मुंबई : मुंबई शहर आणि उपनगरात मुसळधार पावसाने (Heavy rain) हजेरी लावली. मुंबईत अनेक ठिकाणी सखल भागात पाणी सांचलं. तसंच जोरदार पाऊस आणि रस्त्यांवर पाणी साचल्यानं वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला. इतकंच नाही तर पुढचे चार ते पाच दिवस राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता आहे. कोकण (Kokan), मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आलाय. या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी आज मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिली. यावेळी गेल्या 24 तासांत सुरु असलेल्या पावसामुळे झालेल्या नुकसानीचा आढावा त्यांनी घेतला. कोकणात काही भागात पूरस्थिती निर्माण झालीय. त्यामुळे SDRF च्या तुकड्या तैनात करण्यात आल्या आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार NDRF आणि SDRF च्या मिळून 11 टीम राज्यातील पुराची शक्यता असलेल्या जिल्ह्यात तैनात करण्यात आल्या आहेत. तर बेस स्टेशनवर NDRF च्या 9 आणि SDRF च्या 4 अशा मिळून 13 टीम सज्ज ठेवण्यात आल्या आहेत. राज्यात कोकण, मुंबई, ठाणे परिसरात मुसळधार पाऊस कोसळतोय. त्याचबरोबर कोकण, मध्य महाराष्ट्र आणि इतर काही भागात अती मुसळधार पावसाचा इशारा हवामान खात्याकडून देण्यात आला आहे. अशावेळी नदीच्या पाणी पातळीत होणाऱ्या वाढीकडे सातत्याने लक्ष ठेवण्यात येत आहे. आवश्यकता भासल्यास तातडीने संबंधित यंत्रणांना आपत्तीच्या ठिकाणी सज्ज ठेवण्यात येणार आहे.
मुंबई महापालिकेच्या आपत्ती नियंत्रण कक्षाला भेट दिल्यानंतर मुख्यमंत्री शिंदे म्हणाले की, रेल्वेचे 25 स्पॉट आहेत जिथे पावसामुळे रेल्वे बंद झाल्यानंतर नागरिकांची अडचण होवू नये यासाठी उपनगरी रेल्वे विभाग, बेस्ट, मुंबई महापालिका यांनी समन्वय साधून लोकांना पर्यायी वाहतूक व्यवस्था करावी. तसेच त्यांना नाश्ता पाणी याची देखील सोय करावी जेणेकरून नागरिकांना त्रास होणार नाही.पावसामुळे मोठ्या प्रमाणात रस्ते दुरुस्त करण्यासाठी महापालिकेने तत्काळ कार्यवाही करावी.
याप्रसंगी आमदार @misadasarvankar, आमदार @mlamangesh, मुंबई महापालिका आयुक्त इकबालसिंह चहल तसेच मुंबई महानगरपालिकेचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. pic.twitter.com/O5IrVDcnPb
— Eknath Shinde – एकनाथ शिंदे (@mieknathshinde) July 5, 2022
मुंबई शहर आणि उपनगरामध्ये असलेल्या सीसीटीव्ही द्वारे संपूर्ण पावसाच्या सद्यस्थिती वरती पूर्णपणे नियंत्रण कक्षातून लक्ष ठेवा. सर्वसामान्य नागरिकांना पावसामुळे कुठे अडचणीत सापडल्यास तत्काळ मदत करा, अशा सूचनाही शिंदे यांनी संबंधित यंत्रणांना केलीय.