दिनेश दुखंडे, Tv9 मराठी, मुंबई | 14 नोव्हेंबर 2023 : महाराष्ट्राच्या राजकारणातील सर्वात मोठी बातमी समोर आली आहे. लोकसभेसाठी महाविकास आघाडीचं जागावाटप अंतिम टप्प्यात आलं आहे. महाविकास आघाडीचं लोकसभेच्या 44 जागांवर बोलणी जवळपास पूर्ण झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. ठाकरे गट 19 ते 21, काँग्रेस 13 ते 15 जागा, आणि शरद पवार गट 10 ते 15 जागा लढण्याची शक्यता आहे. 4 जागांवर चर्चेतून निर्णय होणार आहे. महाविकास आघाडीमध्ये 2 जागा राखीव ठेवण्यात आल्या आहेत. अकोला आणि हातकणंगलेची जागा राखीव ठेवण्यात आली आहे. वंचित बहुजन आघाडी सोबत आल्यास अकोल्याची जागा वंचित बहुजन आघाडीसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. तर हातकणंगलेची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे नेते राजू शेट्टी यांच्यासाठी राखीव ठेवण्यात आल्या आहेत.
वंचित बहुजन आघाडी सोबत न आल्यास अकोल्याची जागा काँग्रेसकडे जाण्याची शक्यता आहे. हातकणंगलेची जागा राजू शेट्टींसाठी राखीव ठेवण्यात आली आहे. शेट्टी सोबत न आल्यास शरद पवार गट या जागेवर निवडणूक लढवणार आहे. जालना, हिंगोली, भंडारा-गोंदिया, अमरावती जागेचा तिढा चर्चेतून सोडवणार आहेत. भंडारा-गोंदियाची जागा काँग्रेस किंवा राष्ट्रवादी यांच्यात चर्चेतून ठरेल. तर अमरावतीची जागा काँग्रेस आणि राष्ट्रवादी यांच्या चर्चेतून ठरेल.
काही दिवसांपूर्वीच राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार आणि ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांच्या बैठक झाली होती. शरद पवार यांच्या ‘सिल्व्हर ओक’ निवासस्थानी ही बैठक पार पडली होती. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या बैठकीत जागावाटपावर चर्चा झाली होती. 44 जागांवर बोलणी पूर्ण झालीय. पण 4 जागांवर बोलणं सुरु आहे. काँग्रेस नेते 5 राज्यांच्या निवडणुकीत व्यस्त आहे. या निवडणुकांचे निकाल 3 डिसेंबरला निकाल आहे. त्यानंतर काँग्रेस नेत्यांशी चर्चा करुन या जागावाटपावर अंतिम निर्णय घेण्यात येईल.
शिवसेना आणि भाजप 2019 च्या लोकसभा निवडणूक एकत्र लढले होते. या निवडणुकीत 23 मतदारसंघातून शिवसेना आणि 25 मतदारसंघातून भाजपने निवडणूक लढवली होती. त्यानंतर आता ठाकरे गट महाविकास आघाडीतून 19 ते 21 जागांवर निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.