मुंबई: राज्यसभा निवडणुकीसाठी (Rajya Sabha election) उमेदवारी अर्ज मागे घेण्याची वेळ संपली असून राज्यसभेची निवडणूक होणार असल्याचं स्पष्ट झालं आहे. महाविकास आघाडी (mahavikas agahdi) आणि भाजपच्या (bjp) उमेदवारांनी अर्ज मागे न घेतल्याने राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्यामुळे आता राज्यसभेच्या 6 जागांसाठी 7 उमेदवार मैदानात असणार आहेत. पहिले पाच उमेदवार पहिल्या पसंतीच्या मतांनी विजय होणार आहेत. मात्र, सहाव्या जागेसाठी होणारी लढत चुरशीची होणार आहे. या जागेसाठीची दोन्ही पक्षांची मदार ही अपक्ष उमेदवारांवर असल्याने अपक्ष कुणाच्या पारड्यात मते टाकतात याकडे सर्वाचं लक्ष लागलं आहे. सहाव्या जागेसाठी शिवसेनेकडून संजय पवार उभे आहेत. तर भाजपकडून धनंजय महाडिक उभे आहेत. दोन्ही नेते कोल्हापूरचे आहेत. त्यामुळे कोल्हापूरचा कोणता गडी दिल्लीत जातो याकडेही सर्वांच लक्ष लागलं असून येत्या 10 जून रोजी याबाबतचं चित्रं स्पष्ट होणार आहे.
दोन्ही पक्षाकडून सहाव्या जागेसाठी उमेदवार दिल्यानंतर दोन्ही पक्षांकडून आपलाच उमेदवार निवडून येणार असल्याचे दावे करण्यात आले होते. मात्र, उमेदवारी मागे घेण्याबाबत आणि बिनविरोध निवडणूक करण्याबाबत दोन्हीकडूनही प्रयत्न झाले नाहीत. मात्र, आज अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी हे प्रयत्न करण्यात आले. महाविकास आघाडीचे नेते छगन भुजबळ, अनिल देसाई आणि सुनील केदार यांनी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची भेट घेऊन चर्चा केली. यावेळी आघाडीकडून तुम्ही राज्यसभेचा उमेदवार मागे घ्या आम्ही विधानपरिषदेची एक जागा सोडतो, असा प्रस्ताव भाजपला दिला. भाजपनेही हाच प्रस्ताव आघाडीच्या नेत्यांना देऊन त्यांची कोंडी झाली. त्यामुळे चर्चेतून काहीच निष्पन्न झालं नाही. एका टप्प्यावर तर भाजप नेत्यांनी आमचा उमेदवार निवडणूक लढेल आणि जिंकेल असं सांगून आघाडीच्या नेत्यांची बोळवण केली.
आघाडीच्या नेत्यांसोबत बैठक झाल्यानंतर लगेच भाजपच्या नेत्यांनी त्यांच्या पक्षश्रेष्ठींना फोन करून बैठकीची माहिती दिली. आघाडीचा प्रस्ताव आणि आघाडीला दिलेल्या प्रस्तवाची माहिती दिली. त्यावर भाजपच्या पक्षश्रेष्ठींनी तुमची भूमिका योग्यच आहे. तुम्ही तुमच्या भूमिकेवर ठाम राहा, असं सांगितलं. त्यानंतर चंद्रकांत पाटील यांनी मीडियाशी संवाद साधला. यावेळी आम्ही उमेदवार मागे घेणार नाही. आम्ही निवडणूक लढणार आहोत आणि जिंकणार आहोत, असं सांगून निवडणुका होणार असल्याचं स्पष्ट केलं.
शिवसेना
संजय राऊत
संजय पवार
भाजप
पीयूष गोयल
डॉ. अनिल बोंडे
धनंजय महाडिक
काँग्रेस
इमरान प्रतापगढी
राष्ट्रवादी
प्रफुल्ल पटेल
राज्यसभेच्या निवडणुकीत पहिल्या पसंतीचे मते मिळवून पहिले पाच उमेदवार निवडून येतील. मात्र, सहाव्या जागेची निवडणूक रंगतदार ठरणार आहे. या सहाव्या जागेवर शिवसेनेकडून संजय पवार यांना उमेदवारी देण्यात आली आहे. तर भाजपकडून धनंजय महाडिक यांना उमेदवारी देण्यात आली आहे. दोन्ही पक्षाचे उमेदवार कोल्हापुरातील आहेत. त्यामुळे कोल्हापुरातील या दोन उमेदवारांपैकी कोणता उमेदवार राज्यसभेवर जाणार याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
भाजपकडे स्वत:ची 24 मते आहेत. सहयोगी आमदारांची सहा मते आहेत. त्यामुळे त्यांची 30 मते होतात. निवडून येण्यासाठी 41 मतांची गरज आहे. दुसरीकडे आपल्याकडे 41 मते असल्याचा दावा आघाडीने केला आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे.
येत्या 10 जून रोजी राज्यसभेची निवडणूक होणार आहे. त्याच दिवशी संध्याकाळी निकाल लागणार आहे.