विधानसभा निवडणुकीचा बिगुल वाजल्यानंतर राज्यात राजकीय वातावरण तापलं आहे. महायुती आणि महाविकास आघाडीने अनेक जागांवर तोडगा शोधला आहे. आता अवघ्या काही जागांवर काथ्याकूट सुरू आहे. महायुतीने जागा वाटपात आघाडी घेतली आहे. तर काही जागांवर दिल्लीत चर्चा सुरू आहे. लवकरच सर्व काही आलबेल होण्याचा दावा करण्यात येत आहे. दरम्यान उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेने 65 उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. त्यात त्यांनी ठाकरे कुटुंबातील एक परंपरा खंडीत केल्याचा आरोप करण्यात येत आहे. यापूर्वी राज ठाकरे यांनी विधानसभेच्या रणांगणात ही परंपरा जपली होती. आता विधानसभेच्या रणसंग्रामात ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना पाहायला मिळणार आहे.
जागा वाटपात महायुतीची आघाडी
जागा वाटपात सत्ताधारी महायुतीने आघाडी घेतली. भारतीय जनता पक्षाने 99, एकनाथ शिंदे शिवसेना 45 तर राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष अजित पवार गटाने 38 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. उर्वरीत जागांवर दिल्ली दरबारी खल सुरू आहे. तर महाविकास आघाडीत काँग्रेस आणि उद्धव ठाकरे गटात घमासान झाल्यानंतर यशस्वी तोडगा काढण्यात आला. उद्धव ठाकरे गटाने 65 जागांवर उमेदवारांची घोषणा केली. या यादीत माहिम मतदारसंघावरून आता राजकारण वातावरण तापण्याची शक्यता आहे.
अमित ठाकरेंविरोधात उद्धव सेनेचा उमेदवार
पहिल्यांदा आदित्य ठाकरे हे वरळी मतदारसंघात उभे राहिले, तेव्हा राज ठाकरे यांनी वरळी विधानसभा निवडणुकीत उमेदवार न देण्याची भूमिका घेतली होती. त्यांनी आदित्य ठाकरेंविरोधात उमेदवार दिला नव्हता. त्यांनी विना शर्त पाठिंबा दिला होता. ठाकरे विरुद्ध ठाकरे असा सामना निवडणुकीच्या रिंगणात नको, ही परंपरा राज ठाकरे यांनी सुरू केली होती. त्यावेळी त्यांच्या भूमिकेचे कौतुक झाले होते. पण यावेळी उद्धव ठाकरे यांनी ही परंपरा खंडीत केल्याचा आरोप होत आहे.
अमित ठाकरे हे महाराष्ट्र नवनिर्माण पक्षाकडून माहिम विधानसभा मतदारसंघात निवडणूक लढवत आहे. या ठिकाणी शिवसेना शिंदे गटाने सदा सरवणकर यांना तिकीट दिले आहे. तर उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघात महेश सावंत यांना उतरवले आहे. उद्धव ठाकरे यांनी या मतदारसंघातून उमेदवार जाहीर केल्याने अनेकांच्या भुवया उंचावल्या. राज ठाकरे यांनी यापूर्वी मन मोठं केल्याचे अनेकांनी सांगितले. अर्थात निवडणुकीत काही होऊ शकते. माहिममधील समीकरणं उद्धव सेनेच्या दृष्टीने वेगळेही असू शकतात. आता आदित्य ठाकरे यांच्यानंतर ठाकरे कुटुंबातील दुसरा सदस्य पण थेट निवडणुकीच्या रिंगणात उतरला आहे. ठाकरे कुटुंबातून कोणीही निवडणुकीच्या मैदानात उतरले नव्हते. पहिल्यांदा आदित्य ठाकरे यांनी वरळी मतदारसंघातून उडी घेतली. आता अमित ठाकरे माहिममधून नशीब आजमावत आहेत.