मुंबई | 30 ऑक्टोबर 2023 : मराठा आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील घडामोडींना वेग आलाय. राज्यातील मराठे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. मराठा आरक्षणासाठी आमदार-खासदारांनी राजीनामे देण्यास सुरुवात केली आहे. या घडामोडींनंतर आता महाराष्ट्राच्या राजकारणात हालचालींना वेग आलाय. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे महाराष्ट्राचे राज्यपाल रमेश बैस यांच्या भेटीसाठी राजभवनावर दाखल झाले आहेत. तर दुसरीकडे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर निवासस्थानी भाजपच्या कोअर कमिटीची महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यात मराठा आरक्षणाबाबत चर्चा झालीय. त्यानंतर मुख्यमंत्री राज्यपालांच्या भेटीला गेले आहेत. राज्यपाल मराठा आरक्षणासाठी विशेष अधिवेशनाची सूचना करु शकतात. या अधिवेशनात मराठा आरक्षणासाठी ठोस निर्णय किंवा विचार विनिमय करण्याचा निर्णय होऊ शकतो. तर दुसरीकडे देवेंद्र फडणवीसांच्या निवासस्थानी महत्त्वाची बैठक पार पडत आहे.
भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे, मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार आशिष शेलार यांच्या उपस्थितीत देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर भाजपच्या कोअर कमिटीची बैठक पार पडत आहे. मराठा आरक्षणाबाबतच या बैठकीत चर्चा होऊ शकते. मंत्रिमंडळाची उद्या महत्त्वाची बैठक पार पडणार आहे. तर मनोज जरांगे यांचं शिष्टमंडळही उद्या मुंबईत चर्चेसाठी येणार असल्याची माहिती मंत्री दीपक केसरकर यांनी दिली होती. त्यामुळे मराठा आरक्षणासाठी काही मोठ्या घडामोडी घडतात का, ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
राज्य सरकारवर मराठा आरक्षणासाठी दबाव निर्माण झालाय. मराठा आरक्षण उपसमिती मंत्रिमंडळाची आज सकाळी मंत्रालयात बैठक पार पडली. त्यानंतर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पत्रकार परिषद घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी महत्त्वाची माहिती दिली. राज्य सरकारने नेमलेल्या निवृत्त न्यायाधीशांच्या नेतृत्त्वातील समितीने मराठा आरक्षणासाठी संशोधन केलं. या समितीला 11 हजार पेक्षा जास्त कागदपत्रांवर मराठा कुणबी अशी नोंद आढळली. त्यामुळे या कागदपत्रांनुसार संबंधित वंशावळच्या नागरिकांना आरक्षण दिलं जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली. तर सुप्रीम कोर्टातील लढाई लढून मराठ्यांना स्वतंत्र आरक्षण दिलं जाईल, असं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं.