मुंबईः राज्यात महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) विरुद्ध भाजप असं जोरदार राजकारण पाहायला मिळतंय. महाविकास आघाडीतील नेते आणि मंत्र्यांमागे केंद्रीय तपास यंत्रणांचा (Central Investigation Agency) ससेमिरा आणि आता भाजप नेत्यांवर महाराष्ट्र पोलिसांकडून होणाऱ्या कारवाया, यावरुन राज्यातील राजकारणाचं चित्र स्पष्ट होतं. एकीकडे महाविकास आघाडीचं सरकार पडणार असा दावा भाजप नेते सातत्याने करताहेत. अशावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी भाजपला थेट आव्हान दिलंय. राज्यात भाजपला पुन्हा येऊ देणार नाही, अशी गर्जनाच शरद पवार यांनी केलीय. महाविकास आघाडीच्या (MVA) तरुण आमदारांनी गुरुवारी राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष (NCP) शरद पवार (Sharad Pawar) यांची भेट घेतली. भाजपला राज्यात येऊन देणार नाही, पण त्यांच्याकडूनही काही शिका, असा सल्ला पवारांनी यावेळी तरुण आमदारांना दिला.
सध्या मुंबईत विधिमंडळाचे अधिवेशन सुरू आहे. त्यात महाविकास आघाडी विरुद्ध भाजप अशी जोरदार खडाजंगी रंगलीय. या वादळी अधिवेशात सहभागी होण्यासाठी शक्यतो बहुतांश आमदार उपस्थित आहेत. त्यात महाविकास आघाडीचे तरुण आमदार रोहित पवार, आदिती तटकरे, आशुतोष काळे, धीरज देशमुख, अतुल बेनके, योगेश कदम, इंद्रनील नाईक, ऋतुराज पाटील यांनी आज शरद पवारांची भेट घेत विविध विषयांवर चर्चा केली. दरम्यान, आज देवेंद्र फडणीस यांचे नागपूरमध्ये जोरदार स्वागत झाले. यावेळी त्यांनी गोव्यानंतर आता महाराष्ट्रात जिंकण्याचा निर्धार व्यक्त केलाय. तसेच भाजपचे नेतेही महाविकास आघाडीवर जोर एक नवा आरोप करत आहेत. या पार्श्वभूमीवर तरुण आमदारांनी शरद पवारांची घेतलेली भेट सध्या चर्चेचे कारण ठरलीय.
भाजपला राज्यात येऊ देणार नाही…
शरद पवार यांचा त्यांच्या वाढत्या वयात असलेला आत्मविश्वास पाहून महाविकास आघाडीचे युवा आमदार अवाक झाले. पवार आणि महाविकास आघाडीच्या आमदारांची सिल्वर ओकवर जवळपास दोन तास ही बैठक चालली. या बैठकीत पवारांनी चर्चेमध्ये युवा आमदारांची मते जाणून घेतली. त्याचबरोबर यशस्वी राजकीय वाटचालीसाठी काही कानमंत्रही दिले.
बैठक संपून आमदार निघण्याच्या तयारीत असताना शरद पवार उभे राहिले. त्यांनी आपले दोन्ही हात वर करीत आणि वज्रमूठ तयार करीत, घाबरायचे काही कारण नाही. मी भाजपला पुन्हा राज्यात येऊ देत नाही, असा आत्मविश्वास व्यक्त केला. भाजप आपला राजकीय प्रतिस्पर्धी आहे. त्यांच्या अनेक नकारात्मक गोष्टी असल्या, तरी त्यांच्या नेत्यांकडून शिकण्यासारख्या काही गोष्टी असल्याचे मत शरद पवार यांनी व्यक्त केले. जसे की दिवस-रात्र मेहनत घेण्याची तयारी, कामाचे मार्केटिंग, नियोजनबद्ध व्यूहरचना आखून निवडणूक लढण्याची तयारी. हे शिकावे, असे आवाहन केले.
पवार करणार दौरा
आपण लवकरच राज्यव्यापी दौरा करणार असून प्रत्येक भागातील प्रश्न, मुद्दे जाणून घेणार असल्याचे शरद पवार यांनी यावेळी सांगितले. युवा आमदार विधिमंडळ अधिवेशन कामकाजात कशा पद्धतीने सहभागी होतात, त्यांना येणाऱ्या अडचणी कोणत्या हे ही शरद पवार यांनी यावेळी चर्चेत जाणून घेतले. इतिहासातील अनेक राजकीय घटना, संदर्भ त्यांनी युवा आमदारांना सांगितल्या. तसेच सामाजिक, शैक्षणिक संस्था संघटना स्थापन करा, त्यांच्या कामकाजात रूची घ्या, सदस्यांना पुढे आणा हे आणि यासारखे अनेक कानमंत्रही शरद पवार यांनी यावेळी युवा आमदारांना दिले.
विधिमंडळाच्या अधिवेशनादरम्यान सहकारी आमदारांसोबत आदरणीय @PawarSpeaks साहेबांची भेट घेतली. व्यस्त दिनक्रमातूनही साहेबांनी पुरेसा वेळ दिला आणि मार्गदर्शन केलं, याबाबत साहेबांचे आभार!@iAditiTatkare @AshutoshAKale@ruturajdyp@MeDeshmukh@atulbenkeNCP@iYogeshRKadam @naikindranil pic.twitter.com/s8oMiE2DQH
— Rohit Pawar (@RRPSpeaks) March 17, 2022
राजकीय गुरुकिल्ली दिली
शरद पवारांनी यावेळी महाविकास आघाडीच्या तरुण आमदारांना वडिलधारी व्यक्तीच्या नात्याने आणि प्रगल्भ राजकीय अनुभवाच्या आधारावर मार्गदर्शन केले. राजकारणात येणारा प्रत्येक दिवस आव्हानात्मक असतो. त्याला कसे तोंड द्यायचे, यावरची गुरुकिल्ली सांगितली. शरद पवारांशी झालेल्या भेटीची माहिती आमदार रोहित पवार यांनी ट्वीट करून दिलीय. त्यांनी पवारांसोबतचा एक फोटोही शेअर केलाय.