राज्यातील लोकशाहीच्या उत्सवात लाडक्या बहिणींनी कोणत्या भावाच्या पदरात मतदानाचा कौल टाकला हे आता समोर आलं आहे. मतदार राजाने आज त्यांच्या मतदानाचा हक्क बजावला. आता सत्तेचा कौल कुणाच्या पदरात पडला याचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. उभ्या फुटीनंतर राष्ट्रवादीतील दोन्ही गट विधानसभा निवडणुकीला सामोरं जात आहेत. शरद पवार आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादीत यंदा राज्यात चांगलीच टफ फाईट दिसली. बारामतीसह इतर अनेक मतदार संघात दोन्ही गटात मोठी चुरस दिसली. आज बारामती मतदारसंघात सुद्धा पवार विरुद्ध पवार असा सामना दिसला. पोल डायरीच्या अंदाजानुसार, मग एक्झिट पोलमध्ये कुणी मारली बाजी?
दोन पवारांत कुणाची बाजी?
राष्ट्रवादीची दोन शकलं झाल्यानंतर अजित पवार गट महायुतीसोबत तर शरद पवार गट महाविकास आघाडीच्या खेम्यात दाखल झाला होता. यामध्ये महायुतीला राज्यात मोठी आघाडी मिळाल्याचे तर महाविकास आघाडीला त्यापेक्षा कमी जागा मिळत असल्याचा अंदाज वर्तवण्यात येत आहे. पोल डायरीच्या एक्झिट पोलनुसार राज्यात अजित पवार गटाला राज्यात 18-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. तर महाविकास आघाडीतील शरद पवार गटाला या एक्झिट पोलनुसार 25-39 जागा मिळण्याची दाट शक्यता आहे. दोन पवारांत कोणता पवार पॉवर बाज आहे याचा अंदाज समोर आला आहे.
थोरल्या पवारांची पॉवर
या Exit Poll नुसार, राज्यात राष्ट्रवादी काँग्रेसमधील शरद पवार गटाला अधिक जागा मिळताना दिसत आहे. या अंदाजानुसार, शरद पवार गटाला 25-39 इतक्या जागा खिशात घालण्याची शक्यता वर्तवली आहे. तर अजित पवार गटाला त्यापेक्षा कमी 18-28 जागा मिळण्याची शक्यता आहे. अजित दादांना जवळपास 10 ते 12 जागांचा फटका बसण्याची शक्यता आहे. थोरल्या पवारांचा करिष्मा पुन्हा दिसून येत आहे.
महायुतीला किती जागा?
या एक्झिट पोलनुसार, महाविकास आघाडी आणि महायुतीच्या झोळीत किती जागा येतील याचा अंदाज समोर आला आहे. मविआला 69-121 तर महायुतीला 122-186 जागा आणि इतर 12-29 जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. राज्यात पुन्हा डबल इंजिन सरकार येण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.