महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, ‘हा’ पक्ष सर्वाधिक जागा लढणार

| Updated on: Feb 29, 2024 | 3:36 PM

महाविकास आघाडीतील इनसाईड स्टोरी 'टीव्ही 9 मराठी'च्या हाती लागली आहे. महाविकास आघाडीचं आगामी लोकसभा निवडणुकीसाठीचं संभाव्य जागावाटप जवळपास निश्चित झाल्याची माहिती सूत्रांनी दिलीय. विशेष म्हणजे या जागावाटपात ठाकरे गटाला सर्वाधिक जागा मिळाल्याची माहिती मिळत आहे.

महाविकास आघाडीचा जागावाटपाचा फॉर्म्युला ठरला, हा पक्ष सर्वाधिक जागा लढणार
maha vikas aghadi
Follow us on

दिनेश दुखंडे, Tv9 प्रतिनिधी, मुंबई | 29 फेब्रुवारी 2024 : महाविकास आघाडीच्या जागावाटपाची महत्त्वाची माहिती ‘टीव्ही9 मराठी’च्या हाती लागली आहे. शिवसेना ठाकरे गट लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर लढणार आहे. त्यापैकी 2 जागा ठाकरे गट मित्रपक्षांना देणार आहे. काँग्रेसच्या वाटेला 15 ते 17 जागा मिळणार असल्याची माहिती मिळत आहे. तर राष्ट्रवादीच्या शरद पवार गटाला 9 ते 11 जागा मिळणार आहेत, अशी माहिती सूत्रांनी दिली आहे. विशेष म्हणजे वंचित बहुजन आघाडी महाविकास आघाडीसोबत आल्यास अकोल्याची जागा दिली जाणार आहे. त्याशिवाय वंचित सोबत आल्यास त्यांना आणखी एक ते दोन जागा दिली जाण्याची शक्यता आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याच्या तयारीत आहे. शरद पवार गट उत्तर मुंबईसाठी उत्सुक नाही. त्यामुळे उत्तर मुंबईची जागा कुणी लढणार नसेल तर ठाकरे गट लढणार, अशी माहिती सूत्रांनी दिलीय.

ठाकरे गटाचा सुरुवातीपासूनच लोकसभेच्या 48 पैकी 23 जागांवर दावा आहे. विशेष म्हणजे यापैकी 21 जागांवर शिवसेना ठाकरे गट निवडणूक लढणार आहे. तर 2 जागा मित्रपक्षांना देण्याची तयारी ठाकरे गटाची आहे. यातली हातकणंगले ही एक जागा ठाकरे गट राजू शेट्टी यांच्या स्वाभिमानी शेतकरी संघटनेसाठी सोडायला तयार आहे. तर अकोल्याची एक जागा ठाकरे गट मित्रपक्ष असलेल्या वंचित बहुजन आघाडीला सोडायला तयार आहे.

ठाकरे गट मुंबईत 4 जागांवर लढणार

ठाकरे गट मुंबईत 4 जागांवर निवडणूक लढण्याच्या तयारीत आहे. मुंबईतील 2 जागा काँग्रेससाठी सोडल्या जाण्याची शक्यता आहे. तर ठाकरे गट मुंबईत 4 जागा लढण्याचा तयारीत आहे. दक्षिण मुंबई, दक्षिण मध्य मुंबई, उत्तर पश्चिम मुंबई या जागांवर ठाकरे निवडणूक लढण्याची शक्यता आहे. ईशान्य मुंबई ही जागा ठाकरे गटाकडे आहे. पण काँग्रेस या जागेसाठी आग्रही आहे. दुसरीकडे वंचित बहुजन आघाडी बरोबर आल्यास ईशान्य मुंबई ही जागा वंचितला सोडली जाण्याची शक्यता आहे.

ठाकरे गट ‘या’ जागांवर लढणार

कोल्हापूरच्या जागेवर सध्या पेच आहे. ही जागा सध्या शिवसेना ठाकरे गटाकडे आहे. कोल्हापूरचे खासदार सध्या ठाकरे गटाचे आहेत. पण काँग्रेसला ही जागा हवी आहे. कोल्हापूरचे छत्रपती घराण्याचे वंशज शाहू महाराज छत्रपती यांच्यासाठी काँग्रेसला ही जागा हवी आहे. कोल्हापूरच्या जागेच्या बदल्यात ठाकरे गटाने काँग्रेसकडे सांगली जागा मागितली आहे. हातकणंगले ही जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेकडे जातेय. तर रत्नागिरी-सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे, कल्याण डोंबिवली, पालघर, नाशिक, शिर्डी, जळगाव, मावळ, धाराशिव, परभणी, छत्रपती संभाजीनगर, रामटेक, बुलढाणा, हिंगोली आणि यवतमाळ या जागांवर ठाकरे गट निवडणूक लढवण्याची शक्यता आहे.

काँग्रेस आणि शरद पवार गट ‘या’ जागांवर लढणार

काँग्रेस नागपूर, भंडारा-गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली, अमरावची, अकोला या जागांवर निवडणूक लढवणार आहे. काँग्रेस आपल्या कोट्यातून एक जागा वंचितला देण्याच्या तयारीत आहे. तसेच लातूर, नांदेड, जालना, धुळे, नंदुरबार, पुणे, सोलापूर आणि सांगली अशा जागा काँग्रेसच्या वाटेला आहेत. भिवंडी जागेसाठी काँग्रेस आणि राष्ट्रवादी या दोन्ही पक्षांनी दावा केलाय. तसेच त्यांनी उमेदवारावरही दोन्ही पक्षांनी दावा केलाय. उत्तर मध्य मुंबई ही जागा काँग्रेसच्या वाटेला आहे. राष्ट्रवादी शरद पवार गटाला बारामती, शिरुर, बीड, दिंडोरी, रावेर, अहमदनगर, माढा, सातारा, वर्धा या जागा मिळण्याची दाट शक्यता आहे.