मुंबई : अभिनेत्री उर्फी जावेद आणि भाजपच्या नेत्या चित्रा वाघ यांच्यातील संघर्ष वाढत असताना राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी महत्त्वाची माहिती दिलीय. चित्रा वाघ यांनी उर्फी जावेद हिचं थोबाड रंगवण्याची भाषा केलीय. तर उर्फीने देखील चित्रा वाघ यांना ट्विटवर प्रत्युत्तर दिलंय. असं असताना चित्रा वाघ यांनी उर्फीला दिलेल्या इशाऱ्यावरुन उर्फीच्या जीवितास धोका उद्भवू शकतो. त्यामुळे तिला तिच्या सुरक्षेबाबत तक्रारी आल्यास त्या तक्रारीची राज्य महिला आयोग दखल घेईल, असं विधान रुपाली चाकणकर यांनी केलंय.
“काही सामाजिक संघटनांनी राज्य महिला आयोगाकडे तक्रार दाखल केलीय. त्यांनी संबंधित प्राधिकरणाकडे त्यांची तक्रार द्यावी. आजदेखील काही सामाजिक संस्था आणि व्यक्तींनी तक्रारी केल्या. ते यासाठी की उर्फी जावेद यांना संरक्षण द्यावं”, अशी माहिती रुपाली चाकणकर यांनी दिली.
“अशापद्धतीने कोणी थोबाड रंगवण्याची भाषा करत असेल तर उर्फीला धोका आहे, त्यांना संरक्षण द्यावं, अशी मागणी आली तर याबाबतीत आम्ही दखल घेऊ शकतो. याबाबत आम्ही महाराष्ट्र पोलीस महासंचालक किंवा पोलीस आयुक्तांना पत्र पाठवून सुरक्षेची मागणी करु शकतो”, अशी भूमिका रुपाली चाकणकर यांनी मांडली.
“स्थळ, काळ, परतवेळ, शुल आणि अशील शब्दाचा अर्थ बदलत जातो. त्यामुळे एखाद्याला वाटत असलेली अशील घटना शील असू शकते. पेहरावबाबत कोणतीही परिभाषा नमूद केलेली नाही. त्यामुळे आयोग त्याचा वेळ या गोष्टीसाठी वेळ वाया घालवणार नाही”, असंही रुपाली चाकणकर यांनी सांगितलं.
दरम्यान, थोबाड रंगवण्याची भाषा महाराष्ट्रात कुणीही करु नये, असं विधान अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी केलं. महाराष्ट्रात अजून कायदा-व्यवस्था जीवंत आहे, अशा शब्दांत रुपाली चाकणकर यांनी भाजप नेत्या चित्रा वाघ यांच्यावर पलटवार केला.
“कायदा-सुव्यवस्था त्याचं काम करत असतो. कुणी कुणाचं थोबाड रंगवण्याचा प्रश्न अजून महाराष्ट्रात तरी आलेला नाहीय. यामध्ये पोलिसांची जबाबदारी आहे. कोणतीही घटना तुम्हाला त्रासदायक वाटत असेल किंवा एखाद्या व्यक्तीमुळे तुम्हाला त्रास होत असेल, एखाद्या व्यक्तीमुळे तुमचा छळ होत असेल तर आपण पोलिसांत रितसर तक्रार करु शकता”, असं रुपाली चाकणकर म्हणाल्या.
“संविधानाने आणि कायद्याने आपल्याला अधिकार दिलेला आहे. त्या अधिकारीचा आपण वापर करु शकतो”, असंही चाकणकर म्हणाल्या.