महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत? भाजपकडून व्हिडीओ ट्विट

| Updated on: Oct 27, 2023 | 9:02 PM

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत जाणवताना दिसत आहेत. कारण भाजपकडून एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आलाय. पण या व्हिडीओमुळे राजकीय वर्तुळात एकच खळबळ उडाली आहे. देवेंद्र फडणवीस राज्याचे नवे मुख्यमंत्री होतील का? असा प्रश्न या व्हिडीओमुळे निर्माण झालाय.

महाराष्ट्राच्या राजकारणात नव्या भूकंपाचे संकेत? भाजपकडून व्हिडीओ ट्विट
Follow us on

मुंबई | 27 ऑक्टोबर 2023 : भारतीय जनता पक्षाकडून त्यांच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर एक व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. या व्हिडीओत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मी पुन्हा येईन, असं बोलताना दिसत आहेत. देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री असताना 2019 च्या निवडणुकीआधी त्यांनी विधानसभेत अधिवेशनाच्या शेवटच्या दिवशी ‘मी पुन्हा येईन’, अशी कविता म्हटली होती. त्याच घटनेचा व्हिडीओ भाजपकडून ट्विट करण्यात आला आहे. त्यामुळे महाराष्ट्रात पुन्हा मोठा भूकंप घडणार, अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरु झाली आहे. विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस नुकतेच दिल्ली दौऱ्यावर जावून आले आहेत. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी काल शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर आता भाजपकडून देवेंद्र फडणवीस यांचा मी पुन्हा येईन बोलतानाचा व्हिडीओ ट्विट करण्यात आला आहे.

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस दोन दिवसांपूर्वीच दिल्ली दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यावेळी दिल्लीत गुप्त बैठक झाली होती. या बैठकीचे तपशील समोर येऊ शकले नव्हते. त्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी शिर्डी दौऱ्यावर आले होते. त्यानंतर भाजपकडून हे ट्विट करण्यात आलंय. त्यामुळे भाजपला या ट्विटच्या माध्यमातून नेमकं काय म्हणायचं आहे? असा प्रश्न आता उपस्थित करण्यात येतोय.

‘आम्हाला निश्चितच आवडेल’, प्रसाद लाड यांची प्रतिक्रिया

भाजप नेते प्रसाद लाड यांनी या व्हिडीओवर ‘टीव्ही 9 मराठी’ला प्रतिक्रिया दिली. पक्षाचा एक कार्यकर्ता, पदाधिकारी आणि आमदार म्हणून देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री झाले तर मला निश्चितच आवडेल. आम्ही त्याचं स्वागत करु, अशी प्रतिक्रिया प्रसाद लाड यांनी दिलीय. भाजपच्या अधिकृत ट्विटर अकाउंटवर हा व्हिडीओ ट्विट करण्यात आलाय. त्यामुळे आम्हाला स्वागतच करावं लागेल आणि आनंद सुद्धा होईल, असं प्रसाद लाड म्हणाले.

शिवसेनेकडून पहिली प्रतिक्रिया

शिवसेना नेते उदय सामंत यांनी ‘टीव्ही 9 मराठी’ला या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा आलेले आहेत आणि एकनाथ शिंदे यांना सोबत येऊन आले आहेत. राजकीय भूकंपाची कुठे शक्यता आहे, असं मला वाटत नाही. देवेंद्र फडणवीस यांनी अनेकवेळा आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुका या कशा होतील याचं विश्लेषण केलेलं आहे. देवेंद्र फडणवीस पुन्हा आलेलेच आहेत. सोबत आम्हाला घेऊन आले आहेत”, अशी प्रतिक्रिया उदय सामंत यांनी दिली.

‘चंद्रशेखर बावनकुळे उत्तर देतील’, प्रविण दरेकर यांची प्रतिक्रिया

भाजप नेते प्रवीण दरेकर यांनी देखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “आमच्या तीनही पक्षांमध्ये योग्य समन्वय आहे. सर्वांना विश्वासात घेऊन आमची वाटचाल सुरु आहे. असा कुठलाही विषय ट्विटर हँडलवरुन होत नसतो. याबाबतचे अधिकृत उत्तर आमचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे देतील. तसेच आमच्या राज्याचे नेतृत्व देवेंद्र फडणवीस यावर बोलू शकतात. पण आमच्या तीनही पक्षांत कोणताही बेबनाव नाही. उपमुख्यमंत्री अजित पवार, देवेंद्र फडणवीस आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे एकत्रित काम करत आहेत. हे ट्विट का केलं आणि कुणी केलं? याची वस्तुस्थिती समोर येईल”, असं प्रविण दरेकर म्हणाले.

‘लवकरच निवडणूक होणार आहे’, दीपक केसरकर यांचं सूचक वक्तव्य

मंत्री दीपक केसरकर यांनीदेखील या व्हिडीओवर प्रतिक्रिया दिली. “हे बघा, देवेंद्र फडणवीस सध्या सुद्धा सत्तेत आहेत. तसेच सत्तेत ते समान भागीदार आहेत. आता लवकरच निवडणूक होणार आहे. या निवडणुकीत आपण नव्या ताकदीने येऊन महाराष्ट्राची सेवा करु. हा त्याचा अर्थ आहे”, अशी प्रतिक्रिया मंत्री दीपक केसरकर यांनी दिली. दरम्यान, भाजप कार्यकर्त्यांना प्रेरणा देण्यासाठी असे व्हिडीओ ट्विट केले जातात, अशी प्रतिक्रिया भाजप नेते किशोर उपाध्याय यांनी दिलीय.