सहन तरी किती करायचं? कोश्यारी, लोढा, लाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा काय?; आघाडीचा दुसरा टीझर जारी

| Updated on: Dec 16, 2022 | 12:30 PM

याच टीझरमध्ये मंगलप्रभात लोढा यांचंही वादग्रस्त विधान दाखवण्यात आलं आहे. शिवाजी महाराज स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी आग्रयाहून बाहेर आले.

सहन तरी किती करायचं? कोश्यारी, लोढा, लाड आणि चंद्रकांत पाटील यांच्यावर निशाणा काय?; आघाडीचा दुसरा टीझर जारी
आघाडीचा दुसरा टीझर जारी
Image Credit source: tv9 marathi
Follow us on

मुंबई: महापुरुषांच्या अवमानाविरोधात महाविकास आघाडीने उद्या शनिवारी महामोर्चाचं आयोजन केलं आहे. हा मोर्चा विराट करण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसली आहे. त्यासाठी मुंबईत जागोजागी बॅनर्स लावून वातावरण निर्मिती करण्यात आली आहे. महामोर्चाला लोकांनी येण्याचं आवाहन करण्यासाठी महाविकास आघाडीने आज दुसरा टीझर जारी केला आहे. या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, प्रसाद लाड आणि चंद्रकांत पाटील यांची वादग्रस्त विधाने दाखवण्यात आली आहेत. तसेच महापुरुषांचा अवमान सहन तरी किती करायचा? असा सवालही या टीझरमधून करण्यात आला आहे.

महाविकास आघाडीने हा दुसरा टीझर जारी केला आहे. त्यात राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, मंत्री मंगलप्रभात लोढा, चंद्रकांत पाटील आणि प्रसाद लाड यांना दाखवण्यात आले आहेत. हे चौघेही महापुरुषांबद्दल अवमानकारक उद्गार काढताना दिसत आहेत.

हे सुद्धा वाचा

या टीझरमध्ये राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे सावित्रीबाई फुले आणि महात्मा फुले यांच्या विवाहाबद्दल बोलताना दिसत आहेत. तसेच छत्रपती शिवाजी महाराज हे जुन्या काळातील आदर्श असल्याचं म्हणताना दिसत आहेत. तर, कर्मवीर भाऊराव पाटील, बाबासाहेब फुले यांनी शाळा सुरू केल्या. त्यांना सरकारने अनुदान नाही दिलं. त्यांनी लोकांकडे भीक मागितली, असं चंद्रकांत पाटील म्हणताना दिसत आहेत.

याच टीझरमध्ये मंगलप्रभात लोढा यांचंही वादग्रस्त विधान दाखवण्यात आलं आहे. शिवाजी महाराज स्वत:साठी नाही तर हिंदवी स्वराज्यासाठी आग्रयाहून बाहेर आले. मुख्यमंत्री एकनाथ शिंदेही असेच बाहेर आले, असं म्हणताना मंगलप्रभात लोढा दिसत आहेत. तर, छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्म कोकणात झाल्याचं प्रसाद लाड बोलताना दिसत आहेत.

या नेत्यांचे वादग्रस्त विधाने दाखवल्यानंतर याच टीझरमधून काही सवाल करण्यात आले आहेत. सहन तरी किती करायचं? मुळात अवमान सहनच का करायचा? चुकीचा इतिहास सहन का करायचा? असा सवाल या टीझरमधून विचारण्यात आला आहे.

तसेच महाराष्ट्रद्रोहींविरोधात हल्लाबोल. महाविकास आघाडीचा महामोर्चा. जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असं या टीझरच्या शेवटी ठळक अक्षरात दाखवण्यात आलं आहे.