मुंबई म्हणजे मधुबाला, ऐश्वर्या राय असं म्हटल्यास चुकीच ठरणार नाही. बॉलिवूडच्या या दोन अशा नट्या आहेत, ज्यांच्या सौंदर्याची आजही तितकीच चर्चा होते. लाखो लोकांना या अभिनेत्रींच आकर्षण होतं. मुंबईच सुद्धा तसंच आहे. मुंबई हे घड्याळाच्या काट्यावर धावणारं शहर. पहाटे चारपासून ते रात्री 12-1 वाजेपर्यंत तुम्हाला मुंबईत लगबग दिसेल. मुंबई कधी थांबत नाही. मुंबईत सध्या धावपळ, दगदग प्रचंड वाढली आहे. पण, तरीही मुंबईच आकर्षण अजिबात कमी झालेलं नाही. मुंबईची लोकसंख्या कोट्यवधीच्या घरात आहे. येणारा प्रत्येकजण या शहराच्या प्रेमात पडतो, ही या शहराची खासियत आहे. म्हणूनच प्रेमाने आपली मुंबईच म्हणतात. मुंबई हे सात बेटांवर वसलेलं शहर होतं. याला मूळ मुंबई म्हणतात. बॉम्बे बेट (डोंगरी ते मलबार हिलचा भाग), ओल्ड वुमन्स बेट (लिटिल कुलाबा), कुलाबा म्हणजे कँडील बेट, परळ, माझगाव, वरळी आणि माहीम अशी मिळून सात बेटांपासून मुंबई तयार झाली. आता याच मुंबईचा विस्तार दहीसर, बोरीवलीपर्यंत झाला आहे. तुम्हाला विश्वास बसणार नाही, पण 1881 साली ब्रिटिशांनी भारतात जनगणना केली, त्यावेळी मुंबईत लोकसंख्या फक्त 7 लाख 73 हजार होती. आज याच मुंबईची लोकसंख्या दीड कोटीच्या घरात आहे. या वाढत्या लोकसंख्येमुळे 1990 साली मुंबईचे दोन जिल्हे झाले. मुंबई शहर आणि उपनगर.
मुंबई शहराचं नियोजन आणि विकासामध्ये प्रामुख्याने दोन यंत्रणा आहेत. बृहन्मुंबई महानगरपालिका आणि MMRDA. यात नागरी सुविधांची जबाबदारी मुंबई महापालिकेकडे आहे. मुंबईला सोन्याची अंड देणारी कोंबडी म्हणतात. मुंबई महापालिकेच बजेट हे काही राज्यांच्या बजेटपेक्षा पण जास्त आहे. त्यामुळे मुंबई महापालिकेवर सत्ता आणण्याचा प्रत्येक पक्षाचा प्रयत्न असतो. महापालिकेवर ज्यांची सत्ता, त्यांचं मुंबईवर राज्य हे साधं, सोप समीकरण आहे. आतापर्यंत गेली अनेक वर्ष मुंबई महापालिकेवर शिवसेनेची एकहाती सत्ता होती. पण आता शिवसेनेत फूट पडून दोन गट तयार झालेत. शिवसेनेच नाव, चिन्ह एकनाथ शिंदेंकडे गेलय, तर दिवगंत शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंचे सुपूत्र उद्धव ठाकरेंकडे मशाल चिन्ह आहे. शिवसेनेची ताकद कमी झालीय हे सुद्धा वास्तव आहे. पण मुंबईकर आज कोणाच्या बाजूने आहे? या प्रश्नाच उत्तर अजूनही मिळू शकलेलं नाही. कारण मागच्या तीन वर्षांपासून मुंबई महापालिकेच्या निवडणुका झालेल्या नाहीत. लोकसभेला या प्रश्नाच उत्तर ठामपणे मिळू शकलं नाही. उद्धव ठाकरे गटाने लोकसभेच्या तीन जागा जिंकल्या पण त्यात काँग्रेस-राष्ट्रवादीमुळे मिळालेल्या अल्पसंख्यांक मतांचा वाटा होता. शिवसेनेचा कोअर मराठी वोटर कोणाकडे आहे? या प्रश्नाच उत्तर अजूनही मिळालेलं नाही.
मुंबईचे दोन जिल्हे, विधानसभा मतदारसंघाची विभागणी कशी?
महाराष्ट्र विधानसभा निवडणूक 2024 च्या निमित्ताने या प्रश्नाच उत्तर मिळेल अशी अपेक्षा आहे. मुंबईत 2009 पूर्वी एकूण 34 विधानसभा मतदारसंघ होते. पण मतदारसंघ पुनर्रचनेनंतर दोन मतदारसंघ वाढून 36 झाले. यात मुंबई उपनगरात 26 आणि मुंबई शहरात 10 विधानसभा मतदारसंघ आहेत. लोकसभेचे चार मतदारसंघ उपनगरात आणि दोन शहरात येतात. 2019 साली एकसंध शिवसेना आणि भाजपाने एकत्र निवडणूक लढवली. त्यावेळी युतीने एकूण 29 जागा जिंकल्या होत्या. काँग्रेस, राष्ट्रवादी आणि सपा यांच्या वाट्याला फक्त सात जागा आल्या होत्या. यावेळी शिवसेनेचे 14 आणि भाजपाचे 16 आमदार निवडून आले होते.
मुंबईत ताकद कोणाची?
आता शिवसेनेत फूट पडलीय. मुंबईतील शिवसेनेचे चौदापैकी सहा आमदार सध्या एकनाथ शिंदे गटाकडे आहेत, उर्वरित आठ आमदार उद्धव ठाकरे यांच्यासोबत आहेत. मुंबईतील शिवसेनेचे अनेक पदाधिकारी फुटून एकनाथ शिंदे यांच्यासोबत गेले आहेत. मात्र, तरीही अजून मुंबईवर उद्धव ठाकरे गटाचच वर्चस्व आहे. कारण शिवसेनेची ताकद असलेला शिवसैनिक अजूनही उद्धव ठाकरेंसोबत आहे. लोकसभा निवडणुकीत ते दिसून आलं. रवींद्र वायकर यांच्या रुपाने शिंदेंच्या शिवसेनेचा फक्त एकच खासदार निवडून आला, ते ही फक्त 48 मतांनी.
त्या सात मतदारसंघात पारड कधीही फिरणार?
लोकसभा निवडणूक 2024 चे मुंबईनिहाय विधानसभा निवडणूक निकाल बघितले, तर 36 पैकी 20 विधानसभा मतदारसंघात महाविकास आघाडीला लीड आहे, तर 16 विधानसभा क्षेत्रात महायुतीला लीड आहे. काँग्रेस, शरद पवार गट आणि उद्धव ठाकरे गट यांच्या महाविकास आघाडीकडे मुंबईत लीड आहे. पण त्यांना 2019 मधली शिवसेना-भाजपा महायुतीसारखी कामगिरी करुन दाखवणं जमणं कठीण आहे. सात विधानसभा मतदारसंघात मविआ आणि महायुतीमध्ये अटी-तटीचा सामना आहे. विजयामधलं अंतर 3 टक्क्यांपेक्षा कमी आहे. या मतदारसंघांमध्ये पारड कधीही बदलू शकतं. 2024 लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीने 4 तर महायुतीने दोन जागा जिंकल्या. यात शिवसेना ठाकरे गटाचे तीन आणि काँग्रेसचा एक खासदार निवडून आला. महायुतीमध्ये भाजपाने एक आणि शिंदे गटाने एक जागा जिंकली.
लोकसभानिहाय विधानसभांचा आढावा घेऊया
दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघ
उद्धव ठाकरे गटाच्या अरविंद सावंत यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या यामिनी जाधव यांचा पराभव केला.
गरीब, श्रीमंत, मध्यमवर्गीय असे तिन्ही वर्गाचे लोक दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघात येतात. वरळी, शिवडी, भायखळा, मलबार हिल, मुंबादेवी आणि कुलाबा हे सहा विधानसभा मतदारसंघ दक्षिण मुंबईत येतात.
वरळी, शिवडीमध्य ठाकरे गटाचे आदित्य ठाकरे, अजय चौधरी आमदार आहेत. भायखळ्यात स्वत: यामिनी जाधव आमदार आहेत. मलबार हिलमध्ये भाजपाचे मंगलप्रभात लोढा, कुलाब्यात भाजपाचे राहुल नार्वेकर आमदार आहेत. मुंबादेवीमध्ये काँग्रेसचे अमीन पटेल आमदार आहेत.
अरविंद सावंत ही निवडणूक जिंकले असले, तरी काही चिंता वाढवणाऱ्या बाबी सुद्धा आहेत.
आदित्य ठाकरेंच्या वरळी विधानसभा मतदारसंघातून त्यांना फक्त 6,715 मतांची आघाडी मिळाली.
अजय चौधरी यांच्या शिवडी विधानसभा मतदारसंघातून 16,903 मतांचा लीड मिळाला.
भायखळ्यातून 46 हजारपेक्षा जास्त आणि मुंबादेवी विधानसभा मतदारसंघातून 40 हजारपेक्षा जास्त मतांची आघाडी अरविंद सावंत यांना मिळाली. या दोन्ही विधानसभा क्षेत्रात अल्पसंख्यांक मतदार मोठ्या प्रमाणात आहेत.
यामिनी जाधव भायखळ्याच्या आमदार असून त्यांना स्वत:च्या मतदारसंघात मोठी आघाडी घेता आली नाही.
राहुल नार्वेकर यांच्या कुलाबा विधानसभा मतदारसंघात यामिनी जाधव यांना 9 हजारपेक्षा जास्त मत मिळाली.
मंगल प्रभात लोढा यांच्या मलबार हिल विधानसभा मतदारसंघातून त्यांना 48,287 मताधिक्क्य मिळालं. त्यामुळे सावंत आणि त्यांच्या मतांमधलं अंतर कमी झालं. पण वरळी, शिवडीची स्थिती बघता सगळी एकगठ्ठा मराठी मत अरविंद सावंत यांच्या पारड्यात पडली असं छातीठोकपणे म्हणता येणार नाही.
अरविंद सावंत यांची खासदारकीची तिसरी टर्म आहे. 2014 पासून ते या मतदारसंघातून सातत्याने निवडून लोकसभेवर जात आहेत.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
अरविंद सावंत | उद्धव ठाकरे गट (मविआ) | 395655 |
यामिन जाधव | शिवसेना (महायुती) | 342982 |
दक्षिण मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
उद्धव ठाकरे गटाच्या अनिल देसाई यांनी दक्षिण मुंबई लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली. त्यांनी शिवसेना शिंदे गटाच्या राहुल शेवाळे यांचा पराभव केला.
या लोकसभा मतदार संघात 15 लाखांहून अधिक मतदार आहेत.
दक्षिण मध्य मुंबईत अणुशक्तीनगर, चेंबूर, धारावी, सायन कोळीवाडा, वडाळा, माहीम हे सहा विधानसभा मतदारसंघ येतात.
अणुशक्ती नगरमधून राष्ट्रवादी काँग्रेसचे नवाब मलिक आमदार आहेत.
चेंबूरमध्ये ठाकरे गटाचे प्रकाश फातर्पेकर आमदार आहेत.
धारावीमधून काँग्रेसच्या वर्षा गायकवाड आमदार आहेत.
सायन कोळीवाड्यातून भाजपाचे कॅप्टन तामिळ सेल्वन आमदार आहेत.
वडाळ्यामधून भाजपाचे कालिदास कोळंबकर
माहिममधून शिवसेना शिंदे गटाचे सदा सरवणकर आमदार आहेत.
या लोकसभा क्षेत्रात महायुतीचे चार आणि मविआचे दोन आमदार होते. पक्षीय बलाबलमध्ये राहुल शेवाळे यांची बाजू वरचढ होती. पण तरीही ते हरले.
अणुशक्ती नगर, चेंबूर आणि धारावी या तीन भागातून अनिल देसाई यांना सर्वाधिक मतदान झालं. या तिन्ही मतदारसंघात मुस्लिम आणि दलित मतदारांची संख्या मोठी आहे.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
अनिल देसाई | उद्धव ठाकरे गट (मविआ) | 395138 |
राहुल शेवाळे | शिवसेना (महायुती) | 341754 |
उत्तर पश्चिम मुंबई
शिवसेना एकनाथ शिंदे गटाच्या रवींद्र वायकर यांनी उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघातून बाजी मारली. त्यांनी उद्धव ठाकरे गटाच्या अमोल किर्तीकर यांचा अवघ्या 48 मतांनी पराभव केला.
उत्तर पश्चिम लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्व, दिंडोशी, गोरेगाव, वर्सोवा, अंधेरी पश्चिम आणि अंधेरी पूर्व असे एकूण 6 विधानसभा मतदारसंघ आहेत. या भागात गोरेगावमध्ये 520 एकरमध्ये पसरलेली फिल्म सिटी येते.
उत्तर पश्चिम मुंबई लोकसभा मतदारसंघात जोगेश्वरी पूर्वमधून रविंद्र वायकर शिवसेना (शिंदे गट), दिंडोशी सुनील प्रभू (ठाकरे गट), गोरेगाव विद्या ठाकूर (भाजप), वर्सोवा भारती लव्हेकर (भाजप), अंधेरी पश्चिम अमित साटम (भाजप), अंधेरी पूर्व ऋतुजा लटके (ठाकरे गट) आमदार आहेत. या लोकसभा मतदारसंघात तीन भाजपाचे आमदार आहेत.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
रविंद्र वायकर | शिवसेना (महायुती | 452644 |
अमोल किर्तीकर | उद्धव ठाकरेे गट (मविआ) | 452596 |
ईशान्य मुंबई
ईशान्य मुंबई लोकसभा मतदारसंघातून ठाकरे गटाच्या संजय दीना पाटील यांनी बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या मिहीर कोटेचा यांचा पराभव केला.
मुंबई ईशान्य लोकसभा मतदारसंघात सुमारे 16 लाख मतदार आहेत. मुंबई उपनगर जिल्ह्यातील या लोकसभा मतदार संघात सहा विधानसभा मोडतात.
ईशान्य मुंबई हा संमिश्र लोकवस्तीचा मतदारसंघ आहे. मराठी मतदारांप्रमाणे उत्तर भारतीय, गुजराती, मारवाडी भाषिकांची संख्या मोठ्या प्रमाणावर आहे. घाटकोपर, मुलुंडमध्ये गुजराती भाषिक मतदार जास्त आहेत.
विक्रोळी, भांडूप पश्चिम हे शिवसेना ठाकरे गटाचे आमदार असलेल्या मतदारसंघात मराठी मतदारांची संख्या लक्षणीय आहे. मानखुर्द-शिवाजी नगर झोपडपट्टीचा भाग असून इथे मराठी, उत्तर भारतीय आणि अल्पसंख्याक मतदारांची संख्या जास्त आहे.
मुलुंड विधानसभा मतदारसंघातून मिहीर कोटेचा आमदार आहेत.
विक्रोळी विधानसभा मतदारसंघातून ठाकरे गटाचे सुनील राऊत आमदार आहेत.
भांडूप पश्चिम विधानसभा मतदारसंघातून शिंदे गटाचे रमेश कोरगावकर आमदार आहेत.
घाटकोपर पश्चिम विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे राम कदम आमदार आहेत.
घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघातून भाजपाचे पराग शाह आमदार आहेत.
मानखुर्द शिवाजीनगर विधानसभा मतदारसंघातून समाजवादी पक्षाचे अबू आझमी आमदार आहेत.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
संजय दीना पाटील | उद्धव ठाकरे गट (मविआ) | 450937 |
मिहीर कोटेचा | भाजपा (महायुती) | 421076 |
उत्तर मध्य मुंबई लोकसभा मतदारसंघ
काँग्रेसच्या वर्षा गायकवाड यांनी उत्तर मध्य मुंबईतून बाजी मारली. त्यांनी भाजपाच्या उज्वल निकम यांचा पराभव केला.
उत्तर मध्य मुंबईत वांद्रे पूर्वेचा मध्यमवर्गीय झोपडपट्टीधारक मतदार आहे. त्याचवेळी वांद्रे पश्चिमेचा हाय प्रोफाइल मतदार सुद्धा आहे. अनेक बॉलिवूड सेलिब्रिटी या भागात राहतात. 17 लाखापेक्षा जास्त मतदार या मतदारसंघात आहेत. उत्तर मध्य मुंबई मतदारसंघात मराठी मतदारांबरोबरच दलित आणि उत्तर भारतीय मतदार मोठ्या संख्येने आहेत. मुस्लिम मतदारांचही प्राबल्य आहे.
विलेपार्ले, चांदीवली, कुर्ला, कलिना, वांद्रे पूर्व आणि वांद्रे पश्चिम हे सहा विधानसभा मतदारसंघ उत्तर मध्य मुंबईत येतात.
त्यात विलेपार्ल्यातून भाजपाचे पराग अळवणी आमदार आहेत.
चांदीवलीतून शिवसेना शिंदे गटाचे दिलीप लांडे आमदार आहेत.
कुर्ल्यातून शिवसेना शिंदे गटाचे मंगेश कुडाळकर आमदार आहेत.
कलिन्यामधून ठाकरे गटाचे संजय पोतनीस आमदार आहेत.
वांद्रे पूर्वमधून झिशान सिद्दीकी आणि वांद्रे पश्चिममधून भाजपाचे आशिष शेलार आमदार आहेत.
म्हणजे भाजपा-शिवसेनेचे प्रत्येकी दोन तर ठाकरे गट आणि काँग्रेसचा एक आमदार आहे.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
वर्षा गायकवाड | काँग्रेस (मविआ) | 445545 |
उज्वल निकम | भाजपा (महायुती) | 429031 |
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघ
उत्तर मुंबई लोकसभा मतदारसंघातून भाजपाच्या पियुष गोयल यांनी दणदणीत विजय मिळवला. त्यांनी काँग्रेसच्या भूषण पाटील यांचा पराभव केला.
महाराष्ट्रातील मुंबई उपनगर जिल्ह्यातील बोरिवली, दहिसर, मागाठाणे, कांदिवली पूर्व, चारकोप आणि मालाड पश्चिम
असे सहा विधानसभा मतदारसंघ मुंबई उत्तर लोकसभा मतदारसंघात येतात.
मराठी भाषिक मतदारांपेक्षा या मतदारसंघात अन्य भाषिक मतदारांची संख्या जास्त आहे.
बोरिवली, दहिसर, कांदिवली पूर्व आणि चारकोप या चार विधानसभा मतदारसंघात भाजपाचे आमदार आहेत.
मागाठणेमधून शिवसेना शिंदे गटाचे प्रकाश सुर्वे आमदार आहेत.
मालाड पश्चिमेला काँग्रेसचे अस्लम शेख आमदार आहेत.
म्हणजे पाच विधानसभा क्षेत्रात भाजपा-शिवसेनेच वर्चस्व आहे.
उमेदवाराचे नाव | पक्ष | एकूण मत |
---|---|---|
पियुष गोयल | भाजपा | 680146 |
भूषण पाटील | काँग्रेस | 322538 |