थर्टीफर्स्टचं काऊंटडाऊन सुरू झालं आहे. अवघ्या काही तासात जुनं वर्ष सरणार आहे आणि नव्या वर्षाचं स्वागत केलं जाणार आहे. त्यामुळे संपूर्ण जगभरातील लोक सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नव्या वर्षाचं स्वागत करण्यासाठी सज्ज झाले आहेत. नव्या वर्षाच्या स्वागतानिमित्ताने पर्यटनस्थळी अलोट गर्दी झाली आहे. हॉटेल, रेस्टॉरंट बूक झाले आहेत. एवढेच नव्हे तर हॉटेलमध्ये राहण्यासाठी पर्यटक पाहिजे ती रक्कम मोजायला तयार आहे. तर हॉटेल मालकही अव्वाच्या सव्वा रक्कम आकारत आहे. रात्र धुंदीत जागवण्यासाठी तर तळीरामांचीही वेगळीच लगबग सुरू झाली आहे. मात्र, या सर्वांना चाप लावण्यासाठी पोलीस आणि वाहतूक पोलीसही सज्ज झाले आहेत. पेदाडांवर सीसीटीव्हीच्या माध्यमातून लक्ष ठेवलं जाणार आहे.
मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया परिसरात विदेशी पर्यटकांची प्रचंड रेलचेल झाली आहे. मुंबईत नवीन वर्षाचं स्वागत करण्यासाटी पर्यटक दाखल झाले आहेत. सकाळपासूनच देश-विदेशातील पर्यटकांनी गेटवे ऑफ इंडिया परिसरात हजेरी लावली आहे. तर, अलिबागला जाण्यासाठी मुंबईकरांची पहिली पसंती दिली आहे. अलिबागला जाण्यासाठी आज सकाळपासूनच पर्यटक गेटवे ऑफ इंडियामध्ये दाखल झाले आहेत. गेटवेवर पर्यटकांनी बोट पकडण्यासाठी रंगा लावल्या आहेत.
दरवर्षी 31 डिसेंबर साजरा करण्यासाठी लोणावळ्यात हजारो लोक येत असतात. लोणावळ्यात लायन्स पॉईंट, टायगर पॉईंट या ठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळेच दोन्ही ठिकाणी 31 डिसेंबर 2024 आणि एक जानेवारी 2025 दरम्यान पर्यटकांना बंदी घालण्यात आली आहे. याबाबतचे आदेश वडगाव मावळचे वनपरिक्षेत्र अधिकाऱ्यांनी दिले आहेत.
पुण्यातही पोलिसांचा मोठा बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. पुण्यात गर्दीच्या ठिकाणी मोठा बंदोबस्त ठेवण्यात आल्याचं पुण्याचे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी सांगितलं. पुण्यात 23 ठिकाणी ड्रंक अँड ड्राइव्हची मोहीम राबवण्यात येणार आहे. पहाटे 5 वाजेपर्यंत दारूची दुकाने सुरू ठेवण्यासाठी परवानगी देण्यात आली आहे. हॉटेल आणि पबमधून ड्रग्स दिलं जाऊ नये, त्याशिवाय अल्पवयीन मुलामुलींना दारू देऊ नये अशा सूचनाही देण्यात आल्या आहेत. तसेच थर्टीफर्स्टच्या दिवशी नियमांचं पालन न करणाऱ्या पब आणि हॉटेल्सवर कारवाई करण्यात येणार असल्याची माहितीही अमितेश कुमार यांनी दिली आहे.
31 डिसेंबर रोजी पुण्यात 3000 पोलीस अधिकारी आणि कर्माचारी तैनात असणार आहेत. तसेच 700 वाहतूक पोलीसही तैनात राहणार आहेत. सीसीटीव्ही कॅमेऱ्याचं लाइव्ह मॉनिटरिंग होणार आहे. त्यासाठीही कर्मचारी तैनात करण्यात आले आहेत. पुण्यात थर्टीफर्स्टच्या रात्री एमजी रोड, जंगली महाराज रस्ता याठिकाणी मोठी गर्दी होत असते. त्यामुळे त्याठिकाणीही नजर ठेवण्यात येणार आहे. शहरात एकूण 40 ठिकाणी अधिकृत पार्ट्या आणि कार्यक्रमांसाठी परवानग्या देण्यात आले आहेत. परवानग्यांसाठीचे अर्ज आले होते, अशी माहितीही त्यांनी दिली.
पुण्यात नववर्षाच्या स्वागतासाठी 31 डिसेंबरला गडकिल्ले, अभयारण्ये, आणि शहरातील टेकड्यांवर ‘सेलिब्रेशन’ करणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा वन विभागाने दिला आहे. निसर्गरम्य ठिकाणी जाऊन पर्यटकांची पार्ट्या करण्याची मानसिकता लक्षात घेऊन विभागातर्फे संरक्षित गड-किल्ल्यांच्या पायथ्याशी, राखीव वन क्षेत्रात विशेष बंदोबस्त ठेवण्यात येणार असून वन कर्मचारी रात्रभर गस्त घालणार आहेत, अशी माहितीही देण्यात आली आहे.
सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी आणि नवीन वर्षाच्या स्वागतासाठी पर्यटक कोकणात आले आहेत. त्यामुळे कोकणातील सर्व हॉटेल्स आणि पब बुक झाले आहेत. कोकणात लेट नाईट पार्ट्या, डान्स, डीजे फायर शोचे आयोजन करण्यात आलं आहे. सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी पर्यटकांचा प्लॅनिंग, डिजे आणि पार्टीमधून थिरकण्याचा मूड आहे. पर्यटकांनी खास करून समुद्र किनाऱ्यांना विशेष पसंती दिली आहे.
त्यामुळे समुद्र किनाऱ्यावर रंगणाऱ्या पार्ट्या आणि पर्यटकांकडे पोलिसांचं अधिक लक्ष असणार आहे. समुद्र किनारी गाडी नेण्यास अटकाव करण्यात आला आहे. गाडी पिऊन गाडी चालवणाऱ्यांवर कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती रत्नागिरीचे जिल्हा पोलीस अधिक्षक धनंजय कुलकर्णी यांनी दिली आहे. समुद्रात उतरताना कोणत्याही प्रकारचा आततायीपणा करू नये, असं आवाहनही त्यांनी केलं आहे.
हिरवागार शालू पांगरलेल्या निसर्गाच्या सानिध्यात असणारे साताऱ्यातील बामनोली जवळच्या मुनावळे परिसरात नववर्षाच्या स्वागतासाठी पर्यटकांची मोठी गर्दी वाढू लागली आहे. या आंतरराष्ट्रीय जलपर्यटन केंद्रावर प्रशासनाच्यावतीने सोयी सुविधा देण्यात आल्या आहेत. या ठिकाणी पर्यटक वॉटर स्पोर्ट, पॅरासेलिंग, बनाना राईड, जेट्स स्कीच्या माध्यमातून बोटिंग चा आनंद लुटत आहेत. हिरव्यागार आणि घनदाट जंगलांनी सजलेल्या डोंगररांगा आणि शिवसागराच्या अथांग जलाशयातील निळ्याशार लाटांवर स्वार होत पर्यटक जलपर्यटनाचा आनंद लुटताना पाहायला मिळत आहेत.
छत्रपती संभाजीनगरमध्ये आता राज्य उत्पादन शुल्क आणि पोलीस विभाग देखील मद्यपींना आवरण्यासाठी कमी पडणार असल्याचे चिन्ह आहेत. कारण जिल्ह्यात दारू पिण्यासाठी एका दिवसाचे 65 हजार लायसन्स देण्यात आले आहेत. विदेशी दारूसाठी 55 हजार लायसन्स तर देशी दारूसाठी 10 हजार लायसन्सचा यात समावेश आहे. तसेच बेकायदेशीरपणे होणारी दारू विक्री आणि दारू विक्रीच्या घटना टाळण्यासाठी सात पथके तयार करण्यात आले आहेत. मद्य निर्मिती कारखान्यांवर पथकाचे सीसीटीव्ही कॅमेरे लक्ष ठेवून आहेत. शहरामध्ये सात ठिकाणी पार्ट्या होणार असून त्यांनी देखील पार्टीसाठी लायसन्स काढले आहे. त्यामुळे मद्यपी जास्त झाल्यामुळे पोलिसांना आवरता येणार नाही.
31 डिसेंबर रोजी नाशिकमध्ये 3 हजार पोलीस अधिकारी-कर्मचारी, विशेष पथक तैनात असणार आहे. शहरात 65 ठिकाणी नाकाबंदी करण्यात आली आहे. ड्रंक अँड ड्राईव्हवर मोठ्या प्रमाणावर लक्ष ठेवलं जाणार आहे. रेस्टॉरंट, पब आणि फार्महाऊसवर पोलिसांचं विशेष लक्ष असणार आहे. त्या ठिकाणी चुकीचं काही आढळल्यास कारवाई केली जाणार आहे. शहरातील पानटपऱ्यांमध्ये अमली पदार्थ ठेवले आहेत का? याचा तपास केला जाणार आहे. गोडाऊन्सही चेक केली जाणार आहेत. नवीन वर्षाचे जल्लोषात स्वागत करा. कुणालाही आपल्यामुळे धोका होणार नाही याची काळजी घ्या, असं आवाहन नाशिक शहराचे पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांनी केलं आहे.