाल्या आहेत. राष्ट्रवादीला 370, काँग्रेसला 355, शिवसेनेला 298 जागा मिळाल्या आहेत. तर 358 अपक्ष निवडून आले आहेत.
या निवडणूक निकालावर काँग्रेस नेते विजय वडेट्टीवार यांनी भाष्य केलं आहे. आज जो कल दिसतो आहे हा कल भाजपला पुढचे पाच वर्षे सत्तेपासून दूर नेणारा आहे. या निवडणुका पुढच्या लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीचा पाया आहे. आता हा बेस मजबूत होत आहे. काँग्रेस हा जुना पक्ष आहे इतर जे पक्ष आहेत ते काँग्रेसमधून निर्माण झाले आहेत. काँग्रेसच्या मतांचे लोक आहेत ज्यांचं मतभेद झाले आणि त्यातून हे पक्ष निर्माण झाले आहेत, असे वडेट्टीवार यांनी सांगितलं. महाराष्ट्र हा काँग्रेसचा बालेकिल्ला राहिला आहे. येणाऱ्या दिवसात काँग्रेस मजबुतीने उभा राहील. या निकालाने पक्षाला ऊर्जा मिळाली आहे. राष्ट्रवादीला पश्चिम महाराष्ट्रात 100 जागा मिळाल्या असतील तर आम्हाला ही 60 जागा मिळाल्या आहेत. ते 60 टक्केच्यावर आम्ही पण आहोतच. येणाऱ्या दिवसात महापालिका निवडणुकीत पार्टी हायकमांडने सांगितलं की एकटं लढा तर एकटं लढू. आघाडीत लढा तर आघाडीत लढू, असं विजय वडेट्टीवार यांनी स्पष्ट केलं.
Maharashtra News Live Update : महाराष्ट्रासह देशभरातील महत्त्वाच्या बातम्यांचे LIVE अपडेट्स, ब्रेकिंग न्यूज फक्त TV9 Marathi वरhttps://t.co/3sHFQq82Tk#liveupdates | #BreakingNews
— TV9 Marathi (@TV9Marathi) January 20, 2022
संबंधित बातम्या: