मुंबई : महाराष्ट्राच्या राजकारणात भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याचा प्रयोग चांगलाच चर्चेत आलाय. विशेष म्हणजे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर हे दोन दिवसांपूर्वी पहिल्यांदाच एकाच मंचावर एकत्र आले होते. या कार्यक्रमात भाषण करताना उद्धव ठाकरे यांनी प्रकाश आंबेडकर यांना युतीसाठी पुढे हात केला होता. त्यानंतर प्रकाश आबेडकर यांनीदेखील त्यांना सकारात्मक प्रतिसाद दिला. कार्यक्रम संपल्यानंतर प्रकाश आंबेडकर यांनी आगामी निवडणुकीत वंचित बहुजन आघाडी शिवसेनासोबत निवडणूक लढेल, असं जाहीर केलं होतं. आंबेडकर आणि ठाकरे यांच्या भीमशक्ती आणि शिवशक्ती एकत्र आणण्याच्या प्रयोगावर विविध स्तरातून चांगल्या प्रतिक्रिया येत असल्याचं समोर आल्यानंतर आता शिंदे गटातही भीमशक्ती आणि शिवशक्तीचा प्रयोग वास्तव्यात साकारण्याचे प्रयत्न सुरु आहेत.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, शिंदे गट आणि दलित पँथर एकत्र येण्याची शक्यता आहे. प्रकाश आंबेडकर आणि उद्धव ठाकरे यांच्यातील युतीच्या संकेतानंतर शिवसेनेच्या शिंदे गटातही हालचाली वाढल्या आहेत. दलित पँथरचा 25 नोव्हेंबरला कराडमध्ये भव्य कार्यक्रम होणार आहे. या कार्यक्रमात दलित पँथरचे काही कार्यकर्ते शिंदे गटाला पाठिंबा देणार असल्याची चर्चा आहे.
राष्ट्रवादी काँग्रेसलाही हवी प्रकाश आंबेडकर यांची साथ
विशेष म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवार यांना देखील प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत युती हवीय. अजित पवारांनी आपलं प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत बोलणं सुरु असल्याची प्रतिक्रिया दिलीय. त्यामुळे राज्याच्या राजकारणात सध्या निळं वादळ चांगलंच घोंघावताना दिसतंय.
दरम्यान, भाजपला सत्तेपासून दूर सारण्यासाठी आंबेडर यांनी महाविकास आघाडीला साथ दिली तर आगामी काळात राज्याचं राजकीय गणित नक्कीच वेगळं असण्याची शक्यता आहे. कारण वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारांमुळे मोठमोठ्या नेत्यांचा निवडणुकीत पराभव झाल्याचा इतिहास आहे.
अजित पवार प्रकाश आंबेडकर यांच्याबद्दल नेमकं काय म्हणाले?
“जे समविचारी लोकं एकत्र येऊन समोरच्या सत्ताधार पक्षाचा पराभव करण्यासाठी आणि मतांची विभागणी होऊ न देण्यासाठी एकत्र येत असतील तर आमची तयारी आहे. पण फक्त एकाबाजूची तयारी असून चालणार नाही. दोन्ही बाजूने तयारी असावी लागते”, असं अजित पवार म्हणाले.
“आम्ही अनेकदा अनेकांशी चर्चा केलीय. आरपीआयमध्ये विविध पक्ष आहेत. ते चर्चा करत असतात. त्यापैकी अनेकांसोबत आम्ही आघाडी करुन निवडणुका लढवल्या. आम्ही प्रकाश आंबेडकर यांच्यासोबतही चर्चा करायला केव्हाही तयार आहोत”, अशी प्रतिक्रिया अजित पवार यांनी दिली.