लोकसभा निवडणुकीत महाराष्ट्रातील जनतेने मोठे यश महाविकास आघाडीला दिले आहे. प्रचंड दबाब असताना जनता महाविकास आघाडीच्या बाजुला उभी राहिली. आता महाविकास आघाडीने विधानसभा निवडणुकीची तयारी सुरु केली आहे. त्यासाठी शनिवारी काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार), शिवसेना (उबाठा) या तिन्ही पक्षांची प्राथमिक बैठक झाली. या बैठकीत लोकसभेपेक्षा अधिक ताकदीने विधानसभा निवडणूक लढवण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यांची माहिती महविकास आघाडीच्या नेत्यांनी पत्रकार परिषदेतून दिली. पत्रकार परिषदेला महाविकास आघाडीचे नेते उद्धव ठाकरे, शरद पवार आणि पृथ्वीराज चव्हाण उपस्थित होते.
महाराष्ट्रातील जनतेचे आभार मानण्यासाठी आजची पत्रकार परिषद आयोजित केली आहे. लोकशाही वाचवण्याचे काम महाराष्ट्रातील जनतेने केले आहे. कारण महाविकास आघाडीच्या या विजयात जनतेचा सिंहाचा वाटा आहे. जनतेने आघाडीला निर्णायक बहुमत दिले आहे. सर्व घटकातून पाठिंबा दिला गेला आहे. या निवडणुकीत आम्ही तीन पक्ष आहोत. तसेच यामध्ये ३० ते ४०च्यावर जनसंघटना होत्या. छोटे पक्षही होते. या सर्वांनी मेहनत घेतली. जनजागरण केले. पक्ष आणि संघटनांची यादी आहे. काही सामाजिक कार्यकर्तेही होते. त्यांनीही महाराष्ट्रातील वातावरण निर्माण केलं. राज्यातील जनतेने देशातील लोकशाही वाचवण्यात मोठी भूमिका निभावली. सिंहाचा वाटा आहे, असे काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी सांगितले.
जयंत पाटील यांनी सांगितले की, लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला घवघवीत यश मिळवलं. त्यानंतर पहिल्यांदाच तीन पक्ष सार्वजनीकरित्या एकत्र येत आहे. या विजयासाठी सर्वच मित्र पक्षांनी मेहनत घेतली. विविध संघटनांनीही मोठी कामगिरी बजावली. जनजागरण केले. निर्भय बनो ही संघटना आहे, विश्वंभर चौधरी, असीम सरोदे आणि निखिल वागळे यांनी चांगले काम केले. त्यामुळे हा विजय प्राप्त झाला आहे. देशातील राजकारणात महाराष्ट्राने वठवलेली भूमिका महत्त्वाची आहे. इंडिया आघाडीला जे बळ जनतेने दिले, त्यात सर्वाधिक बळ महाराष्ट्राने दिले आहे.
राज्यात वेगवेगळ्या पक्षाच्या नेत्यांच्या सभा झाल्या. देशाच्या पंतप्रधानांनी सभा काही राज्यात घेतल्या. विधानसभेच्या निवडणुकीच्या काळात पंतप्रधानांच्या जेवढ्या सभा होतील. तेवढं आम्ही बहुमता जवळ जाऊ. त्यामुळे मी त्यांनाही धन्यवाद देतो, असे शरद पवार यांनी सांगितले.