मुंबई | 15 डिसेंबर 2023 : भाजपच्या पालघर युवा मोर्चाच्या अध्यक्षाने त्याच्या मित्रांच्या मदतीने प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी स्वत: ट्विट करुन याबाबतची माहिती दिली आहे. संबंधित प्रकरण अतिशय संवेदनशील आहे. या प्रकरणातील पीडिता ही जखमी आहे. तसेच ती अत्यंत मानसिक तणावाखाली असल्याची माहिती स्वत: रुपाली चाकरणकर यांनी दिली आहे. रुपाची चाकणकर यांनी या घटनेची गांभीर्याने दखल घेतली आहे. त्यांनी पालघरचे पोलीस अधिक्षक आणि जिल्हा दंडाधिकारी यांना पत्र पाठवून या प्रकरणाचा अहवाल राज्य महिला आयोगाकडे सादर करण्याची सूचना केली आहे. त्यामुळे या प्रकरणी आता काय-काय माहिती येते ते पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.
“महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या व्यवस्थापकीय संचालकांचा मुलगा आणि पालघर भाजप युवा मोर्चा अध्यक्ष अश्वजीत गायकवाड याने मित्रांच्या मदतीने त्याच्या प्रेयसीला जीवे मारण्याचा प्रयत्न केल्याची घटना माध्यमातून समोर आली आहे. पीडित तरुणी जखमी असून मानसिक तणावाखाली आहे. याबाबत राज्य महिला आयोगाने दखल घेतली असून पालघरचे जिल्हा दंडाधिकारी आणि पोलीस आयुक्त यांच्याकडून तातडीने अहवाल मागविला आहे”, असं रुपाली चाकणकर यांनी ट्विटरवर म्हटलं आहे.
रुपाली चाकरणकर यांनी आणखी एका प्रकरणाची दखल घेतली आहे. त्यांनी नवी मुंबईच्या पोलीस आयुक्तांना याबाबत पत्र लिहिलं आहे. नवी मुंबईतील नेरुळ बस थांब्यावर बसची वाट पाहणाऱ्या तरुणीवर अनोळखी व्यक्तीने जीवघेणा हल्ला केल्याची बातमी समोर आली होती. या प्रकरणाचाही अहवाल रुपाली चाकणकर यांनी मागवला आहे.