बहुमताच्या लाटेवर स्वार महायुतीचा मंत्रिमंडळ विस्तार आज होणार आहे. नागपूरमध्ये उद्यापासून हिवाळी अधिवेशनाचा श्रीगणेशा होत आहे. त्यापूर्वीच अवघे सरकार आज नागपूरमध्ये दाखल होत आहे. मंत्रिमंडळात आपली वर्णी लागवी आणि मंत्रीपदाची माळ गळ्यात पडावी यासाठी रात्रभर लॉबिंग करण्यात आले. शिवसेनेच्या 12 मंत्र्यांची नावं आता अंतिम झाली आहे. तर भाजपच्या आमदारांना आता फोन गेल्याची माहिती समोर येत आहे. नितेश राणे, शिवेंद्रराजे, मंगलप्रभात लोढा यांना चंद्रशेखर बावनकुळे यांनी फोन केल्याची माहिती समोर येत आहे.
शिवसेनेत कुणाला लॉटरी
महाराष्ट्र कॅबिनेट विस्ताराची वेळ आता जवळ आली आहे. एकना शिंदे यांच्या शिलेदारांची नावं सुद्धा अंतिम झाल्याचे समोर येत आहे. शिवसेनेत काही जणांचा पत्ता कट झाल्याचे तर काही जुन्या लोकांना पुन्हा संधी देण्यात आल्याचे समोर येत आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कॅबिनेटमध्ये एकनाथ शिंदे यांच्या पक्षाचे 12 आमदार शपथ घेतील. यामध्ये 6 नवीन चेहऱ्यांचा समावेश असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
या 6 नवीन चेहऱ्यांना संधी
मराठवाडा छत्रपती संभाजीनगरमधून संजय शिरसाट
रायगडमधून भरतशेठ गोगावले
पश्चिम महाराष्ट्रातून प्रकाश अबिटकर
कोकणातून योगेश कदम
विदर्भातून आशिष जैस्वाल
ठाण्यातून प्रताप सरनाईक
या पाच जुन्या चेहऱ्यांना पुन्हा संधी
कोकणातून उदय सामंत
पश्चिम महाराष्ट्रातून शंभुराज देसाई
उत्तर महाराष्ट्रातून गुलाबराव पाटील
उत्तर महाराष्ट्रातून दादा भुसे
विदर्भातून संजय राठोड
या तिघांचा पत्ता कट
कोकणातून दीपक केसरकर
मराठवाडा धाराशिवमधून तानाजी सावंत
मराठवाडा छत्रपती संभाजीनगरचे अब्दुल सत्तार
योग्य व्यक्तींना संधी देण्यात येईल
धक्कातंत्र आहेत की नाही याची माहिती लवकरच मिळेल. याविषयी आमदारांना फोन जातील अशी माहिती उदय सामंत यांनी दिली. योग्य काम करणाऱ्या व्यक्तींना संधी देण्यात येणार असल्याची माहिती त्यांनी दिली. चार वाजता मंत्रिमंडळ विस्तारासाठी सर्व आमदार उपस्थित राहणार असल्याचे ते म्हणाले.
राष्ट्रवादीच्या या नेत्यांना लॉटरी
नव्या सरकारच्या मंत्र्यांच्या शपथवधी नागपूरात आज संध्याकाळी होत आहे. उद्यापासून हिवाळी अधिवेशन होत आहे. त्यात राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या काही नेत्यांना मंत्रिपदाची लॉटरी लागली आहे. अजित पवार गटाकडून चार आमदारांना फोन गेल्याची माहिती सूत्रांनी दिली आहे. त्यानुसार, आदिती तटकरे, अनिल पाटील यांना सुनील तटकरे यांनी फोन केल्याचे समजते. हसन मुश्रीफ, नरहरी झिरवाळ यांना मंत्रिपदासाठी फोन गेल्याची माहिती समोर येत आहे.